भक्ती करण्याला बाप्पांच्या दृष्टीने फार महत्त्व आहे
अध्याय तिसरा
बाप्पा त्यांच्या भक्तांवर सारखंच प्रेम करत असतात. काही भक्तमंडळींना केलेल्या कर्माचं फळ हवं असतं तर काही भक्त फळाची अपेक्षा न करता कर्मयोगाच्या माध्यमातून बाप्पांची आराधना करून मोक्ष मिळवू इच्छित असतात. अर्थातच फळाची अपेक्षा व मोक्ष ही भिन्न उद्दिष्टे असल्याने भक्ताला त्यापैकी एकाची निवड करावी लागते. यापैकी जे मोक्षाची निवड करून फळ सोडायला तयार असतात ते योग्य मार्गावर असतात. असं जरी असलं तरी फळाची अपेक्षा करून जे भक्ती करतात त्यांना बाप्पा नाराज करत नाहीत. कोणत्याही कारणाने का होईना ते त्यांची भक्ती करत आहेत हेच बाप्पांच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. म्हणून त्यांना त्यांच्या भक्तीचे फळ म्हणून हवी असलेली वस्तू देऊन ते त्यांना आपलंसं करतात. निरपेक्ष भक्ती करून बाप्पांना प्रसन्न करून घेणे हा राजमार्ग आहे. ज्यांना फळाची अपेक्षा असते त्यांनी बाप्पांच्याकडे जाण्याचा लांबचा मार्ग निवडला असला तरी बाप्पा त्यांना समजून घेतात आणि त्यांच्या कलाकलाने घेऊन स्वत:च्या घरी घेऊन येतात.
काही भक्त बाप्पांना सोडून अन्य दैवतांची भक्ती करत असतात. ते हे लक्षात घेत नाहीत की, परमेश्वर हा निर्गुण निराकार आहे. बाप्पा हे त्याचे सगुण रूप आहेत. सरकार व्यवस्थित चालावे म्हणून विविध खात्यांची निर्मिती केली जाते आणि ती वेगवेगळी खाती नीट चालावीत म्हणून त्यांच्यावर एक प्रमुख नेमलेला असतो. त्या खात्याचा सर्व व्यवहार तो पहात असतो. त्याप्रमाणे बाप्पांनी अखिल विश्वाची निर्मिती केली असून त्याचे सर्व व्यवहार सुरळीत चालावेत म्हणून ब्रह्मा, विष्णू, महेश इत्यादि वेगवेगळ्या दैवतांची निर्मिती केलेली आहे. त्यांना त्यांची त्यांची कामे नेमून दिलेली आहेत. ही सर्व दैवते बाप्पांचीच विविध रूपे आहेत पण रजोगुणी लोकांना ती वेगवेगळी दैवते वाटतात. सदैव आपल्या मनासारखे व्हावे असे वाटत असल्याने ते इच्छित फल मिळावे म्हणून आपल्या मनाने त्यांची आराधना करत असतात. बाप्पा त्यानाही समजून घेतात. त्यांच्या अज्ञानाकडे दुर्लक्ष करून त्या दैवताच्या रूपात बाप्पाच त्यांना हवे ते देतात. हेच बाप्पा पुढील श्लोकात सांगत आहेत.
कुर्वन्ति देवताप्रीतिं काक्षन्त कर्मणां फलम् ।
प्राप्नुवन्तीह ते लोके शीघ्रं सिद्धिं हि कर्मजाम् ।। 17 ।।
अर्थ-कर्मांच्या फळाची आकांक्षा धरणारे अन्य देवतेला भजतात. त्यांना ह्या लोकी कर्मापासून उत्पन्न होणारी सिद्धि अल्पकाळात मिळते.
विवरण- पूर्वप्रारब्धानुसार माणसाची या जन्मातली कर्मे निश्चित होतात व त्यानुसार सात्विक, राजस किंवा तामसी असा त्यांचा स्वभाव असतो. सात्विक माणसाचा स्वभाव स्थिर असल्याने सर्व देव ही एकाच ईश्वराची रूपं आहेत ह्या व्यासमुनींनी सांगितलेल्या वचनावर त्यांची श्रद्धा असते आणि त्याप्रमाणे तो बाप्पांची मनोभावे पूजा करत असतो. राजसी माणसांच्या इच्छा कधीच संपत नाहीत. तसेच त्यांचा स्वभाव चंचल असल्याने त्यांची एका ठिकाणी श्रद्धा न जडता निरनिरळ्या ठिकाणी जडत असते. वेळोवेळी ती बदलतही असते. त्यामुळे त्यांना असे वाटते की बाप्पा सोडून अन्य दैवते आपली इच्छा पूर्ण करतील. त्यामुळे त्याच्या दृष्टीने त्याच्या इच्छा पूर्ण करणाऱ्या दैवताची तो फळाच्या अपेक्षेने आराधना करत असतो. प्रत्यक्ष ती बाप्पांचीच भक्ती होते. ज्याप्रमाणे पृथ्वीवर पडणारे पावसाचे सर्व पाणी ओहोळ, नद्या, नाले ह्यांच्यामधून वहात वहात जाऊन शेवटी समुद्राला मिळते त्याप्रमाणे कोणत्याही देवाची भक्ती केली तरी ती शेवटी बाप्पांची भक्ती असते. तर तामसी मनुष्य आपण करतोय तेच बरोबर असं समजून हट्टाने त्याला हव्या त्या दैवताची भक्ती करत असतो.
क्रमश: