घरगुती वीज जोडणी हवी, 10 हजार रूपये द्या ! महावितरणमधील अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांचा फंडा
पायाभूत सुविधेसह वीज जोडणीचा खर्च केवळ 2600; सर्व्हिस वायर देण्याची जबाबदारी देखील महावितरणचीच; घरगुती वीज जोडणीसाठी ग्राहकांची लूट
कृष्णात चौगले कोल्हापूर
एखाद्या ग्राहकास नवीन घरगुती वीज जोडणी हवी असल्यास त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधेसह 2600 रूपये खर्च आहे. पण वीज जोडणी देणाऱ्या महावितरणच्या संबंधित यंत्रणेकडून (अधिकारी, कर्मचारी) एका वीज जोडणीसाठी दहा हजार रूपये घेतले जात असल्याच्या अनेक ग्राहकांच्या तक्रारी आहेत. ही रक्कम देणाऱ्या ग्राहकांसाठी भ्रष्ट यंत्रणेकडून कृती मानके आणि सेवा हमी कायदा जलदरित्या राबविला जातो. तर केवळ महावितरणने निश्चित केलेली 2600 रूपयांची रक्कम भरून वीज जोडणीसाठी पाठपुरावा करणाऱ्या ग्राहकांना मात्र सहा-सहा महिने महावितरणच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. त्यामुळे ‘मागेल त्याला वीज’ या महावितरणच्या मूळ संकल्पनेला धक्का पोहोचला असून ‘जिथे अर्थ, तिथे तत्काळ वीज’ हा अघोषित नियम रूढ झाला आहे.
महावितरणचे राज्यात सर्व वर्गवारीचे 3 कोटी ग्राहक आहेत. यापैकी सुमारे 2 कोटी 20 लाख घरगुती (सिंगल फेज) वीज ग्राहक आहेत. त्यामुळे सर्वाधिक ग्राहक संख्या ही घरगुती असून त्यामध्ये वर्षानुवर्षे मोठी वाढ होत आहे. एखाद्या ग्राहकास घरगुती वीज जोडणी हवी असल्यास त्याला अर्ज नेंदणी व प्रक्रिया फी 120 रूपये, वीज संच मांडणी आणि तपासणी फी 120 रूपये, नवीन वीज जोडणी शुल्क (अधिकतम) 1840 रूपये आणि 571 रूपये जीएसटी आकारला जातो. त्यामुळे नवीन वीज जोडणीसाठी 2600 रूपये खर्च येतो. पण नवीन वीज जोडणीसाठी येणाऱ्या ग्राहकांकडून सरसकट 10 हजार रूपये घेतले जात असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे ग्राहकांनीही आपण वीज जोडणीसाठी जेवढी रक्कम भरतो, तेवढ्या रकमेची पावती घेणे आवश्यक आहे. त्यामुळे महावितरणचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वरकमाईला निश्चितपणे चाप बसेल. दरम्यान एखाद्या जाणकार ग्राहकाने वीज जोडणीसाठी ऑनलाईन अर्ज व्यवस्थितरित्या भरला असेल, तसेच वीज जोडणीचे सर्व शुल्क भरले असेल तरीही महावितरणच्या कार्यालयातून अर्जात त्रुटी असल्याचे सांगून संबंधित ग्राहकांकडून अतिरिक्त कागदपत्रांची मागणी करून अडवणूक केली जात आहे.
सेवा शुल्कचे फलक लावणे आवश्यक
महावितरणमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मनमानी ‘दरा’वर अंकुश ठेवण्यासाठी महावितरणच्या अधिकृत सेवा शुल्काचे कार्यालयात फलक लावणे आवश्यक आहे. नवीन वीज जोडणीसह इतर सेवांसाठी विद्युत नियामक आयोगाने सेवा शुल्क निश्चित केले आहे. पण कोणत्याही शाखा, उपविभाग कार्यालयात सेवा शुल्काचे फलक लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे ग्राहकांना अंधारात ठेवून ग्राहकांच्या खिशावर डल्ला मारण्याचे काम महावितरणचे अधिकारी करत असल्याची जोरदार चर्चा आहे. महावितरणचे वरिष्ठ प्रशासन मात्र मूग गिळून गप्प आहे.
नवीन वीज जोडणीसाठी सेवा कालावधीत सुधारणा
नवीन वीज जोडणी घेणाऱ्या ग्राहकाने अधिकारी व वीज कर्मचाऱ्यांची मर्जी राखली नाही की ग्राहकांच्या कामात चालढकल व वेळकाढूपणा केला जातो. सरळ सोपा नियम आडवा करून लुबाडणूक केली जाते. त्यावर आळा घालण्यासाठी नियमानुसार कृती मानकाचे फलक लावले गेले पाहिजेत. त्यांचे पालन केले जाते की नाही, यासाठी वरिष्ठ अधिकारी, ग्राहक संघटना, लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासन यांचा पाठपुरावा आवश्यक आहे. विद्युत नियामक आयोगाने नवीन वीज जोडणी देण्याच्या सेवा कालावधीत सुधारणा केली आहे. महापालिका क्षेत्रात 3, इतर नागरी क्षेत्रात 7 व ग्रामीण क्षेत्रात 15 दिवसात नवीन वीज जोडणी देणे बंधनकारक केले आहे.
महावितरणला मराठीचे वावडे
महावितरणची अनेक परिपत्रके इंग्रजी भाषेतून प्रसारित केली जातात. संकेतस्थळावर 18 मे 2023 चे महावितरणचे सेवा शुल्क आकारणीचे परिपत्रक इंग्रजी भाषेतून आहे. किमान ग्राहक हिताची परिपत्रके ग्राहकाला समजेल अशा सोप्या मराठी भाषेत प्रसारित करावीत अशी ग्राहकांची मागणी आहे.
सर्व्हिस वायरसह वीज जोडणी देण्याची महावितरणची जबाबदारी
नवीन घरगुती वीज जोडणी घेण्यासाठी 2600 रूपयांचे शुल्क भरल्यानंतर त्यामधून पायाभूत सुविधा परविण्यासह विद्युत यंत्रणेपासून घरातील मीटरपर्यंत सर्व्हिस वायर देण्याची जबाबदारी ही महावितरणची आहे. ग्राहकाने भरलेल्या सेवा शुल्कमधून त्याला वीज जोडणी देणे बंधनकारक आहे. पण गेल्या अनेक वर्षात दिलेल्या वीज जोडण्यांमध्ये सर्व्हिस वायर ही ग्राहकांनाच आणण्यास भाग पाडले असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे सर्व्हिस वायर आणणे ही आपलीच जबाबदारी आहे, असे ग्राहकांच्या मनावर बिंबले आहे. त्यामुळे सेवा शुल्कपेक्षा अतिरिक्त हजारो रूपये ग्राहकांकडून घेऊनही पुन्हा त्यांच्यावरच सर्व्हिस वायरचा खर्च लादला जात असल्याचे चित्र आहे.
कृती मानकांमध्ये ग्राहक हिताशी छेडछाड
महावितरण कंपनीने 2005 साली निश्चित केलेल्या कृती मानकामध्ये ग्राहक हित जोपासले होते. पण 2021 च्या कृती मानकामध्ये ग्राहक हित बाजूला करून त्यामध्ये छेडछाड केली आहे. वीज जोडणी संदर्भात अर्ज दाखल करणे, कृती मानकानुसार विहित वेळेत काम केले नसेल तर महावितरणकडून दिली जाणारी भरपाई रक्कम याबाबत 2005 च्या कृती मानकांमध्ये स्पष्ट तरतुदी होत्या. पण 2021 मध्ये कृती मानकांमध्ये केलेल्या दुरुस्तीमध्ये या ग्राहक हिताच्या तरतुदींमध्ये छेडछाड केली आहे. महावितरणने वीजेच्या दरात आजतागायत भरमसाठ दरवाढ केली आहे. पण कृती मानकाप्रमाणे एखादे काम न केल्यास 2005 च्या मानकानुसार ग्राहकास 100 रूपये देण्याची तरतूद होती. यामध्ये 2021 मध्ये कपात करून ती केवळ 50 रूपये केली आहे.
इलेक्ट्रिक कॉन्टॅक्टरच्या आडाने ग्राहकांची लुटमार
एखाद्या ग्राहकास घरगुती वीज जोडणी हवी असेल तर त्यासाठी 2600 रूपये खर्च येतो. पण महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून इलेक्ट्रिक कॉन्टॅक्टरच्या माध्यमातून वीज जोडणीची प्रक्रिया राबविली जात असून एक कनेक्शनसाठी सुमारे 10 ते 15 हजार रूपये घेतले जात आहेत. त्यामुळे याला आळा घालण्यासाठी आणि ग्राहकांच्या जनजागृतीसाठी महावितरणच्या कार्यालयात सर्व वर्गवारीतील वीज जोडणींसाठी नेमका किती खर्च येतो, याची माहिती देणारे फलक आणि कृती मानके दर्शनी भागात लावणे आवश्यक आहे. त्यामुळे किमान जाणकार ग्राहक हे फलक वाचून महावितरणचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जाब विचारतील.
विक्रांत पाटील, अध्यक्ष, इरिगेशन फेडरेशन