श्वानाकडून पिरॅमिड सर
इजिप्त या देशातील पिरॅमिडस् हे जगातील सात आश्चर्यांपैकी एक आश्चर्य मानले जाते. पूर्णत: वाळवंटी भूमीत, जिथे दूरदूरपर्यंत खडक दृष्टीलाही पडत नाहीत, तेथे अवाढव्य खडकांपासून बनलेली ही पिरॅमिडस् कशी निर्माण करण्यात आली असावीत, याचे नेमके उत्तर आजही सापडलेले नाही. काही पिरॅमिडस् इतकी उंच आहेत, की त्यांच्या टोकापर्यंत पोहचणे मानवासाठीही अवघड आहे. तथापि, मार्शल मोशर नामक एका पॅराशूटवीराला या पिरॅमिडस्च्या संदर्भात एक आगळेवेगळे दृष्ट दिसले आहे. त्याने ते सोशल मिडियावर पोस्टही केले आहे. तो इजिप्तमध्ये पॅराशूटच्या साहाय्याने उडत असताना त्याला खाली एका मोठ्या पिरॅमिडचे दर्शन झाले.
त्याचप्रमाणे या पिरॅमिडच्या शिखरावर एक श्वानही त्याला आढळून आला. पॅराग्लायडिंग करताना त्याला हा श्वान या पिरॅमिडवर अगदी लीलया चढत असल्याचेही दिसून आले. पॅराग्लाइयडिंग करत असतानाच त्याने या आश्चर्यकारक दृष्याचा व्हिडीओ बनविला. हा व्हिडीओ आज मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाला आहे. अनेकांना एक श्वान इतक्या उंच पिरॅमिडच्या टिक्कीपर्यंत पोहचल्याचे आश्चर्य वाटते. हा श्वान सुखरुप खाली उतरला की नाही, असा प्रश्नही अनेक नेडिझन्सनी विचारला आहे. तो सुरक्षितपणे खाली उतरु शकेल, अशी कित्येकांना शाश्वती वाटत नसल्याने त्यांनी, या श्वानाला वाचविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही केले आहे. एकंदर, जिथे मानवाला पोहचणे जटील आहे, तेथे एक श्वान पोहचल्यामुळे पिरॅमिडइतकीच प्रसिद्धी या श्वानालाही मिळत आहे.