ज्ञानेश कुमार हे देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त
निवडीसाठी पंतप्रधान मोदी, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत बैठक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेश कुमार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. ते मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची जागा घेतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय निवड समितीने सोमवारी संध्याकाळी ज्ञानेश कुमार यांच्या नावाची शिफारस केली. त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मान्यता दिली. या संदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. तसेच आता डॉ. विवेक जोशी हे तीन सदस्यीय निवडणूक आयोगाचे नवे सदस्य असतील.
६१ वर्षीय ज्ञानेश कुमार हे राजीव कुमार यांची जागा घेतील. ज्ञानेश कुमार या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुका आणि पुढील वर्षी बंगाल, आसाम आणि तामिळनाडूमधील निवडणुकांचे पर्यवेक्षण करतील. ज्ञानेश कुमार हे केरळ कॅडरचे १९८८ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. निवडणूक आयोगाच्या तीन सदस्यीय पॅनेलमधील दोन आयुक्तांपैकी ते सर्वात ज्येष्ठ आहेत. या पॅनेलमधील दुसरे आयुक्त उत्तराखंड केडरचे अधिकारी सुखबीर सिंग संधू आहेत. या पॅनेलचे नेतृत्व राजीव करत होते. ज्ञानेश कुमार हे पूर्वी केंद्रीय गृह मंत्रालयाचा भाग होते. त्यांच्या प्रमुख जबाबदाऱ्यांमध्ये ऑगस्ट २०१९ मध्ये जम्मू आणि काश्मीरमधील कलम ३७० रद्द करणाऱ्या आणि पूर्वीच्या राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करणाऱ्या विधेयकाचा मसुदा तयार करण्यात मदत करणे समाविष्ट होते. त्यावेळी ते गृह मंत्रालयात संयुक्त सचिव (काश्मीर विभाग) होते. बरोबर एक वर्षानंतर, गृह मंत्रालयात अतिरिक्त सचिव म्हणून, ज्ञानेश कुमार यांनी उत्तर प्रदेशातील अयोध्या येथील राम मंदिराबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या खटल्याशी संबंधित कागदपत्रे देखील हाताळली होती. ज्ञानेश कुमार हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे जवळचे मानले जातात. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये ते सहकार मंत्रालयाचे सचिव म्हणून नागरी सेवेतून निवृत्त झाले होते.
.