कुत्रीवर इतके प्रेम ?
पाळीव प्राणी मालकाचे असे जीव की प्राण असतात, हे आपण नेहमी पाहिले आहे. आपल्या पोटच्या अपत्याप्रमाणे हे लोक आपण पाळलेल्या प्राण्यांचा सांभाळ करीत असतात. तेलंगणा राज्यातील माकलूर मंडल या गावातील नरसागौड नामक एका व्यक्तीचे असेच त्याच्या कुत्रीवर निरतिशय प्रेम आहे. सध्या ही कुत्री आणि तिचे हे मालक या गावच्या पंचक्रोशीत मोठ्या चर्चेचा विषय बनले आहेत.
या कुत्रीचे नाव त्यांनी ल्युसी असे ठेवले आहे. नुकतीच तिला तब्बल सात पिल्ले झाली आहेत. सर्वसाधारणपणे पाळीव कुत्र्यांना एकावेळी तीन ते चार पिले जास्तीत जास्त होतात. तथापि, या कुत्रीला एकाच वितीत सात पिल्ले झाली आहेत. त्यामुळे नरसागौड यांच्या कुत्रीप्रेमासह या कुत्रीच्या सात पिल्लांचीही चार्चा होत असे. नरसागौडा यांची दोन्ही मुले अमेरिकेत स्थायिक झाली आहेत. त्यामुळे ते भारतात एकटेच असतात. त्यांच्या अपत्यांची त्रुटी या कुत्रीने भरुन काढली आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. ही कुत्री आपली अतिशय लाडकी आहे. आपण तिच्याशिवाय क्षणभरही राहू शकत नाही. आपल्या दिवसभराच्या वेळापैकी पुष्कळसा वेळ या कुत्रीच्या सांन्निध्यातच घालवतो, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
आपल्या कुत्रीच्या हुषारीचे कौतुक करण्यास ते विसरत नाहीत. त्यांच्या मुलांचा अमेरिकेतून फोन आला, की ल्युसी कशी भूंकू लागते, हे ते आपुलकीने येईल जाईल त्याच्यासमोर बोलतात. त्यांच्या या कुत्रीप्रेमाची त्यांचे शेजारी किंवा परिचित अनेकदा चेष्टाही करतात. पण ते अशा चेष्टांना दाद देत नाहीत. या कुत्रीला सात पिल्ले झाल्यानंतर त्यांनी मोठ्या थाटात या पिलांचा नामकरण संस्कारही केला आहे. घरात एखाद्या मुलाचा किंवा मुलीचा जन्म झाला की ते कुटुंब ज्या आनंदात आणि उत्साहात नामकरण समांरभ साजरा करेल, तशाच उत्साहात या कुत्रीच्या पिल्लांचेही बारसे नरसागौडा यांनी नुकतेच साजरे केले आहे.