बेंगळूरमधील बनावट औषध रॅकेटचे विविध राज्यांशी कनेक्शन?
कर्नाटक औषध नियंत्रण विभागाने दिलेल्या माहितीच्या आधारे सतर्कता : तपासणी करण्याची सूचना
त. भा. प्रतिनिधी/ बेंगळूर :
बेंगळूरच्या तावरकेरे येथील बिडदीनजीक उघडकीस आलेले बनावट औषधांचे जाळे देशातील अनेक राज्यांमध्ये पसरल्याचा संशय आहे. कर्नाटक औषध नियंत्रण विभागाने दिलेल्या माहितीच्या आधारे, देशातील सर्व राज्यांमधील औषध नियंत्रक (ड्रग्ज कंट्रोलर) आणि राज्य परवाना प्राधिकरणांना सतर्क करण्यात आले आहे. बेंगळूरमधील बनावट औषध रॅकेटचे मुंबई, तेलंगणा आणि हिमाचल प्रदेशसह अनेक राज्यांशी कनेक्शन असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कर्नाटक औषध जागृती दलाचे 18 ऑगस्ट रोजी बेंगळूर दक्षिण जिल्ह्यातील बिदाडीनजीकच्या कुरुबरहळ्ळी येथील परवाना नसलेल्या औषध निर्मिती युनिटवर छापा टाकला होता. यावेळी बनावट औषधांचा मोठ्या प्रमाणात साठा, पॅकेजिंग मशीन, रिकाम्या बाटल्या आणि बनावट लेबल्स जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या ऐवजाचे अंदाजित मूल्य 5,05,49,575 रुपये आहे.
सर्व राज्यांना सतर्कतेचा इशारा
बेंगळूरमधील बनावट औषधे निर्मिती प्रकरण आंतरराज्यीय स्तरावर कार्यरत असल्याच्या संशयावरून कर्नाटक औषध गुणवत्ता विभागाने देशातील सर्व राज्यांच्या औषध नियंत्रकांना पत्र पाठविले आहे. तुमच्या राज्यात संशयास्पद लेबल असलेली कोणतीही औषधे आढळल्यास किंवा कर्नाटकात बंदी घातलेल्या बॅचमधील कोणतीही औषधे आढळल्यास तत्काळ माहिती द्यावी, अशी सूचना देण्यात आली आहे.
राज्यातील खासगी इस्पितळे, मेडिकल स्टोअर्स आणि औषध वितरकांनाही इशारा देण्यात आला असून, बंदी घातलेल्या बॅचमधील औषधे वापरली जात आहेत का, हे तपासण्यास सांगण्यात आले आहे.
राज्याचे अतिरिक्त औषध नियंत्रक डॉ. उमेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, इतर राज्यांना प्रमुख घाऊक औषध बाजारपेठा, वितरण केंद्रे आणि किरकोळ मेडिकल दुकानांमध्ये तात्काळ तपासणी करण्याची सूचना देण्यात आली आहे. ‘झ्gग्zाd’ नावाने कोणताही संशयास्पद किंवा नोंद नसलेला औषधांचा साठा आहे का, हे तपासण्यास सांगण्यात आले आहे. महागडी औषधे विकणाऱ्या वितरकांच्या औषधांच्या खरेदी-विक्रीच्या नोंदी आणि स्रोताच्या नोंदी तपासण्याचे निर्देश दिले आहेत.
तेलंगणा आणि हिमाचल प्रदेशातील उत्पादन केंद्रांमधून स्वस्त जेनेरिक औषधे मिळवून, बेंगळूरच्या बिडदीजवळील परवाना नसलेल्या युनिटमध्ये ती नवीन बाटल्यांमध्ये भरली जात होती, त्यावर बनावट लेबल्स लावले जात होत आणि महागडी औषधे म्हणून विकली जात होती, अशी माहिती समोर आली आहे.
महागडी औषधे लक्ष्य
बनावट औषधे तयार करणाऱ्या या नेटवर्कमध्ये कर्करोगासह गंभीर आजारांच्या उपचारांमध्ये वापरल्या जाणाऱ्या महागड्या इंजेक्शन्सनाही लक्ष्य केले जात होते. बनावट औषधांमुळे रुग्णांच्या जीवाला थेट धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन हॉस्पिटल्स आणि डॉक्टरांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कर्करोगतज्ञ, डॉक्टर आणि औषध विक्रेत्यांना महागड्या औषधांचे पॅकेजिंग तपासण्याचा सल्ला देण्यात आला आहे. संशयास्पद पॅकेजिंग, बॅच रेकॉर्डचा अभाव किंवा संशयास्पद स्रोताचा साठा आढळल्यास, तो तत्काळ जप्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
तपासणीसाठी सूचना
या प्रकरणाचा तपास सुरू असताना, देशातील विविध राज्यांमध्ये बाजारपेठांची तपासणी करून त्याचे अहवाल आणि माहिती एकमेकांना देण्याचे निर्देश दिले आहेत. याच्या माध्यमातून, औषध नियंत्रण विभागाने बनावट औषध नेटवर्कचे संपूर्ण जाळे शोधून काढण्यासाठी सामाईक मोहीम राबवण्याचे प्रयत्न चालविले आहेत.
केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना पत्र : यु. टी. खादर
राज्यात सापडलेले बनावट औषधांचे नेटवर्क आंतरराज्यीय स्वरूपाचे आहे. हे नेटवर्क शोधून काढण्याबाबत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे, असे आरोग्यमंत्री यु. टी. खादर यांनी सांगितले. बनावट औषधांचे रॅकेट केवळ कर्नाटकातच नव्हे, तर इतर राज्यांमध्येही विस्तारले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या रॅकेटचा बिमोड केला पाहिजे. त्यामुळे मी या संदर्भात केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. मी काही संबंधित राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांनाही पत्र लिहिले आहे, असे यु. टी. खादर यांनी म्हटले आहे.
औषधांवर क्यूआर कोड येणार
बनावट औषधांचा प्रसार रोखण्यासाठी आणि जनतेच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी आरोग्य खात्याने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. औषधे खरी आहेत की बनावट, हे ग्राहकांना सहजपणे तपासता यावे, यासाठी औषधांवर क्यूआर कोड लावण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन आहे. औषध खरेदी करताना त्यावरील क्यूआर कोड मोबाईलवर स्कॅन करता येईल. औषधाच्या पॅकेटवरील माहिती आणि क्यूआर कोडमधून उपलब्ध होणारी माहिती यांची तुलना करून ते औषध खरे आहे की बनावट, हे ठरवणे शक्य होईल. बनावट औषधांच्या वापरामुळे रुग्णांच्या आरोग्यावर होणाऱ्या गंभीर परिणामांच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य खात्याने हे पाऊल उचलले आहे. औषध विक्री प्रणालीमध्ये पारदर्शकता वाढवणे आणि बनावट औषधांच्या व्यवसायाला आळा घालणे, हा यामागचा उद्देश आहे.