डोनाल्ड ट्रम्प दोषी, बिनशर्त मुक्तता
शपथविधीच्या 10 दिवसांपूर्वी न्यायालयाचा निर्णय : अमेरिकेच्या इतिहासात दोषी ठरलेले पहिले अध्यक्ष ठरणार
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
अमेरिकेचे माजी अन् आगामी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना शुक्रवारी पोर्न स्टारला वाच्यता न करण्याप्रकरणी पैसे दिल्यासमवेत 34 गुन्ह्यांकरता अनकंडिशनल डिस्चार्ज (बिनशर्त मुक्तता) सुनावण्यात आला आहे. बिनशर्त मुक्ततेमुळे ट्रम्प यांना तुरुंगात जावे लागणार नसले तरीही ते दोषी ठरले आहेत.
मागील वर्षी मे महिन्यात मॅनहॅटनच्या न्यायालयाने याप्रकरणी त्यांना दोषी ठरविले होते. यानंतर ट्रम्प हे अमेरिकेच्या इतिहासात गुन्हेगारी प्रकरणी दोषी ठरणारे पहिले माजी अध्यक्ष ठरले होते. तर आता ते बिनशर्त मुक्तता झालेले पहिले अध्यक्ष ठरणार आहेत. यामुळे ट्रम्प यांना कायदेशीरदृष्ट्या कुठलेही नुकसान होणार नाही. परंतु त्यांच्या राजकीय प्रतिमेला धक्का पोहोचण्याची शक्यता आहे.
ट्रम्प हे शिक्षा सुनावताना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयासमोर हजर राहिले. न्यायालयात 4 मोठ्या स्क्रीन लावण्यात आल्या असून ट्रम्प शिक्षा सुनावण्याच्या प्रसंगावेळी त्यावर दिसून आले. ट्रम्प यांना त्यांच्या शपथविधीच्या 10 दिवसांपूर्वी शिक्षा सुनावण्यात आली आहे. अध्यक्ष झाल्यावरही ट्रम्प हे स्वत:ला याप्रकरणी माफी देऊ शकत नाहीत. ट्रम्प हे अध्यक्ष म्हणून केवळ संघीय गुन्ह्यांमध्ये माफी प्रदान करु शकतात. परंतु ट्रम्प हे न्यूयॉर्क प्रांताच्या न्यायालयात दोषी ठरले आहेत. याचमुळे ते स्वत:ला माफी प्रदान करू शकत नाहीत.
ट्रम्प यांनी 6 नोव्हेंबर रोजी झालेल्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत विजय मिळविला होता. तर 20 जानेवारी ते अध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. ट्रम्प यांनी शिक्षेपासून वाचण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. परंतु न्यायालयाने गुरुवारी त्यांची याचिका फेटाळली होती.
ट्रम्प यांना 20 जानेवारी रोजी अध्यक्षपदाची शपथ घेतल्यावर कायदेशीर संरक्षण प्राप्त होणार आहे. याचमुळे न्यायालयाने त्यांच्या शपथविधीपूर्वीच शिक्षा घोषित करण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेच्या घटनेतील अनुच्छेद 2 च्या कलम 4 नुसार अध्यक्षपदावर असताना संबंधिताला गुन्हेगारी प्रकरणात शिक्षा ठोठावली जाऊ शकत नाही.