For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Health Update : उरलेला भात पुन्हा गरम करून खाताय? सावधान! शरीरासाठी ठरू शकते 'स्लो पॉयझन'.

04:23 PM Mar 26, 2026 IST | NEETA POTDAR
health update   उरलेला भात पुन्हा गरम करून खाताय  सावधान  शरीरासाठी ठरू शकते  स्लो पॉयझन
Advertisement

अनेकदा घरामध्ये भात उरला की, आपण तो जपून ठेवतो आणि पुढच्या वेळेस पुन्हा गरम करून खातो. भाताच्या बाबतीत ही सवय अत्यंत घातक ठरू शकते. जर उरलेला भात योग्य पद्धतीने साठवला नाही किंवा तो वारंवार गरम केला, तर त्यात हानिकारक जीवाणूंची वाढ होऊन अन्नातून विषबाधा होण्याचा धोका वाढतो. बऱ्याचदा या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केले जाते, जे पुढे जाऊन पोटाचे विकार आणि इतर आरोग्य समस्यांना निमंत्रण देऊ शकते.

Advertisement

शिजवलेल्या भातामध्ये 'बॅसिलस सेरियस' नावाचे जीवाणू असू शकतात. जेव्हा शिजवलेला भात दीर्घकाळ खोलीच्या तापमानाला म्हणजेच बाहेर ठेवला जातो, तेव्हा हे जीवाणू वेगाने वाढू लागतात.महत्त्वाचे म्हणजे, एकदा का या जीवाणूंनी आपली विषारी द्रव्ये भातात सोडली की, त्यानंतर तो भात मायक्रोवेव्हमध्ये किंवा गॅसवर कितीही गरम केला तरी ती विषारी द्रव्ये नष्ट होत नाहीत. त्यामुळे असा भात खाणे आरोग्यासाठी धोकादायक ठरते.

उरलेला भात पुन्हा गरम करुन खाताय?
जास्त गरम केल्याने भात सुरक्षित होतो हा एक मोठा गैरसमज आहे. तज्ज्ञांनुसार, बॅसिलस सेरियसचे विषारी घटक उष्णतारोधक असतात, म्हणजेच ते प्रखर उष्णतेमध्येही टिकून राहतात. त्यामुळे वारंवार गरम केलेला भात लहान मुले, वृद्ध आणि ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे अशा व्यक्तींसाठी अधिक हानिकारक ठरू शकतो.

Advertisement

विषबाधेची लक्षणे
अशा प्रकारचा भात खाल्ल्यानंतर काही तासांतच उलट्या होणे, मळमळणे, पोटात तीव्र वेदना होणे, जुलाब आणि अशक्तपणा जाणवू शकतो. यासोबतच शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने म्हणजेच डिहायड्रेशनमुळे शरीर अधिक गलितगात्र होते. वेळीच उपचार न मिळाल्यास ही स्थिती गंभीर रूप धारण करू शकते.

भाताची साठवणूक कशी करावी?
भात उरला असेल, तर तो बाहेर न ठेवता लवकरात लवकर थंड करून हवाबंद डब्यात भरावा आणि फ्रीजमध्ये ठेवावा. फ्रीजचे तापमान ५ अंश सेल्सिअसपेक्षा कमी असावे, जेणेकरून जीवाणूंची वाढ रोखता येईल. साठवलेला भात २४ तासांच्या आत वापरणे केव्हाही चांगले. तसेच, तो फक्त एकदाच गरम करावा, वारंवार गरम करणे टाळावे. भाताला विशिष्ट वास येत असेल, त्याचा रंग बदलला असेल किंवा तो अधिक चिकट झाला असेल, तर तो अजिबात खाऊ नये. आरोग्यासाठी नेहमी ताजे अन्न खाणेच सर्वात सुरक्षित आणि फायदेशीर ठरते.

Advertisement
Tags :

.