एक रहस्य शोधण्यासाठी डीएनए परीक्षा
ही घटना नुकतीच ब्रिटनमध्ये घडली आहे. या देशातील लीव्हरपूल विभागातील वनक्षेत्रात एक अशी वस्तू आढळली, की जिचे रहस्य शोधण्यासाठी 500 युवतींची डीएनए परीक्षा प्रशासनाकडून करण्यात आली. या युवतींपैकी बहुतेकजणी शाळकरी विद्यार्थिनी होत्या. या वनक्षेत्रात एका अर्भकाचा मृतदेह आढळून आला होता. तो वनातील कचरापेटीत टाकलेला दिसून आला. काही स्थानिक लोक या वनक्षेत्रात फिरावयास गेले असताना त्यांना तो आढळल्याने त्यांनी प्रशासनाला ही माहिती दिली. प्रशासनाने मृतदेह ताब्यात घेऊन त्dयाची डीएनए परीक्षा केली.
हे अर्भक कोणाचे असावे, याचा शोध घेतला जाऊ लागला. या अर्भकाच्या मृतदेहाची छायाचित्रेही सर्वत्र प्रसारित करण्यात आली. तथापि, बराच काळ शोध घेऊनही अर्भकाचे रहस्य उलगडण्यात प्रशासनाला यश आले नाही. हे अर्भक या वनक्षेत्राच्या आसपास राहणाऱ्या एखाद्या महिलेचे असावे. तिची ही संतती अनैतिक संबंधांमधून निर्माण झाली असावी. त्यामुळे या घटनेचा बभ्रा होऊ नये, म्हणून तिने अर्भकाला मारुन त्याचा मृतदेह येथे आणून टाकला असावा, अशी प्रशासनाची अटकळ होती. असा प्रकार करणाऱ्यांमध्ये शाळकरी विद्यार्थिनी असतात, म्हणून आसपासच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींची डीएनए परीक्षा करण्याचा निर्णय घेण्यात आला. बरीच वर्षे प्रयत्न केल्यानंतर जोआन शार्की नामक एक महिला या अर्भकाची माता असल्याचे स्पष्ट झाले. तिच्यावर बालहत्या अभियोग चालविण्यात आला. हे संशोधन तब्बल 25 वर्षे चालले होते. पण ही महिला मानसिकदृष्ट्या अधू असल्याचे सिद्ध झाल्याने तिला झालेली शिक्षा रद्द करण्यात आली.