पश्चिम बंगालमध्ये डॉक्टर्सचा इशारा
मागण्या अमान्य झाल्यास उपोषण,सरकारची कोंडी
वृत्तसंस्था / कोलकाता
पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेस सरकारने आमच्या मागण्या त्वरित मान्य केल्या नाहीत, तर आम्ही अनिश्चित काळासाठीचे उपोषण पुन्हा करु असा इशारा या राज्यातील डॉक्टरांनी दिला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी डॉक्टर संघटनेकडे चार महिन्यांच्या कालावधीची मागणी केली असून येत्या सोमवारी त्यांच्याशी चर्चा करण्याची तयारी दर्शविली आहे. तथापि, डॉक्टरांनी अद्याप सोमवारी चर्चा करण्याच्या प्रस्तावावर विचार नाही, असे स्पष्ट केले आहे.
अनेकदा इशारे देऊनही राज्य सरकारने डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाय केलेले नाहीत. त्यामुळे यापुढे आंदोलनाची व्याप्ती वाढविण्यात येणार असून पश्चिम बंगालमधील डॉक्टरांच्या संघटना इतर राज्यांमधील अशा संघटनांच्याही संपर्कात आहेत. देशव्यापी उपोषणाचा प्रारंभही केला जाऊ शकतो. त्यामुळे पश्चिम बंगाल सरकारने त्वरित मागण्या मान्य कराव्यात, असे प्रतिपादन करण्यात आले आहे.
मंगळवारपासून आंदोलन
राज्य सरकारने त्वरीत मागण्या मान्य केल्या नाहीत, तर येत्या मंगळवारपासून पुन्हा राज्यव्यापी आंदोलन छेडले जाईल. केवळ सरकारीच नव्हे, तर खासगी रुग्णालयांमधील डॉक्टर्सही संपावर जातील. त्यामुळे राज्य सरकारने आता अधिक ताणून धरु नये, अशा इशारा एक आंदोलक डॉक्टर देबाशीश हलदर यांनी दिला.
जनहिताच्या विरोधात नाही
डॉक्टर्स हे कोणत्याही प्रकारे जनहिताच्या विरोधात नाहीत. मागच्या वेळी आम्ही जनतेचे हित लक्षात घेऊनच राज्य सरकारवर विश्वास ठेवला होता आणि आंदोलन मागे घेतले होते. तथापि, आमची सुरक्षाही महत्वाची आहे. राज्य सरकारने आमच्या मागण्यांवर टाळाटाळ चालविली आहे. त्यामुळे आम्हाला पुन्हा आंदोलनाचे शस्त्र उपसावे लागत आहे, असे डॉक्टरांच्या संघटनांनी स्पष्ट केले आहे.
उपोषण सुरुच
डॉक्टरांनी कामाला प्रारंभ केला असला तरी, त्यांचे उपोषण सुरुच आहे. शनिवारी या उपोषणाचा 14 वा दिवस होता. या काळात दोन उपोषणकर्त्या डॉक्टरांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. आणखी चार डॉक्टर्सनाही प्रकृती अस्वास्थ्याची समस्या भेडसावत आहे. त्यामुळे त्यांनाही देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या राज्याच्या पालक असून आम्ही त्यांच्या अपत्यांप्रमाणेच आहोत. त्या आमच्या मागण्या मान्य करतील असा विश्वासही आंदोलनकर्त्या डॉक्टरांनी शनिवारी व्यक्त केला आहे.