बिहारमध्ये दिवसाढवळ्या गुंडाची हत्या
रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये घुसून गेला गोळीबार
वृत्तसंस्था/पाटणा
बिहारची राजधानी पाटणा येथील एका रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात घुसून पाच गुंडांनी एका शिक्षा झालेल्या गुन्हेगाराची हत्या केली आहे. हे गुंड अत्यंत शांतपणे रुग्णालयाच्या कॉरिडॉरमधून या गुन्हेगाराला वैद्यकीय उपचारांसाठी ठेवण्यात आलेल्या अतिदक्षता विभागात शिरले आणि त्यांनी त्याच्यावर गोळ्या चालवून नंतर पलायन केले. या संपूर्ण प्रसंगाचे व्हिडीओ चित्रण प्रसारित होत असून दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. त्वरित या प्रकरणाला राजकीय रंगही देण्यात आला आहे. काँग्रेसच्या बिहार शाखेने या प्रसंगाचा व्हिडीओ पोस्ट करुन राज्यातील नितीश कुमार सरकारवर टीका केली. बिहारमध्ये कायदा आणि सुव्यवस्था स्थिती किती बिघडली आहे, याचे प्रत्यंतर या घटनेतून येते, अशी टिप्पणीही काँग्रेस नेत्यांनी केली आहे.
हत्येच्या गुन्हेगाराची हत्या
ज्या रुग्णालयात हा प्रकार घडला, त्याचे नाव पारस रुग्णालय असे आहे. या रुग्णालयात चंदन मिश्रा नामक गुन्हेगारावर उपचार करण्यात येत होते. चंदन मिश्रा याच्यावर हत्या केल्याचा आरोप होता आणि त्याला यासाठी शिक्षाही ठोठावण्यात आली होती. तो कारागृहात असताना त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला उपचारांसाठी या रुग्णालयात आणण्यात आले होते. रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने पोलिसांकडे तक्रार सादर केली असून पुढील तपास केला जात आहे.
जुने वैमनस्य कारणीभूत
चंदन मिश्राची हत्या जुन्या वैमनस्यातून झाली असल्याचा निष्कर्ष प्राथमिक तपासाच्या आधारावर काढण्यात आला आहे. पाटण्याचे विशेष पोलीस निरीक्षक कार्तिकेय शर्मा यांनी या घटनेची माहिती पत्रकारांना दिली. मिश्रा हा एक कुविख्यात गुन्हेगार आणि गुंड होता. तो शिक्षा भोगत होता. त्याच्या विरोधात अनेक गुन्हेगारी प्रकरणे सादर करण्यात आली होती. प्रतिस्पर्धी गुंड टोळीकडून त्याची हत्या करण्यात आली असावी, असे दिसून येत आहे. तथापि, पोलीस सर्व शक्यता गृहित धरुन तपास करीत आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
निवडणुकीच्या राजकारणासाठी उपयोग
बिहारमध्ये येत्या नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. त्यामुळे या हत्या प्रकरणाचा उपयोग विरोधी पक्ष राजकीय लाभासाठी करुन घेण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप संयुक्त जनता दल आणि भारतीय जनता पक्षाने केला आहे. लालूप्रसाद यादव यांची सत्ता बिहारमध्ये असताना यापेक्षा भयानक अशा प्रकारची हत्याकांडे घडली होती. मात्र, आता हाच पक्ष या घटनेचे राजकीय भांडवल करीत आहे. या घटनेची पूर्ण चौकशी केली जाईल आणि गुन्हेगारांना शासन केले जाईल. विरोधी पक्षांनी अशा घटनांना राजकीय रंग देण्याचे टाळले पाहिजे. त्यांनी ते सत्तेत असतानाचा काळ आठवून पहावा. त्या तुलनेत आता बिहारमध्ये कायदा आणि सुव्यवस्था स्थिती मोठ्या प्रमाणात सुधारलेली त्यांना दिसेल, अशी खोचक टिप्पणी भारतीय जनता पक्षाच्या बिहार राज्यातील नेत्यांनी केली आहे.