For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

पोटासाठी डोंबारी समाजाची रस्त्यावर कसरत; पारंपरिक सर्कशीची कला टिकविण्यासाठी तीन कुटुंबांचा संघर्ष

03:31 PM Nov 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
पोटासाठी डोंबारी समाजाची रस्त्यावर कसरत  पारंपरिक सर्कशीची कला टिकविण्यासाठी तीन कुटुंबांचा संघर्ष
Advertisement
कोल्हापूर : प्रतिनिधी : पारंपरिक सर्कशीची कला काळाच्या ओघात लुप्त होण्याच्या मार्गावर असताना, पोटाची खळगी भरण्यासाठी डोंबारी समाजातील तीन कुटुंबे कोल्हापूर शहरातील चौकांमध्ये रस्त्यावर कसरती सादर करत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातून आलेली ही कुटुंबे सायंकाळी सर्कशीचे विविध प्रयोग करून नागरिकांचे मनोरंजन करत आहेत. त्यांच्या या कसरतींना आबालवृद्धांकडून प्रतिसाद मिळत आहे.

रामू पवार, परमेश जाधव आणि सुरेश जाधव अशी या कुटुंबप्रमुखांची नावे आहेत. त्यांच्या कुटुंबातील महिला आणि लहान मुलेही सर्कशीतील कसरती सादर करतात. दोन पिढ्यांनी रस्त्यावर सर्कशीचे प्रयोग करत आयुष्य घालवले असून, तिसरी पिढीही हीच पारंपरिक कला पुढे नेत आहे.

Advertisement

पारंपरिक कला टिकविण्याची धडपड

करमणुकीची नवनवीन साधने उपलब्ध झाल्यामुळे पारंपरिक कलांकडे प्रेक्षकांचा ओढा कमी झाला आहे. काही वर्षांपूर्वी सर्कशीला मोठी गर्दी होत असे. मात्र, सर्कशीत वन्य प्राण्यांवर बंदी आल्यानंतर सर्कशीचे आकर्षण कमी झाले. उन्हाळ्याच्या सुट्टीत मोठ्या शहरांमध्ये सर्कशीचे तंबू उभारले जात असले, तरी पूर्वीप्रमाणे गर्दी होताना दिसत नाही. त्यामुळे पारंपरिक सर्कशीची कला टिकविणे हे कलाकारांसमोर मोठे आव्हान बनले आहे.

Advertisement

दिवसातून एकच खेळ; हजार ते बाराशे रुपयांची कमाई

कोल्हापुरातील चौकांमध्ये ध्वनिक्षेपकाच्या तालावर हे कलाकार विविध कसरती सादर करतात. तोंडाने सायकल उचलणे, नांगर उचलणे, गळ्याला लोखंडी बार लावून तो वाकवणे, तसेच उलट्या स्टूल आणि प्लास्टिकच्या मगावर बोकड व कुत्र्याला उभे करणे असे थरारक प्रयोग दाखवले जातात. रामू, परमेश आणि सुरेश हे जोकर बनून लहान मुलांची करमणूकही करतात.

दिवसातून सायंकाळी एकच खेळ सादर केला जातो. या एका खेळातून जेमतेम एक हजार ते बाराशे रुपयांची कमाई होते. याच उत्पन्नातून संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह केला जात आहे. रस्त्यावरच्या या सर्कशीच्या माध्यमातून पारंपरिक कला जिवंत ठेवण्याबरोबरच आपल्या पोटासाठी संघर्ष करणाऱ्या या कलाकारांचे जीवन अनेक प्रश्न उपस्थित करत आहे.

Advertisement
Tags :

.