दोडामार्ग पत्रकार समितीचा यशस्वी उद्योजक पुरस्कार राजू भोसले यांना जाहीर
दोडामार्ग - वार्ताहर
दोडामार्ग तालुका पत्रकार समितीचा यशस्वी उद्योजक पुरस्कार राजू भोसले यांना तर युवा उद्योजक पुरस्कार बाबा टोपले यांना जाहीर करण्यात आला आहे. तर उदयोन्मुख पत्रकार पुरस्कार लवू परब यांना तर उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार प्रभाकर धुरी यांना जाहीर करण्यात आला आहे. पत्रकार समितीचे अध्यक्ष संदीप देसाई व सचिव गणपत डांगी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडल्यानंतर या पुरस्कारांची घोषणा केली आहे. पुरस्काराचे वितरण फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्यवरांच्या हस्ते केले जाणार आहे.
येथील श्री सिद्धिविनायक मंदिरात अध्यक्ष संदीप देसाई यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी समितीची बैठक झाली. यावेळी सचिव गणपत डांगी, उपाध्यक्ष तेजस देसाई, खजिनदार रत्नदीप गवस,प्रभाकर धुरी, वैभव साळकर, लखू खरवत, संदेश देसाई, समीर ठाकूर, लवू परब आदी उपस्थित होते. चालू वर्षीपासून समितीने यावेळी उद्योजकता व उत्कृष्ठ प्रशासकीय सेवा या क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देण्याची संकल्पना अध्यक्ष संदीप देसाई यांनी मांडली. त्यानुसार दोडामार्ग शहरातील कन्स्ट्रक्शन व सामाजिक क्षेत्रात योगदान देणारे उद्योजक व बिल्डर सिद्देश उर्फ राजू भोसले यांची तर युवा उद्योजक, गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर व सामाजिक सेवेत योगदान देणाऱ्या भेडशी गावचे सुपुत्र बाबा टोपले यांची निवड करून त्या दोघांना यावर्षीचा 'यशस्वी उद्योजक पुरस्कार २०२४' जाहीर करण्यात आला. प्रभाकर धुरी गेली २५ वर्षे पत्रकारितेत आहेत. त्यांना यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघाचा आदर्श पत्रकार पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार आणि मसुरे, मालवण येथील संस्थेचा राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार प्राप्त झाला आहे. तर लवू परब यांनी कोकणसाद मधून आपल्या पत्रकारितेला नवी झळाळी दिली आहे. तर उत्कृष्ट प्रशासकीय सेवा पुरस्कार दोडामार्ग येथील सार्वजनिक बांधकामचे उपअभियंता अनिल बडे यांना जाहीर करण्यात आला आहे.