पक्षकार्य करा, अन्यथा पद खाली करा
काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांचा सल्ला
पणजी : काँग्रेस पक्षासाठी काम कऊन पक्ष वाढवा आणि ते जमत नसेल तर पद खाली करा, असा संदेश काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी काँग्रेसजनांना दिला आहे. काँग्रेस गटसमितीच्या काही बैठकांना ठाकरे स्वत:हून उपस्थित होते. त्यावेळी नव्याने नेमण्यात आलेल्या काही गट अध्यक्षांची फक्त तोंडी नेमणूक झाली असून कोणतेही अधिकृत नेमणूक पत्र दिले नसल्याची तक्रार करण्यात आली. काही ठिकाणी नवीन समित्या नेमल्या आहेत. त्यातील सदस्यांना देखील कोणतेही अधिकृत पत्र मिळाले नसल्याचे त्यांनी ठाकरेंच्या निदर्शनास आणले. या प्रकाराने ठाकरे संतापले आणि त्यांनी गोव्यातील काँग्रेस नेत्यांना वरीलप्रमाणे इशारा दिल्याचे सांगण्यात आले.
अनेक गट समितीचे अध्यक्ष, सदस्यांनी अशाच तक्रारी ठाकरेंकडे मांडल्या असून याप्रकरणी दखल घेण्याची मागणी केली आहे. तसेच संघटनेची पुनर्बांधणी झाली पाहिजे, तरच पक्ष टिकेल नाहीतर संपेल असा इशाराही ठाकरे यांच्याकडे बोलताना दिल्यानंतर ठाकरे यांनी काँग्रेस नेत्यांना वरीलप्रमाणे समज दिली आहे. पक्षाचे पद जर तुमच्याकडे आहे तर पक्षासाठी काहीतरी काम करा, उगाच खुर्ची अडवून बसू नका, मिरवू नका असेही त्यांनी पक्षीय नेत्यांना सूचित केले आहे. पक्षाचे गोवा प्रदेश अध्यक्ष अमित पाटकर यांनी याप्रकरणी सारवासारव करण्याचा व स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला परंतू ठाकरेनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले.