डॉक्टर्सनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घ्यावे!
अन्यथा सेवेतून बडतर्फ करणार : आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचा इशारा
प्रतिनिधी/ म्हापसा
आरोग्य सेवेशी निगडित डॉक्टरांनी तंत्रज्ञानाशी जुळूवून घेणे गरजेचे आहे. काही डॉक्टर्स यातून कामचुकारपणा करू पाहत आहे. अशा डॉक्टरांची आता खैर नाही. जे कुणी याकडे लक्ष देऊ शकत नाही वा शिकू पाहत नाही त्या डॉक्टर्सना बडतर्फ करून त्याजागी नव्या तंत्रज्ञान असलेल्या डॉक्टर्सची नियुक्ती केली जाईल, असा स्पष्ट इशारा आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी दिला.
म्हापसा येथे आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य महाशिबिराच्या उद्घाटनप्रसंगी विश्वजित राणे बोलत होते. यावेळी उपसभापती जोशुआ डिसोझा, गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर, दंत महाविद्यालयाच्या डीन डॉ. आयडा नोरोन्हा, आरोग्य खात्याच्या संचालिका डॉ. रूपा नाईक, आरोग्य अधिकारी डॉ. गिरीश परब यांची उपस्थिती होती.
अत्याधुनिक यंत्रणा राज्यात उपलब्ध होणार
राज्यातील लोकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी त्यांना वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारचे सर्वतोपरी प्रयत्न आहेत. आरोग्यक्षेत्राशी निगडित अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध होणार आहे. यासाठी डॉक्टरांनी नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे गरजेचे आहे. यात कामचुकारपणा करू पाहणाऱ्या डॉक्टरांची आता खैर नाही, असे आरोग्य मंत्री विश्वजित राणे म्हणाले. पद्मश्री डॉ. अमित मायदेव यांची गोमेकॉत नियुक्ती केली जाणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
पुढील 15 दिवसांत म्हापशाच्या माध्यमातून राज्यात सेटलाईट ‘ओपीडी’ची सुऊवात करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिली. गोमेकॉचे डॉक्टर्स चांगले कार्य करीत आहेत. येथे कॅन्सरवर उपचार करण्यासाठी सुविधा पंतप्रधानांनी राज्याला दिली आहे. पहिल्या मजल्याचे काम पूर्ण झाले आहे. आता टाटा मेमोरियल इस्पितळाप्रमाणे गोमेकॉत या सुविधा राज्यात लोकांना उपलब्ध होणार आहे. सामान्य जनतेला स्वस्त वैद्यकीय सेवा व औषधे उपलब्ध करून देणार आहोत, असे मंत्री राणे म्हणाले.
‘स्टेट केअर’ ज्येष्ठ नागरिकांसाठी नवीन संकल्पना
पुढील तीन महिन्यांत ‘स्टेट केअर’ ही नवी संकल्पना घेऊन पुन्हा लोकांसमोर जाणार आहे. त्या माध्यमातून संपूर्ण गोवाभर ज्येष्ठ नागरिकांसाठी शिबिरे भरवली जाणार आहेत. गोव्यात हृदयविकारासंबंधित मृत्यू कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी योग्य ते निर्णय घेतले जातील. विद्यमान सरकार सर्वांच्या सेवेस तत्पर असून आता ज्येष्ठ नागरिकांकडेही त्यापरीने लक्ष दिले जाईल, असे आरोग्य मंत्री राणे म्हणाले.
100 रुग्णवाहिका ताफ्यात येणार
दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयातील रुग्णांवर अन्याय केला जाणार नाही. रुग्णांसाठी कार्डिओलोजीची सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. युरोलॉजी, आयसीयुचे नूतनीकरण केले जाईल. तसेच 108 रुग्णवाहिकांची संख्या 100 वर नेण्याचा प्रयत्न केला जाईल. 10 नव्या कार्डियाक रुग्णवाहिका सेवेत घेतल्या जातील, असेही मंत्री राणे म्हणाले.
जुन्या आझिलो जागी म्हापसावासियांसाठी नवीन आरोग्य खाते
म्हापशातील जुन्या आझिलो रुग्णालयाच्या जागी आरोग्य खात्यासाठी नव्या इमारतीची उभारणी केली जाईल. ती जागा दुसऱ्या खात्याला दिली जाणार नसल्याचे मंत्री राणे यानी स्पष्ट केले. तसेच जीसुडाच्या माध्यमातून पालिकेला तसेच आरोग्य केंद्राला सुविधा पुरवल्या जातील. जुन्या आझिलोचे नूतनीकरण करून ते पूर्ण क्षमतेने स्थापन करण्याची घोषणा मंत्री राणे यांनी केली. जोशुआ यांनी विद्यमान सुविधांची पाहणी करावी. तसेच त्या ठिकाणी काही सुविधांची कमतरता जाणवल्यास तशी शिफारस करावी, असेही मंत्री राणे यांनी सांगितले.
न्यायालयीन जंक्शनजवळील आरोग्य केंद्र दुरुस्त करून कार्यान्वित करण्यापूर्वी जुन्या आझिलोमध्ये सुविधा सुरू करण्याची विनंती यावेळी आमदार जोशुआ डिसोझा यांनी केली.
आरोग्य कवच महत्त्वाचे
आरोग्य खाते आपल्याला दरवेळी चालून येते. यासाठी आपण वशिला लावत नाही. आरोग्य कवच हे महत्त्वाचे असून रुग्णसेवेतून लोकांच्या जीवनात काही परिवर्तन घडले तर तो आशीर्वाद वेगळ्या पद्धतीचा असतो आणि तो आशीर्वाद, भावना घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत. रुग्णसेवेसाठी आपण सदैव तत्पर असणार असल्याचे मंत्री विश्वजित राणे म्हणाले.