आंदोलकांचे आज ‘करो किंवा मरो’
कलम 39अ रद्द करा, पोलिसांना निलंबित करण्याची मागणी : आमदार विरेश बोरकर यांचे उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरुच
पणजी : पाळे - शिरदोण ग्रामस्थांचे आंदोलन आता उग्रऊप धारण करण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. आंदोलकांनी समस्त गोमंतकीयांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले असून आज सोमवारी संध्याकाळी 4 वा. आझाद मैदानावर उपस्थित राहण्याची विनंती केली आहे. आमदार विरेश बोरकर यांना फरफटत ओढून नेणाऱ्या पोलिसांवर दोन तासात कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी केल्यानंतरही पोलिस खात्याने कोणतीही कारवाई केली नसल्याने आज आंदोलक ‘करो किंवा मरो’ असे उग्ररुप धारण करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. आमदार विरेश बोरकर यांच्या नेतृत्वाखाली पाळे-शिरदोण ग्रामस्थांनी नगर नियोजन कायदा कलम 39 अ अंतर्गत केलेले जमीन रूपांतरण कायदा दुरुस्ती मागे घेण्याच्या मागणीसाठी शुक्रवारपासून आंदोलन सुरु केले आहे. आंदोलकांना सर्व विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळाला आहे.
बोरकरांच्या रक्तदाबात किंचीत घट
मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार आरजीचे आमदार विरेश बोरकर यांनी केला आहे. आमदार बोरकर यांच्यासह अनेक आंदोलनकर्त्यांची प्रकृती खालावली तर इस्पितळात हलविण्यासाठी अॅम्ब्युलन्स आझाद मैदानावर तैनात करण्यात आली आहे. काल रविवारी बोरकर यांचा रक्तदाब किंचीत कमी झाला होता.
सरकारला सत्तेचा माज : आलेमाव
कलम 39 अ रद्द केले नाही तर, आणि आमदार वीरेश बोरकर यांना फरफटत बाहेर काढणाऱ्या पोलिसांना निलंबित केले नाही, तर ‘जेल भरो’ आंदोलन करण्याचा इशारा विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी दिला. भाजप सरकारला सत्तेचा माज चढला असून त्यांना आपण काय करतो याचे भान उरलेले नाही. प्रत्येकवेळी ते जनतेला गृहीत धरतात आणि मनमानी कारभार करीत आहेत. हीच जनता त्यांना योग्यवेळी योग्य धडा शिकवेल, असा विश्वास युरी आलेमाव यांनी व्यक्त केला आहे.
‘97 टक्क्यांना’ तोंड द्यावे : पाटकर
मंत्री विश्वजित राणे यांनी वाळपई मतदारसंघात झालेल्या कार्यक्रमात म्हटले की वेळ आल्यास सत्तरीतून 45 हजार लोक आपण पणजीत आणू शकतो, यावर प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी सभेत प्रत्युत्तर दिले. 45 हजार लोक म्हणजे 3 टक्के होतात. गोव्याची लोकसंख्या 15 लाख आहे. उर्वरित 97 टक्के जनतेला तोंड देण्याचे आव्हान नगरनियोजनमंत्री विश्वजित राणे यांनी स्वीकारावे, असे अमित पाटकर म्हणाले.
गोवा काढलाय विकायला : व्हिएगस
गोवा वाचविण्यासाठी येत्या विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षांची युती होणे ही काळाची गरज आहे. पक्षाने युतीची तयारी दाखवली नाही तर युती आवश्यक असल्याचे आम्ही पटवून देऊ, असे वेंझी व्हिएगस म्हणाले. भाजपने गोवा विकायला काढला आहे. आमच्या पुढच्या पिढीला आम्ही काय उत्तर देणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे आम्ही वेळीच हालचाल करणे महत्त्वाचे आहे अन्यथा सरकार गोवा राज्य दिल्लीवासियांच्या घशात घालणार यात शंकाच नाही.
गोवा वाचविणे एकच ध्येय : सरदेसाई
कलम 39 अ चा मुद्दा न्यायालयात असून, यावर न्यायालय निर्णय घेणार आहे. आरजी आणि गोवा फॉरवर्ड पक्ष वेगवेगळे असले तरी गोवा वाचविण्यासाठी आम्ही एका पायरीवर येणार आहोत. गोवा वाचविणे हे आमचे मुख्य ध्येय आहे. राजकारण वेगळे आणि गोव्याच्या रक्षणासाठी किंवा अस्तित्वासाठी लढा देणे वेगळे. ते करीत असताना आम्ही कोणत्या पक्षाचे किंवा कोणाचे आंदोलन हे पहाणार नाही, तर आंदोलनाचा मुद्दा महत्त्वाचा मानणार असल्याचे आमदार विजय सरदेसाई म्हणाले.
विरोधी पक्षांच्या नेत्यांचा पाठिंबा
आमदार विरेश बोरकर यांचे उपोषण काल रविवारी तिसऱ्या दिवशीही सुऊच होते. आझाद मैदानावर लोकांची संख्या वाढू लागली आहे. रूपांतरणाचे कलम 39 (अ) रद्द करण्याची मागणी आझाद मैदानावर झालेल्या सभेत पुन्हा करण्यात आली. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई, आरजीपीचे प्रमुख मनोज परब, आपचे प्रमुख वाल्मिकी नाईक, आमदार वेंझी व्हिएगस, आमदार अॅल्टॉन डिकॉस्ता, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर व इतरांनी आझाद मैदानावर उपस्थिती लावून आंदोलनाला पाठिंबा दिला.