बिबट्यासदृश प्राण्याकडून कुत्र्याचा फडशा
वाळवा :
वाळवा तालुक्यातील गोटखिंडी येथे ऊसतोड सुरू असताना तुटलेल्या ऊस फडामध्ये मृतावस्थेत कुत्रे आढळून आले. या कुत्र्याचे पोट संपूर्णपणे फाडले होते. कुत्र्याचा बिबट्याने फडशा पाडला असल्याचा संशय व्यक्त होत आहे. येथील संजय रघुनाथ कुलकर्णी यांच्या शेतामध्ये दोन दिवसांपासून ऊसतोड सुरू होती. ऊसतोडीसाठी सकाळी ऊसतोड मजूर शेतात गेले असता त्यांना कुत्र्याचा फडशा पाडल्याचे दिसले शेतकऱ्यांना व शेतमजुरांना कामासाठी नियमित शेतात जावे लागते. परंतु वारंवार बिबट्याचे दर्शन घडत असल्यामुळे शेतकरी व शेतमजुरांच्यामध्ये भीतीचे वातावरण आहे. गेल्या अनेक दिवसापासून बिबट्याचा वावर या परिसरात असला तरी, बिबटयाला पकडून नेण्यासाठी काहीतरी केले पाहिजे. अशी मागणी लोकांच्यातून होत आहे. बिबट्याच्या भीतीने ऊसतोड मजूर, शेतकरी यांच्यामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. गोटखिंडीला डोंगर परिसराच्या रांगा असल्यामुळे बिबट्या तसेच अन्य रानटी प्राण्यांचा वावर आहे.