दिल्लीतील डोंबाऱ्याचा खेळ !
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा अखेर राजीनामा देऊन अपेक्षेप्रमाणे आतिशी मारलीन सिंग यांची मुख्यमंत्रीपदासाठी निवड केली. राजकारणात सर्वच काही क्षेम असते असे नाही, राजकारणात अनेक चढाव-उतार हे असतातच. राजकारणात अनेक डावपेचही असतात. केजरीवाल गेले तीन महिने तिहार तुऊंगात होते. केंद्रातील भाजप सरकारने ‘लिकर गेट’ प्रकरणी त्यांच्या विरोधात सीबीआय आणि ईडीमार्फत जे गुन्हे नोंदवले त्यातून त्यांची अद्याप सुटका झालेली नाही. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना केवळ तात्पुरता जामीन दिलेला आहे, त्यांची जामिनावर सुटका झाली, याचा अर्थ त्यांच्यावरील आरोप गेले असा होत नाही. अनेक महिन्यांच्या तुऊंगवासानंतर सर्वोच्च न्यायालयाकडून केजरीवाल यांना हंगामी पद्धतीचा जामीन मंजूर झालेला आहे, मात्र त्यातून देखील एक वेगळेच राजकारण करू पाहणाऱ्या केजरीवाल यांनी दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देईन असे घोषित केले आणि मंगळवारी त्यांनी सायंकाळी राजीनामा दिला. तत्पूर्वी सकाळी मंत्रिमंडळातील अत्यंत विश्वासू असलेल्या आतिशी मारलीन सिंग यांची मुख्यमंत्रीपदासाठी निवड केली. कदाचित आज सायंकाळपर्यंत त्यांचा शपथविधीही होऊन जाईल आणि त्यातून दिल्लीला मिळणारी ही तिसरी महिला मुख्यमंत्री ठरणार आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी अद्याप सहा महिने शिल्लक आहेत आणि केजरीवाल यांनी जो राजकीय फासा टाकलेला आहे, त्यातून केजरीवाल यांचा डाव यशस्वी होईल काय ! हा अद्याप अनुत्तरित प्रश्न आहे. काही वृत्तवाहिन्यांच्या मते केजरीवाल यांचे सरकार प्रचंड बहुमताने विजयी होईल. केजरीवाल व त्यांचा पक्ष आप देखील असाच दावा करीत आहे. केजरीवाल यांनी तुऊंगात पडण्यापूर्वी किंवा तुऊंगात असताना देखील मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नव्हता हे वैशिष्ट्या. तुऊंगात असलेला मुख्यमंत्री राज्यकारभार चालवू शकतो, हा बहुदा पहिलाच प्रसंग असावा. भाजपने केजरीवाल यांच्यावर जोरदार टीका करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. तरीदेखील त्यावेळी त्यांनी राजीनामा दिलेला नव्हता. आता तुऊंगातून बाहेर आल्यानंतर कदाचित त्यांना नैतिकता आठवली असेल किंवा त्यांना तशी उपरती झाली असावी. त्यांनी आता मागाहून राजीनामा दिला हा निव्वळ राजकीय डाव आहे. यातून भाजपची अडचण नेमकी केवढी व कशी हे आताच कळणार नाही. केजरीवाल यांना पुन्हा सत्तेत यायचे आहे. राजकारणी फार हुशार असतात, त्यांना देशापेक्षा किंवा आपल्या राज्याच्या हीतापेक्षा स्वत:च्या सत्तेमध्ये जास्त रस असतो. केजरीवाल हे आपण राष्ट्रभक्त आहोत, असे वारंवार घोषित करतात मात्र नैतिकतेच्या आधारावर त्यांनी तुऊंगात असताना राजीनामा दिला नाही. त्यांना नैतिकतेचे ज्ञान नाही अशातला भाग नाही. राजकीय डाव खेळण्यांमध्ये त्यांना जास्त रस आहे हे या घटनेवरून सिद्ध होते. 2020 मधील विधानसभा निवडणुकीत केजरीवाल यांच्या ‘आप’ या राजकीय पक्षाला 70 पैकी 62 जागा प्राप्त झाल्या होत्या. गेल्या तीन निवडणुकीत केजरीवाल यांचा पक्ष दिल्लीमध्ये सत्तेवर येतोय. मात्र मागील तीनही लोकसभा निवडणुकीत जनतेने दिल्लीमध्ये भाजपलाच पूर्ण बहुमत प्राप्त करून दिलेले आहे. दिल्लीतील जनतेला स्थानिक पातळीवर सरकार आपचे हवे आहे तर राष्ट्रीय स्तरावर जनता पूर्णत: भाजपच्या बाजूने राहते हा देखील राजकारणातला एक वेगळा चमत्कार आहे. आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये देखील दिल्लीच्या जनतेच्या या निर्णयात फार मोठा बदल होईल असे वाटत नाही. आतिशी या प्रामाणिक आणि विश्वासू अशा आपच्या कार्यकर्त्या आणि अरविंद केजरीवाल यांच्या निकटच्या कार्यकर्त्या आहेत. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये पदव्युत्तर शिक्षण प्राप्त केलेल्या आतिशी यांनी 2020 च्या निवडणुकीत नवी दिल्लीत विजय प्राप्त केला आणि त्या मंत्री बनल्या. अवघ्या चार वर्षात त्या आज दिल्लीच्या मुख्यमंत्री बनताहेत. त्यांची मुख्यमंत्रीपदासाठी विधिमंडळ गटाने जेव्हा निवड केली, त्यानंतर त्यांनी जे निवेदन केले ते महत्त्वाचे आहे. त्या म्हणतात, अरविंद केजरीवाल हेच मुख्यमंत्री आहेत. आपण त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहे. जनतेला जे वाटते, देशातील राजकीय विश्लेषकांना जे वाटते त्यांच्याच मनातल्या विचारांची घडी आतिशी यांनी घातलेली आहे. दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री आतिशी यांचा कार्यकाळ केवळ सहा महिन्यांसाठीचाच आहे. केजरीवाल हे मंत्रिमंडळाच्याबाहेर असले तरी सारी सूत्रे त्यांच्याच हातात राहतील. आतिशी नाममात्र मुख्यमंत्री राहतील, आणि खरा कारभार आतिशी यांच्या नावावर केजरीवाल हेच चालवितील. अरविंद केजरीवाल यांची यामध्ये फार मोठी हुशारी दिसत नाही, परंतु ते इतर राजकारण्यांपेक्षा वेगळे राजकारणी नाहीत हे मात्र निश्चित. त्यांनी दिल्लीमध्ये नव्याने जो राजकीय डाव आखलेला आहे तो म्हणजे डोंबाऱ्याचा खेळ आहे. डोंबाऱ्याने ढोल वाजवायचे आणि वर दोरीवर एका मुलीने हातात लांब काठी घेऊन त्यावर कसरत करत जायचे आणि उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजवून तिचे स्वागत करायचे, हाच प्रकार राजकारणामध्ये आहे. केजरीवाल यापेक्षा वेगळे काय करीत आहेत?