विघ्न दूर करूनच जा बाप्पा !
राज्यात गणेशोत्सवाचा उत्साह आहे. येत्या शुक्रवारी अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पा आपल्या गावाला वर्षभरासाठी जाणार आहेत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसमोर आज मोठे संकट उभे ठाकले आहे, हे विघ्न आहे दुष्काळाचे! शेतात उभे असलेले पीक संकटात आहे. पावसाच्या अनिश्चिततेने बळीराजाची चिंता वाढली आहे. पिकांचे नुकसान, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न, पाण्याची टंचाई आणि पुढच्या हंगामाची चिंता अशा अनेक संकटांनी शेतकऱ्याला घेरले आहे. गणपती बाप्पाने गावाला जाताना बळीराजाच्या आयुष्यात आलेले हे दुष्काळाचे विघ्न दूर करावे आणि बळीराजाच्या शेतात पुन्हा हिरवाई फुलू दे! हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना..
ज्यात मोठ्या उत्साहात सुरू असलेल्या गणेशोत्सवाची सांगता, पुढील चार-पाच दिवसात होणार आहे. मराठवाड्यासह राज्यातील काही भागांमध्ये पावसाच्या ओढीमुळे दुष्काळसदृश गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारने किती ही ट्रीलियन डॉलर अर्थव्यवस्था, जीडीपी वाढल्याचे जाहीर केले तरी, राज्यातील शेतकरी सुखी तर राज्य सुखी, मात्र सध्या शेतकरीच सरकारच्या निर्णयाकडे डोळे लावून आहे. बदलत्या तसेच सातत्याने लहरी हवामानामुळे एकामागे एक नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागत आहे. अतिवृष्टी झाली की दुष्काळ, त्यामुळे सरकारची कसोटी लागताना दिसत आहे, वेळेत पंचनामे, नुकसानभरपाई, पीक पाणी आणि चारा व्यवस्थापन याबाबत तातडीने निर्णय घेण्यासाठी उपाययोजना कराव्या लागताना दिसत आहे.
सध्या पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे. शेतातील पिके जळून गेली आहेत. जी पिकं शिल्लक आहेत ती पूर्णपणे वाया गेली आहेत म्हणून शेतकरी त्यावर नांगर फिरवत आहे. सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांच्या घरात चिंतेचे वातावरण आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी परिस्थितीचा आढावा घेतला असून, ठोस निर्णय लवकरच घेतला जाईल, असे सांगितले आहे. मुदतपूर्व पीक कापणीचे प्रयोग करून नुकसानाचे अचूक मूल्यांकन करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. त्यातच सरकारला या गोष्टींचे गांभीर्य कळावे यासाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी देखील दुष्काळी भागाचा दौर करण्याचे जाहीर केले आहे.
गेल्याच आठवड्यात शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहुन प्रमुख 9 मागण्या करताना सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करावा आणि गंभीर परिस्थिती असलेल्या तालुक्यांना दुष्काळसदृश परिस्थितीग्रस्त घोषित करून दुष्काळी सवलती लागू कराव्यात. शेतकऱ्यांना हेक्टरी किमान 50 हजार ऊपये मदत द्यावी. तसेच प्रत्येक शेतमजूर कुटुंबाला 25 हजार रुपयांची विशेष मदत द्यावी. कर्जमाफी योजना तातडीने लागू करून शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज उपलब्ध करून द्यावे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रोत्साहनपर अनुदान 50 हजारांवरून एक लाख ऊपये करावे. तसेच एक ऊपयातील पीकविमा योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करून शेतकऱ्यांना पीकविम्याचे संरक्षण द्यावे. मागील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी जाहीर केलेली हेक्टरी 17 हजार रुपयांची मदतही वितरित करण्याची मागणीही पवारांनी केली आहे. राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे हे परिस्थितीचा आढावा घेत असून ठोस निर्णय लवकरच घेतला जाईल, असे सांगितले आहे. त्यामुळे राज्य मंत्रीमंडळाच्या आगामी बैठकीत काही घोषणा होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे दुष्काळाचे राजकारण जोरात सुरू झाले आहे, 19 सप्टेंबरला झालेल्या दुष्काळ आढावा बैठकीत लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांसमोर काजू-बदामासह सुकामेवा ठेवण्यात आल्याने चांगलाच तापले. राजकीय वाद निर्माण झाला. एका शेतकऱ्याने तर कृषिमंत्र्यांना काजू-बदाम देऊन या प्रकाराचा निषेधही व्यक्त केला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी अशा परिस्थितीत प्रशासनाने अधिक संवेदनशीलतेने वागावे, अशी भूमिकाही व्यक्त केली. आता सरकार शेतकऱ्यांप्रती किती संवेदनशील आहे, हे सरकारच्या निर्णयावऊन कळेल.
मुंबईत उत्सव शिगेला पण भाविकांच्या सुरक्षेचे काय?
मुंबईचा गणेशोत्सव म्हणजे श्रद्धा, उत्साह, जल्लोष आणि लाखो भाविकांची गर्दी. पण यंदाच्या गणेशोत्सवात या उत्साहाला सुरक्षेच्या गंभीर प्रश्नाची किनार लागली आहे. गणेशोत्सवाच्या गर्दीत विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याच्या घटनांनी मुंबई हादरली आहे. काळाचौकीतील दुर्घटनेत आठ वर्षांच्या मुलीसह एका महिलेचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. त्यानंतर जोगेश्वरीतील कृत्रिम विसर्जन तलावात 19 वर्षीय तऊणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. या केवळ दोन वेगवेगळ्या दुर्घटनांची मालिका म्हणून पाहून चालणार नाही. गणेशोत्सवाच्या अंतिम आणि सर्वाधिक गर्दीच्या टप्प्यापूर्वी प्रशासनासाठी हा गंभीर इशारा आहे.
गणपती विसर्जनाच्या दिवशी मुंबईचे रस्ते अक्षरश: माणसांनी भरून जातात. महापालिका आणि पोलिसांकडून विसर्जनस्थळी व्यवस्था करण्यात येत असते. विसर्जन स्थळाचा सुरक्षेच्या दुष्टीने आढावाही घेतला जातो, हा आढावा घेताना विजेच्या तारा, तात्पुरते मीटर, मंडपांची वायरिंग, पाण्याजवळील विद्युत उपकरणे, पंप, जनरेटर, प्रकाशयोजना, लोखंडी संरचना या सगळ्यांचा एकत्रित विचार करणे आवश्यक आहे. विसर्जन सोहळ्याकडे केवळ पूर्व खबरदारी म्हणून कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने पाहता कामा नये. तर मानवी सुरक्षेची जबाबदारी ही देखील तितकीच महत्त्वाची आहे. त्यासाठी लाखो आणि करोडो ऊपयांचे प्रायोजकत्व स्विकारलेल्या मंडळांचीही तितकीच जबाबदारी आहे.
गणेशोत्सव काळात घडलेल्या या घटनांनी आता एकच प्रश्न पुढे आणला आहे, की विसर्जनाच्या दिवशी लाखो भाविक रस्त्यावर उतरणार असताना त्यांची सुरक्षा किती खात्रीची आहे? गणपती बाप्पाला निरोप देताना मुंबईकरांच्या डोळ्यांत भावनेचे अश्रू असतात. त्या अश्रूंमध्ये एखाद्या कुटुंबाच्या दु:खाचे अश्रू मिसळू नयेत. एवढीच गावाला जाणाऱ्या बाप्पा चरणी प्रार्थना!
प्रवीण काळे