For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

डॉक्टरांना धमकाविले नाही : ममता बॅनर्जी

07:00 AM Aug 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
डॉक्टरांना धमकाविले नाही   ममता बॅनर्जी
Advertisement

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांना द्यावे लागले स्पष्टीकरण : आंदोलन योग्यच

Advertisement

वृत्तसंस्था/कोलकाता

पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील आरजी कर वैद्यकीय महाविद्यालयात महिला डॉक्टरवर झालेल्या बलात्कार तसेच हत्या प्रकरणावरून राज्यात राजकीय गदारोळ निर्माण झाला आहे. तर पीडितेला न्याय मिळवून देणे आणि डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी योग्य कायदा आणण्याच्या मागणीवरुन डॉक्टर्स निदर्शने करत आहेत. डॉक्टरांच्या आंदोलनावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वत:ची भूमिका मांडली आहे. संप करणाऱ्या डॉक्टरांची मागणी योग्य आहे. डॉक्टरांचा संप आणि निदर्शनांमध्ये मी त्यांच्यासोबत असल्याचा दावा ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी केला आहे. ममता बॅनर्जी यांनी आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांना धमकाविले असल्याचा आरोप भाजपने केला होता.

Advertisement

काही मुद्रित, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमांमध्ये दुष्प्रचार मोहीम पाहिली आहे. बुधवारी विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमात मी केलेल्या भाषणासंबंधी हा दुष्प्रचार चालविला जात आहे. मी विद्यार्थी (वैद्यकीय) किंवा त्यांच्या आंदोलनाच्या विरोधात एक शब्दही उच्चारलेला नाही हे मी स्पष्ट करू इच्छिते. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. त्यांचे आंदोलन योग्य आहे. मी कधीच या विद्यार्थ्यांना धमकाविलेले नाही. माझ्यावर केले जाणारे आरोप हे पूर्णपणे खोटे असल्याचा दावा ममता बॅनर्जी यांनी केला आहे.

भाजपविरोधात मी बोलले आहे. भारत सरकारच्या समर्थनाने भाजप आमच्या राज्यातील लोकशाही संकटात आणू पाहत आहे. तसेच राज्यात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपने चालविला आहे. केंद्र सरकारच्या समर्थनाने भाजप नेते अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्यानेच मी त्याच्या विरोधात आवाज उठविला असल्याचे स्पष्टीकरण ममता बॅनर्जी यांनी दिले आहे.

बुधवारी केलेल्या भाषणात मी ‘फोंश करा’ या शब्दांचा वापर केला होता. हे शब्द श्री रामकृष्ण परमहंस देव यांच्याशी संबंधित आहेत. महान संताने कधीकधी स्वत:चा आवाज उठविण्याची गरज असते असे सांगितले होते. गुन्हे आणि गुन्हेगारी कृत्ये होतात, तेव्हा विरोधात आवाज उठवावा लागतो. त्या मुद्द्यावर माझे भाषण याच संदर्भाने होते असा दावा ममता बॅनर्जी यांनी केला आहे. भाजपच्या बंगाल बंदवरून ममता बॅनर्जी यांनी बुधवारी कठोर टिप्पणी केली होती. बंगालमध्ये जर आग लावली तर याचा प्रभाव आसाम, ईशान्य, उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशा आणि दिल्लीतही दिसून येईल असा इशारा मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी दिला होता.

मोदींवर साधला निशाणा

आरजी कर रुग्णालयातील घटनेप्रकरणी ममता बॅनर्जी यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विद्यार्थी तसेच भाजपकडून केली जात आहे. यावर ममता बॅनर्जी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. उत्तरप्रदेश, आसाम, मध्यप्रदेश, मणिपूर आणि आसाममध्ये महिलांवर अत्याचार रोखण्यास अपयश आल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजीनामा का दिला नाही अशी विचारणा मी भाजपला करू इच्छिते. आसाममध्ये चकमकीत केवळ एकाच आरोपीला ठार का करण्यात आले असा माझा प्रश्न असल्याचे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

बांगलादेशबद्दल प्रेम परंतु...

काही लोकांना हे बांगलादेश असल्याचे वाटते. मला बांगलादेशबद्दल प्रेम आहे. कारण ते आमच्यासारखे बोलतात, आमची संस्कृतीही मिळतीजुळती आहे. परंतु बांगलादेश स्वतंत्र देश आहे आणि भारत एक वेगळा देश आहे हे आठवणीत ठेवा, मोदी हे कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणात स्वत:च्या पक्षाचा वापर करत बंगाल पेटवू पाहत आहेत. परंतु जर त्याहंनी बंगाल पेटविले, तर आसाम, उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशा आणि दिल्लीही पेटेल. आम्ही त्यांना खुर्चीवरून खाली खेचू असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.