डॉक्टरांचे आंदोलन मागे
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांची यशस्वी शिष्टाई : आरोग्यमंत्र्यांनी माफी मागण्याचा सोडला हट्ट,डॉक्टरांच्या अनेक मागण्याही केल्या मान्य
पणजी : आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी शनिवारी गोमेकॉत डॉ. रुद्रेश कुट्टीकर यांचा अपमान केलेल्या प्रकरणी राज्यभरात तसेच राष्ट्रीय पातळीवरही असंतोष निर्माण झाल्यानंतर हे प्रकरण निस्तरण्यासाठी अखेर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल मंगळवारी गोमेकॉत धाव घेऊन संपकारी डॉक्टरांची समजूत काढली. त्यात मुख्यमंत्री यशस्वीही झाले. त्यांच्या यशस्वी शिष्टाईनंतर संप मागे घेण्यात आला. आंदोलनकर्त्या डॉक्टरांनी आरोग्यमंत्र्यांनी गोमेकॉत येऊन विडिओ समोर माफी मागण्याचा रेटा लावून धरल्याने काल मंगळवारी दुपारी मुख्यमंत्र्यांनी गोमेकॉला भेट देऊन डीन शिवानंद बांदेकर, वैद्यकीय अधीक्षक राजेश पाटील, ‘गार्ड’चे अध्यक्ष आयुष शर्मा, डॉ. कुट्टीकर यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा केली. यावेळी आंदोलकांच्या शिष्टमंडळाने आपल्या विविध मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. त्यावर चर्चा केल्यानंतर सर्व मागण्या मंजूर करण्यात आल्या.
डॉक्टरांच्या न्याय्य मागण्या मान्य
त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी वरील माहिती दिली. तसेच आपल्या विनंतीस मान देऊन आंदोलन मागे घेतल्याबद्दल खास करून डॉ. कुट्टीकर यांच्यासह सर्व आंदोलनकर्त्यांचे आभार व्यक्त केले. त्याचबरोबर आंदोलनकर्त्यांनी मांडलेल्या सर्व मागण्या न्याय्य होत्या, त्यामुळे त्या मंजूर करण्यात आल्या, असेही डॉ. सावंत यांनी सांगितले. या मागण्यांमध्ये प्रामुख्याने, सदर प्रकरणाची नि:पक्ष चौकशी करणे, कॅज्युअल्टीत काम करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सुरक्षा देणे, व्हिडिओ व फोटोग्राफीवर बंदी, सुरक्षेसाठी गोमेकॉत पोलिस आऊटपोस्ट स्थापन करणे, तेथे 50 कर्मचाऱ्यांना तैनात करणे, आदींचा समावेश होता.
या चर्चेनंतर डॉक्टरांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांसह बाहेर आले व मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली. त्याचबरोबर आरोग्यमंत्र्यांनी डॉ. कुट्टीकर यांची जाहीर माफी मागण्याचा आग्रहही सोडून देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. डीन डॉ. शिवानंद बांदेकर, फॉरेन्सिक विभागाचे डॉ. मधू घोडकिरेकर, डॉ. शर्मा, यांनी पत्रकारांना सदर माहिती दिली. दरम्यान, डॉक्टरांनी दोन दिवस आंदोलन केले असले तरी गोमेकॉतील वैद्यकीय सेवांवर त्याचा परिणाम होऊ दिला नाही. त्यामुळे सर्व ओपीडी व वॉर्डमधील सेवा सुरू राहिल्या. तरीही काही प्रमुख डॉक्टर्स या आंदोलनात सहभागी झाल्यामुळे काही प्रमाणात ऊग्णांची गैरसोय झाली.
मुख्यमंत्र्यांनी, भाजपाध्यक्षांनी टाळले प्रश्न
मुख्यमंत्र्यांनी पणजीत घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत पत्रकारांनी राज्यातील विद्यमान घडामोडी आणि मंत्र्यांच्या काही वादग्रस्त कृती, विधाने, यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना प्रश्न केले. हे प्रश्न अप्रत्यक्षरित्या क्रीडामंत्री गोविंद गावडे, आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या संदर्भातील होते. परंतु त्यांना उत्तर देणे टाळणेच मुख्यमंत्र्यांनी पसंत केले. ‘माझे सरकार चांगले काम करत आहे. चांगले प्रशासन, सुशासन, डिजिटल सेवा लोकांना खूप चांगल्या प्रकारे मिळत आहेत’, एवढेच सांगून पत्रकारांना धन्यवाद देत ते आणि भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक तेथून निघून गेले.