घरगुती एलपीजी कमर्शियल सिलिंडरमध्ये
बांध - सेरावली येथील काळ्या बाजाराचा पर्दाफाश : पाचजणांना अटक, दोन वाहनांसह 174 सिलिंडर जप्त
मडगाव : पहाटे इतर सर्वसामान्य लोक साखर झोपेत असताना याच प्रहराचा फायदा घेऊन घरगुती गॅस सिलिंडरमधून गॅस काढून तो कमर्शियल सिलिंडरमध्ये भरुन जवळजवळ दुपटीने नफा मिळवून गब्बर बनण्याच्या मार्गावर असलेल्या 5 जणांच्या टोळीला कोलवा पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्याचबरोबर ‘कुची कुची बाबा’ अशी नावे असलेली दोन वाहने जप्त करण्यात आली आहेत. हा प्रकार कधीपासून चालू होता, जप्त करण्यात आलेले एवढे घरगुती सिलिंडर्स कुठून आणण्यात आले, या प्रकारात गॅस वितरण करणाऱ्या एजन्सीचा हात आहे का? याचा तपास सध्या तपास यंत्रणा करीत आहेत.
कोलवा पोलिसस्थानकाचा ताबा असलेले पोलिस निरीक्षक अरुण गावस देसाई यांनी सोमवारी सायंकाळी उशिरा याप्रकरणी पत्रकारांना सविस्तर माहिती दिली. कोलवा पोलिसस्थानकाकडे संलग्न असलेले पोलिस कर्मचारी रविवारी मध्यरात्रीनंतर गस्तीवर होते. बांध-सेरावली येथे गस्तीवर असताना या पोलिसांना काही संशयास्पद हालचाली दिसून आल्या. दोन वाहने होती व त्यात गॅस सिलिंडर्स होते. पोलिसांनी जवळ जाऊन अंधारातील एका खोलीची पाहणी केली तेव्हा एकूण 5 जण तेथे होते. हे पाचही संशयित आरोपी घरगुती गॅस सिलिंडरमधील गॅस, कमर्शियल सिलिंडरमध्ये भरत होते. हे गैरकृत्य अत्यंत कमी प्रकाशात करीत होते. एकंदर प्रकाराचा अंदाज आल्यानंतर गस्तीवर असलेले पोलिस अचानक या 5 जणांपुढे आले आणि त्यांनी त्यांना अंधारात हा काय प्रकार चालू आहे? अशी विचारणा केली तेव्हा संशयित बिथरले आणि ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले.
पाच जणांना अटक, वाहने जप्त
या जागी एकूण 174 सिलिंडर होते. त्यासंबंधी या संशयितांकडे कागदपत्रे नसल्याचे तेथेच उघड झाले. 26 वर्षीय राकेश कुमार, 20 वर्षीय प्रदीप, 25 वर्षीय भंवरलाल, मन्फुल बिस्नॉय आणि 19 वर्षीय कमल मंजू यांना कोलवा पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या 35 कलमाखाली अटक केली आहे. शिवाय जीए-07-एफ-4460 व जीए-08-व्ही-4867 ही वाहने जप्त केली आहेत. पैकी एका वाहनावर ‘कुची कुची बाबा’ असे नाव असल्याची माहिती पोलिसानी दिली. पोलिस उपनिरीक्षक प्रशांत भगत, हवालदार संदेश गडकर यांनी ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली.