देशांतर्गत विमान प्रवाशांची संख्या 11 टक्के वाढली
नवी दिल्ली :
गेल्या फेब्रुवारी महिन्यात 1.4 कोटी प्रवाशांनी विमान प्रवास केला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. मागच्या वर्षाच्या फेब्रुवारीतील प्रवाशांच्या संख्येच्या तुलनेत पाहता या खेपेला 11 टक्के प्रवासी वाढले आहेत.
फेब्रुवारी महिन्यात 1 कोटी 2 लाखांहून अधिक प्रवाशांनी विमानाने प्रवास केला होता. यामध्ये सर्वाधिक वाटा हवाई क्षेत्रातील दिग्गज कंपनी इंडिगो यांनी उचलला आहे.
89 लाख प्रवाशांची इंडिगोला पसंती
इंडिगो विमानाने फेब्रुवारी महिन्यात 89.4 लाख प्रवाशांनी प्रवास केला होता. यायोगे इंडिगोने विमान वाहतुकीत जवळपास 63 टक्क्यांचा वाटा उचलत आघाडी घेतली आहे. यानंतर एअर इंडियाने फेब्रुवारी महिन्यात 38.3 लाख प्रवाशांना सेवा दिली आहे. बाजारातील 27 टक्के इतका वाटा उचलत एअर इंडिया दुसऱ्या क्रमांकावर राहिली आहे.
यापाठोपाठ स्पाईसजेट, अकासा एअर यांच्या विमानांतून अनुक्रमे 6.5 लाख, 4.5 लाख प्रवाशांनी फेब्रुवारी महिन्यात प्रवास केला होता. अकासाचा वाटा 4 टक्के तर स्पाईसजेटचा वाटा 3 टक्के इतका दिसून आला.