क्यूआर कोडद्वारे मिळणार डॉक्टरांची माहिती
महाराष्ट्र वैद्यक परिषदेकडून अँपची निर्मिती : नागरिकांची फसवणूक टाळण्यासाठी पाऊल
रत्नागिरी :
सर्वसामान्य नागरिकांना नोंदणीकृत डॉक्टरांची योग्य माहिती व्हावी. तसेच बोगस व्यावसायिकांना आळा बसावा यासाठी महाराष्ट्र वैद्यक परिषदेने एक अँप तयार केले आहे. ऑनलाईन नोंदणी केलेल्या डॉक्टरांना एक क्यूआर कोड देण्यात येणार आहे. त्याच्या आधारावर नागरिकांना डॉक्टरांविषयी तपशीलवार माहिती उपलब्ध होणार आहे.
महाराष्ट्र वैद्यक परिषदेने विशेष अँपविषयी माहिती देताना सांगितले की, प्रत्येक नोंदणीकृत डॉक्टरला देण्यात येणारा क्यूआर कोड क्लिनिकच्या बाहेर प्रदर्शित करणे बंधनकारक होणार आहे. हा क्यूआर कोड स्कॅन करताच रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना संबंधित डॉक्टरच्या संदर्भात सर्व माहिती उपलब्ध होणार आहे.
डॉक्टर नोंदणीकृत असून यथायोग्य डॉक्टरांची नोंद आहे. परवान्याच्या आधारे तो आपला व्यवसाय करत असल्याचे स्पष्ट होणार आहे.
बोगस डॉक्टरांकडून रुग्णांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होते. त्याला आळा बसावा, यासाठी आरोग्य मंत्रालय सतत प्रयत्नशील असते. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र वैद्यक परिषदेने एक ऍप तयार केले आहे. परिषदेकडे नोंदणी असलेल्या सर्व डॉक्टरांना क्यूआर कोड सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राज्यात परिषदेकडे १ लाख ९० हजार डॉक्टरांची ऑनलाईन नोंदणी ऍपच्या माध्यमातून करता येणार आहे.