Sangli News: 6 वर्षांच्या मुलावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला, सांगतीलीत धक्कादायक घटना
शाळेतून घरी परतत असताना अचानक दोन भटक्या कुत्र्यांनी बालकावर हल्ला
By : अक्रम शेख
सांगली : मिरजेतील रजा मशिदीजवळ राहणाऱ्या सहा वर्षांच्या एका बालकावर भटक्या कुत्र्याने हल्ला करून चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शाळेतून घरी परतत असताना अचानक दोन भटक्या कुत्र्यांनी बालकावर हल्ला केला. या हल्ल्यात मुलाच्या हाताला आणि कंबरेला गंभीर दुखापत झाली आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबल उडाली.
दरम्यान, हल्ला झाल्यानंतर बालकाला रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. परंतु भटक्या कुत्र्यांचा वावर या परिसरात वाढला असल्याने नागरिकांत भिती निर्माण झाली आहे. ही घटना घडल्यानंतर परिसरातील नागरिक व नातेवाईक संतप्त झाले असून त्यांनी महापालिकेच्या दुर्लक्षित कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. "डॉग व्हॅन आहे, पण ती कुठे आहे?" असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त लवकरात लवकर करण्यात यावा, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे. या प्रकारामुळे भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. भटक्या कुत्र्यांचा वाढता वावर नागरिक आणि लहान मुलांसाठी किती धोक्याचा आहे हे पालिकेने लक्षात घेवून तात्काळ यावर योग्य तो तोडगा काढवा अशी मागणी आता नागरिक करु लागले आहेत.