बाजारावरील टांगती तलवार कायम?
जागतिक भूराजकीय संघर्षाच्या धगधगत्या ज्वाला आणि अनिश्चिततेच्या धुक्यात हरवलेला वित्त बाजार सध्या एखाद्या थरारक चित्रपटाच्या क्लायमॅक्ससारखा भासू लागला आहे, जिथे प्रत्येक नवा दिवस गुंतवणूकदारांच्या काळजाचा ठोका चुकवणारी बातमी घेऊन येतो. मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीने केवळ सीमाच नव्हे, तर जागतिक अर्थव्यवस्थेचा पायाच हादरवून सोडला असून, अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षाची टांगती तलवार बाजाराच्या मानेवर सतत फिरत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेली शस्त्रसंधीची मुदत 10 दिवसांनी वाढवून तात्पुरता दिलासा दिला असला, तरी हा केवळ वादळापूर्वीचा शांत काळ असल्याची भीती विश्लेषकांना सतावत आहे.
हॉर्मुझची सामुद्रधुनी, जी जागतिक व्यापाराचा कणा मानली जाते, ती सध्या युद्धसदृश परिस्थितीमुळे जवळपास ठप्प झाल्यासारखी आहे. याचा थेट परिणाम कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर झाला असून ब्रेंट क्रूडचे दर प्रति बॅरल 108 डॉलरच्या आसपास स्थिर राहिल्याने जगभरात महागाईचा भस्मासुर पुन्हा डोके वर काढत आहे. जेव्हा जेव्हा तेल महागते, तेव्हा उत्पादन खर्च वाढतो आणि पर्यायाने मध्यवर्ती बँकांना व्याजदर कपातीचा विचार सोडून ते वाढवण्याकडे वळावे लागते, ही धास्ती सध्या बॉण्ड मार्केटमध्ये स्पष्टपणे उमटताना दिसत आहे. अमेरिकेच्या 10 वर्षांच्या रोख्यांचा परतावा 4.42 टक्क्यांपर्यंत पोहोचणे आणि जपानमध्ये 1995 नंतरची सर्वात मोठी परतावा वाढ होणे, हे संकेत गुंतवणूकदारांना सुरक्षित मालमत्तांकडे वळण्यास भाग पाडत आहेत. गेल्या 50 वर्षांतील मोठी घसरण अनुभवणारे सोने देखील सध्या अपेक्षित खरेदीला गवसणी घालू शकलेले नाही, जे बाजारातील तीव्र अविश्वास अधोरेखित करते.
एमएससीआय ऑल कंट्री वर्ल्ड इंडेसची 2022 नंतरची सर्वात खराब कामगिरी पाहता, जागतिक बाजार सध्या एका बाजूला शस्त्रसंधीची आशा आणि दुसऱ्या बाजूला महागाईचा विळखा अशा दोन टोकांच्या दरम्यान हिंदोळे घेत आहे. याचे परिणाम भारतीय शेअर बाजारात अतिशय आक्रमकपणाने दिसून आले आहेत. बाजार थोडा सावरल्याचा भास निर्माण होतो, ज्यामुळे नवीन गुंतवणूकदार आकर्षित होतात, परंतु प्रत्येक वेळी ही आशा फोल ठरून विक्रीचा दबाव आक्रमकपणे परतत आहे. यामुळे विशेषत: अल्पकालीन गुंतवणूकदार आणि ‘लिव्हरेज’ घेऊन ट्रेडिंग करणाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
23 ते 27 मार्च या आठवड्यात भारतीय बाजारात विक्रीची त्सुनामी दिसून आली. सलग पाचव्या आठवड्यात घसरण नोंदवणाऱ्या प्रमुख निर्देशांकांनी गुंतवणूकदारांचे कंबरडे मोडले असून, केवळ 27 मार्चच्या एकाच दिवशी बाजारात नऊ लाख कोटी रुपयांची धूळधाण उडाली. साप्ताहिक स्तरावर निफ्टीने 2.09 टक्क्यांची मोठी घसरण नोंदवत 22,819.60 ची पातळी गाठली, तर सेन्सेक्स 1,690 अंकांनी कोसळून 73,583.22 वर स्थिरावला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांची अवस्था तर अधिकच केविलवाणी झाली असून, ते अनुक्रमे 2.2 आणि 1.7 टक्क्यांनी खाली आले आहेत. बँक निफ्टीमध्येही मोठी पडझड होऊन तो 51,500 या महत्त्वाच्या आधार पातळीच्या दिशेने वाटचाल करत आहे. या घसरणीचे मूळ कारण विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा विक्रीचा मारा. मार्च महिन्यामध्ये एफपीआयनी भारतीय बाजारातून तब्बल 11 अब्ज डॉलर म्हणजेच 1 लाख कोटी रुपयांहून अधिक भांडवल काढून घेतले आहेत. ही ऑटोबर 2024 नंतरची सर्वात मोठी विक्री ठरली असून, यामुळे बाजाराचे एकूण मूल्य ऐतिहासिक सरासरीपेक्षा खाली घसरले आहे. निफ्टीचे मूल्यांकन सध्या 12 महिन्यांच्या फॉरवर्ड पी/ई नुसार 17.4 पट आहे, जे त्याच्या 5 वर्षांच्या सरासरी 20 पटापेक्षा कमी झाले आहे. तरीही, केवळ भारतातच नव्हे तर तैवान आणि दक्षिण कोरियासारख्या आशियाई बाजारांतूनही विदेशी गुंतवणूकदारांनी मोठी रक्कम काढून घेतली आहे. सध्या विदेशी गुंतवणूकदारांकडे भारतीय शेअर बाजारातील एकूण गुंतवणुकीचा 15 टक्के वाटा म्हणजेच सुमारे 710 अब्ज डॉलर इतके भांडवल आहे.
रुपयाच्या ऐतिहासिक अवमूल्यनाने देखील यात भर घातली असून तो 94.82 या नीचांकी स्तरावर पोहोचल्यामुळे आयातीचा खर्च वाढून भारतीय कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा मोटर्स आणि बजाज फायनान्स यांसारख्या दिग्गज कंपन्यांचे समभाग 4 ते 5 टक्क्यांनी कोसळल्याने लार्जकॅप निर्देशांकात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. केवळ ओएनजीसी सारख्या तेल उत्पादक कंपन्या आणि टीसीएस, विप्रो सारख्या निवडक आयटी समभागांनी या घसरणीच्या काळातही आपला किल्ला लढवला आहे, मात्र तो एकूण बाजाराला सावरण्यासाठी पुरेसा ठरला नाही.
30 मार्चपासून सुरू होणारा नवा आठवडा हा व्यवहारांच्या दृष्टीने अत्यंत छोटा असणार आहे. मंगळवारी 31 मार्च रोजी महावीर जयंती निमित्त आणि शुक्रवारी 3 एप्रिल रोजी गुड फ्रायडे निमित्त शेअर बाजाराचे व्यवहार बंद राहणार असल्याने, गुंतवणूकदारांना केवळ तीन दिवसांच्या कामकाजात आपली रणनीती आखावी लागेल. या मर्यादित काळात बाजाराची संपूर्ण दिशा ही डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या 10 दिवसांच्या मुदतीवर इराण काय प्रतिक्रिया देतो, यावर अवलंबून असेल.
टेक्निकल चार्टनुसार निफ्टीसाठी 22,800 हा स्तर टिकवून ठेवणे अनिवार्य आहे. जर ही पातळी ओलांडून निफ्टी खाली गेला तर ही घसरण थेट 22,450 ते 22,200 पर्यंत जाऊ शकते. तसे झाल्यास या वर्षातील तो सर्वात मोठा नीचांक ठरेल. डेली चार्टवर ‘लॉन्ग बेअर कॅन्डल’ आणि आरएसआयवरील नकारात्मक कल पाहता, बाजारात प्रत्येक उसळीवर विक्री करण्याचे (सेल ऑन राईज) धोरण तज्ञांकडून सुचवले जात आहे. जोपर्यंत निफ्टी 23,200 ची पातळी निर्णायकपणे पार करत नाही, तोपर्यंत बाजारात मोठी खरेदी येण्याची शक्यता धूसर आहे. बँक निफ्टीसाठी 51,500 हा महत्त्वाचा आधार असून 53,400 ते 53,700 ही अडथळा पातळी आहे. गिफ्ट निफ्टीने घसरण दर्शवत शुक्रवारी विसावा घेतला आहे. शुक्रवारी बाजार बंद झाल्यानंतर इराणने वाढवलेली हल्ल्यांची मालिका आणि इस्राईलने केलेले हल्ले, तसेच ट्रम्प यांचे ‘पुढचा नंबर क्युबाचा आहे’ हे विधान यांमुळे बाजारावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता दिसते.
‘एसबीआय‘ सिक्युरिटीजचे टेनिकल आणि डेरिव्हेटिव्ह रिसर्च हेड सुदीप शाह यांनी मनीकंट्रोलला दिलेल्या मुलाखतीत आगामी काळासाठी काही समभागांची शिफारस केली आहे. त्यानुसार ल्युपिन या समभागाने 2,240 ते 2,260 च्या स्तरावरून चांगली सुधारणा दाखवली आहे. तसेच ‘अँथम बायोसायन्सेस‘ या समभागाने 649 ते 625 ची श्रेणी ओलांडून ब्रेकआउट दिला आहे. ‘एमयुअर फार्मा’ या शेअरने ‘हेड अँड शोल्डर्स’ पॅटर्नचा यशस्वी ब्रेकआउट दिला असून 1,580 रुपयांच्या वर असेपर्यंत यात तेजीचा कल कायम राहील. ‘सुप्रीम पेट्रोकेम’मध्येही सकारात्मक कल दिसून येत आहे.
कच्च्या तेलाचे दर जर 108 डॉलरच्या खाली घसरले आणि रुपयाच्या मूल्यात थोडी सुधारणा झाली, तरच बाजारात खालच्या स्तरावरून काही प्रमाणात रिकव्हरी पाहायला मिळू शकते. गुंतवणूकदारांनी सध्याच्या परिस्थितीत घाईने गुंतवणूक करण्याऐवजी 31 मार्चच्या लोजिंगचा आणि एप्रिलच्या सुरुवातीच्या जागतिक संकेतांचा अभ्यास करूनच सावध पवित्रा घेणे हिताचे ठरेल. अनेक तज्ञ सध्या बाजारापासून दूर राहा आणि संयम बाळगा असे सांगत आहेत. कारण पॅनिक सेलिंगने नंतर पश्चाताप करण्याची वेळ येते, असे इतिहास सांगतो.
- संदीप पाटील शेअर बाजार अभ्यासक