महाराष्ट्राच्या धामणेकडून डोडीग पराभूत
वृत्तसंस्था / बेंगळूर
येथे सुरू झालेल्या एटीपी टूरवरील 2026 च्या दहाव्या बेंगळूर खुल्या पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्राचा 18 वर्षीय टेनिसपटू मानस धामणेने क्रोएशियाच्या सिडेड मॅटेज डोडीगला पराभवचा धक्का देत एकेरीत उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. याशिवाय भारताच्या सुमित नागलनेही दुसरी फेरी गाठली आहे.
पुरूष एकेरीच्या झालेल्या सामन्यात सातऱ्याच्या मानस धामणेने क्रोएशियाच्या पाचव्या मानांकीत डोडीगचा 7-5, 4-6, 6-1 अशा सेट्समध्ये पराभव करत पुढील फेरीत प्रवेश मिळविला. या लढतीत मानसने पहिला सेट जिंकून डोडीगवर आघाडी मिळविताना बेसलाईन खेळावर अधिक भर दिला होता. मात्र डोडीगने अनुभवाच्या जोरावर दुसरा सेट 6-4 असा जिंकून बरोबरी साधली. दरम्यान तिसऱ्या आणि शेवटच्या सेट्समध्ये डोडीगला आपली सर्व्हिस राखता आली नाही. मानसने वेगवान सर्व्हिस आणि फोरहॅन्ड फटक्यावर डोडीगचे आव्हान 6-1 असे संपुष्टात आणले.
या स्पर्धेतील अन्य एका सामन्यात भारताच्या सुमित नागलने आपल्याच देशाच्या प्रज्वल देवचा 6-3, 6-3, फ्रान्सच्या मॅटो मार्टिनेयुने तृतिय मानांकीत जाय क्लार्कचा 4-6, 6-1, 6-2, द्वितीय मानांकीत हेरॉल्ड मेयॉटने तसेच सहाव्या मानांकीत स्केटोव्ह आणि डेन मार्टिन यांनी प्रतिस्पर्ध्यांवर विजय नोंदवित पुढील फेरी गाठली.