करो या मरो कुलदीप आत ..वरूण बाहेर
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कोलकत्ता येथे 1 मार्च रोजी होणारा सामना भारतीय संघासाठी जीवन मरणाचा प्रश्न झालेला आहे. विश्वचषक स्पर्धेत भारत आता अशा उंबरठ्यावर आहे कि हा सामना जिंकण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. आता रन रेट वगैरे शक्यता/अननिश्चितता यांना पूर्ण विराम मिळालेला असून इडन गार्डन वरील विजेता उपांत्य फेरीत दाखल होईल.
वेस्टइंडीजचा या विश्वचषक स्पर्धेतील आत्तापर्यंतचा प्रवास चमकदार राहिलेला आहे मात्र मागील सामन्यात दक्षिण आफ्रिकेने त्यांचा नऊ गड्यांनी दणदणीत पराभव केला.झिंबाब्वेविरुद्ध मिळवलेल्या मोठ्या विजयानंतर वेस्टइंडीज, दक्षिण आफ्रिकेला कडवी झुंज देईल अशी अपेक्षा होती पण तो फोल ठरली. आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवाचा विसर पाडून कॅरिबियन संघ पुनरागमन करण्यात उत्सुक असेल यात शंका नाही. कारण उपांत्य फेरीत पोहोचण्याची त्यांची संधी देखील तितकीच प्रबळ आहे. कोलकत्ता येथे होणाऱ्या या महत्वपूर्ण सामन्यात भारताला बिनचूक कामगिरी करावी लागणार आहे.कोलकत्याच्या खेळपट्टीचा विचार करता फिरकी गोलंदाज,मिस्टरी बॉलर वरुण चक्रवतीला अंतिम अकरा मधून डच्चू दिला जाऊ शकतो अशी परिस्थिती आहे.त्याच्या जागी चायनामन कुलदीप यादवला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
कुलदीप हा असा गोलंदाज आहे जो खेळपट्टी किंवा परिस्थितीवर अवलंबून न राहता बळी मिळवण्याची क्षमता ठेवतो दुसरीकडे वरूण चक्रवर्ती मागील दोन्ही सामन्यात फारसा प्रभावी ठरलेला नाही. आणि त्याने धावा देखील अधिक बहाल केल्या आहेत. एवढेच नव्हे तर त्याची गोलंदाजी अक्षरश फोडून काढण्यात आली आहे.त्यामुळे संघ व्यवस्थापनाला या गोष्टीचा गांभीर्याने विचार करणे भाग आहे.
भारताच्या दृष्टीने अत्यंत जमेची बाजू म्हणजे भारताचा स्फोटक आणि महत्वाचा फलंदाज अभिषेक शर्मा यांने झिम्बाबवे विरुद्धच्या सामन्यामध्ये अर्धशतक साजरे केल्याने त्याचा आत्मविश्वास पुन्हा बाळगण्यास त्याला मदत होईल.यात शंका नाही.झिम्बाबवे विरुद्धच्या सामन्यात भारताच्या सर्वच फलंदाजानी समाधानकारक कामगिरी केलेली आहे आणि विश्वचषक स्पर्धेत 200 चा टप्पा पार करून दुसऱ्या क्रमांकाची धावसंख्या रचण्याचे श्रेय मिळवलेले आहे.भारतीय फलंदाजांना आता अधिक सातत्य दाखवायला लागेलच.आत्तापर्यंतचा आणि हल्लीच्या सामन्यातील भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील या सामन्याकडे नजर टाकल्यास भारतीय संघ आज विजयी होईल याची शक्यता जास्त असून तशी खात्री देखील आहे.परंतु वेस्टइंडीज संघाला कमी लेखून जाणार नाही कारण त्यांची कामगिरी देखील अतिशय चमकदार झालेली असून ते अचानक धक्का देखील देऊ शकतात आता वेळ आलेली आहे भारतीय फलंदाजांनी जबाबदारीने आणि नियोजनपूर्वक खेळ करण्याची तसेच गोलंदाजानी देखील पूर्ण क्षमतेने आपल्या गोलंदाजीची जादू दाखवणे क्रमप्राप्त आहे.
सीढीयों कि जरूरत उन्हें है, जिन्हें छत तक जाना है।
हमारी मंजील तो आसमान है, रास्ता भी खुद ही बनाना है।