ज्ञानेश्वरी मन लावून ऐकावी म्हणून माऊली श्रोत्यांना विनवणी करतात
अध्याय नववा
श्रोत्यांचे कायमचे भले व्हावे म्हणून माउली श्रोत्यांना विनवणी करताना म्हणतात, अहो मी तुम्हाला वचन देतो की, मी सांगतोय ते तुम्ही लक्ष देऊन ऐका म्हणजे सर्व सुख मिळण्याची पात्रता तुमच्या अंगी येईल. सामान्य माणसाला सर्व सुखाची प्राप्ती म्हणजे गाडी, बंगला, मुलेबाळे, धनदौलत, शेतीवाडी ह्या सगळ्या प्रापंचिक गोष्टी मिळणे असे वाटते कारण त्या मिळाल्या की, कायम सुखात राहता येईल असा त्याचा समज असतो पण ह्या सर्व गोष्टी परिस्थितीनुसार बदलत तरी असतात किंवा नष्ट तरी होतात. त्यामुळे त्यापासून मिळणारे सुख कायम टिकणारे नसते. माउली हे सर्व जाणून असल्याने त्यांच्या दृष्टीने खरं सुख म्हणजे पांडुरंगाची प्राप्ती होय. पांडुरंगाची एकदा प्राप्ती झाली की, मिळणाऱ्या सुखात कधी बदल होत नाही किंवा ते कधी कमी होत नाही. म्हणून श्रोत्यांचे भले व्हावे ह्या उद्देशाने स्वत:कडे कमीपणा घेऊन श्रोत्यांना तुम्ही ज्ञानाने माझ्यापेक्षा मोठे असलात तरी लक्ष देऊन ज्ञानेश्वरी ऐका अशी विनंती करत आहेत.
श्रोत्यांना मोठेपणा देताना ते म्हणतात, काजवा कितीही मोठा असला तरी सूर्याच्या प्रकाशापुढे त्याचे तेज पडत नाही, शीतल किरण असलेल्या चंद्राला पंख्याने वारा घालणे किंवा नादब्रह्मापुढे गाणे म्हणणे किंवा अलंकारास दागिन्याने सजवणे असे कोठे झाले आहे काय? सुवासाने कशाचा वास घ्यावा? समुद्राने कोणत्या ठिकाणी स्नान करावे? हे सर्व आकाशच ज्यामध्ये मावेल अशी मोठी विस्तृत वस्तु कोठून आणावी? त्याप्रमाणे तुमची ऐकण्याची इच्छा तृप्त होईल आणि तुम्ही म्हणाल की ‘याला म्हणावे व्याख्यान’ किंवा ज्या योगाने तुमचे मन रंगून जाईल असे वत्तृत्व माझ्याजवळ नाही पण जग उजेडात आणणाऱ्या सूर्याला काडवातीने ओवाळू नये असे थोडेच आहे? महाराज, तुम्ही मूर्तिमंत शंकर आहात आणि मी दुर्बळ मनुष्य भक्तीने पूजा करत आहे. बेलाऐवजी मी जरी निर्गुंडी वहात असलो तरी आपण बेल समजून तिचा स्वीकार करा. लहान मूल बापाच्या ताटात जेवावयास बसते आणि पानात शिरून बापालाच भरवू लागते पण बाप न रागावता उलट आनंदाने त्याच्याकडून भरवून घेतो. त्याप्रमाणे तुमच्यासमोर मी बालबुद्धीने बडबड करत असलो तरी त्यामुळे तुम्हाला आनंदच वाटेल असे तुमचे माझ्यावर प्रेम आहे.
ज्याप्रमाणे वर बाप आणि मुलाचे प्रेम कसे असते ते सांगितले आहे तसे श्रोत्यांचे आणि माऊलींचे एकमेकांवर प्रेम होते. श्रोते माउलींनी त्यांचा मुलगाच मानत, तसेच माऊली सांगतायत ते आपल्या भल्याचंच आहे अशीही त्यांना खात्री होती. हे माउलींनाही माहित होते.
म्हणून ते पुढे म्हणतात, आमचा ज्ञानोबा, अशा प्रेमाने तुम्ही माझ्याकडे आपुलकीने पाहता म्हणून मी केलेल्या सलगी तुम्हाला गैर वाटणार नाही. अहो, गाईला तिच्या वासराने ढुशी मारली तर त्यामुळे गाईला जास्तच पान्हा फुटतो कारण आवडत्याचा राग आला की, त्याच्यावरील प्रेम दुप्पट होत असते. त्याप्रमाणे मी लक्ष द्या असे थोडेसे धिटाईने म्हंटल्यावर तुमची माझ्यावरील कृपा आणखीनच वाढली आहे. महाराज, याकरता ‘अवधान द्या’ असे मी बोललो.

