For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बंदोबस्त करणे म्हणजे कुत्र्यांना मारायचे का?

10:59 AM May 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
बंदोबस्त करणे म्हणजे कुत्र्यांना मारायचे का
Advertisement

मानव हक्क वकील असोसिएशनच्या निर्णयावर बेळगाव अॅनिमल रेस्क्यू अॅण्ड केअर संस्थेचा आक्षेप

Advertisement

बेळगाव : कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या घटना वाढल्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा मानव हक्क वकील असोसिएशनच्या निर्णयावर बेळगाव अॅनिमल रेस्क्यू अॅण्ड केअर (बार्क) या संस्थेने आक्षेप घेतला आहे. याबद्दल या संस्थेच्या अध्यक्षा अपूर्वा चिक्कमठ यांनी ‘कुत्र्यांचा बंदोबस्त करणे म्हणजे नेमके काय करायचे?’ असा प्रश्न विचारला आहे. बंदोबस्त करणे म्हणजे कुत्र्यांना मारायचे, असा अर्थ घ्यायचा का? असे विचारून त्यांनी पुढे म्हटले आहे की, घटनेच्या 428 व 429 कलमांद्वारे मुक्या प्राण्यांनादेखील अधिकार आहेत व मुक्या प्राण्यांविषयी लोकांनी दया दाखवावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. हे वकिलांना नक्कीच माहीत असेल, अशी अपेक्षा आहे. भटक्या कुत्र्यांच्या समस्यांचे मूळ हे शासनाचे अपयश आहे, त्याचबरोबर समाजाचेही अपयश आहे. भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी नसबंदीसारख्या शस्त्रक्रियांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज आहे. त्यासाठी सरकारकडून भरपूर निधी उपलब्ध असतो. परंतु, निरपेक्ष भावनेने हा निधी महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी याच कामासाठी वापरत असतील, अशी आशा करणे हा भाबडेपणा ठरेल. बेळगावमध्ये बार्क ही संस्था मुक्या प्राण्यांसाठी निरपेक्ष भावनेतून अतिशय उत्तम कार्य करते. जखमी प्राण्यांवर उपचार असोत किंवा भटक्या कुत्र्यांवर नसबंदीच्या शस्त्रक्रिया असोत, आमच्या संस्थेने सुमारे 200 हून अधिक कुत्र्यांवर नसबंदीच्या शस्त्रक्रिया जवळजवळ मोफत केल्या आहेत. हे सांगायला मला अभिमान वाटतो. असे सांगून अपूर्वा यांनी म्हटले आहे,

की यासाठी येणारा खर्चदेखील आमच्या संस्थेचे सभासद, तसेच मुक्या प्राण्यांवर निरपेक्ष प्रेम करणारे बेळगावमधील सुजाण नागरिक उचलतात व यासाठी आम्ही त्यांचे ऋणी आहोत. तसे पाहता ही जबाबदारी महानगरपालिकेचीच आहे. पण कसलीच अपेक्षा न करता प्राणीप्रेमी लोकांच्या सहकार्याने जे कार्य करत आहेत, त्याला मदत करण्याऐवजी मानव हक्क वकील संघटनेने जी मुक्ताफळे उधळली आहेत, ती म्हणजे ‘भीक नको पण कुत्रा आवर’ असे म्हणण्याजोगीच आहेत. बार्क संस्थेच्या कार्याला महानगरपालिकेने आर्थिक साहाय्य करणे अपेक्षित आहे. शिवाय प्रत्येक वॉर्डमधील नगरसेवकाला या उपक्रमामध्ये सहभागी करून घ्यावे. जेव्हा-जेव्हा आमच्याकडे नसबंदीचे शिबीर असते, तेव्हा-तेव्हा संबंधित वॉर्डमधील भटक्या कुत्र्यांना शिबिरापर्यंत आणण्यासाठी आमच्या स्वयंसेवकांना नगरसेवकांनी मदत करायला हवी. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये गरुड, नंदी, गाय, श्वान हे वेगवेगळ्या देवतांचे वाहन आहेत. आपली दैवते जर प्रिय असतील तर त्या दैवतांना प्रिय असणाऱ्या मुक्या प्राण्यांना आपुलकीने वागवणे, तसेच त्यांना अन्नपाणी देणे ही आपली जबाबदारी आहे. पाश्चात्य देशांमध्ये या प्राण्यांसाठी विशेष व्यवस्था असते व तेथूनच आपल्याला प्राणी दत्तक घ्यावे लागतात. भारतामध्ये मात्र कुत्री तहानभूकेने त्रस्त होऊन दारोदारी फिरताना दिसतात. जे हौसेखातर श्वानांच्या वेगवेगळ्या प्रजाती घरी बाळगतात, अशा श्रीमंतांनी आपल्या पाळीव प्राण्यांसाठी होणाऱ्या खर्चापैकी 10 टक्के खर्च सामाजिक बांधिलकी म्हणून मुक्या प्राण्यांच्या उपचारासाठी व अस्तित्वासाठी करावा. ही मदत बार्कला किंवा मुक्या प्राण्यांसाठी कार्य करणाऱ्या कोणत्याही संस्थेला द्यावी, असे सुचवण्यात आले आहे.

Advertisement

...तर हरकत नसावी

एखाद्या कुत्र्याला रेबीज झाला तर अशा कुत्र्याला मारण्याबद्दल कोणाचीच हरकत नसावी. पण सरसकट मुक्या प्राण्यांना केवळ ते भटके आहेत म्हणून त्यांना मारण्याला बेळगावचे सुजाण नागरिक विरोध करतील, असा विश्वासही बार्कने व्यक्त केला आहे.

Advertisement
Tags :

.