टीव्हीके पक्षावर भडकला द्रमुक
अभिनेता विजयच्या पक्षाची तत्वे खोटी : द्रमुक
वृत्तसंस्था/ चेन्नई
तमिळ सुपरस्टार दलपति विजयचा नवा राजकीय पक्ष टीव्हीके (तमिळ वेत्री कडगम)चे पहिले संमेलन रविवारी पार पडले. या संमेलनाला विजयच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. या संमेलनात बोलताना विजयने राज्यात सत्तारुढ असलेल्या द्रमुकवर टीकेची झोड उठविली होती. आता द्रमुकने विजयच्या पक्षाने नक्कल करत तत्वे निर्धारित केल्याचा दावा केला आहे.
विजयने पक्षाच्या पहिल्या संमेलनात द्रमुक आणि करुणानिधी परिवाराला लक्ष्य केले होते. यावर आता द्रमुकने प्रतिक्रिया दिली आहे. स्वत:च्या प्रदीर्घ राजकीय काळात असे अनेक स्पर्धक पाहिले असून आमचा पक्ष पुढील काळातही मजबूत राहणार असल्याचा द्रमुक नेत्याकडून करण्यात आला. तर अण्णाद्रमुकने टीव्हीकेची विचारसरणी ही अनेक राजकीय पक्षांच्या विचारसरणीचे मिश्रण असल्याचे म्हटले आहे.
विजयचा पक्ष आमच्या धोरणांची नक्कल करत आहे. आम्ही पूर्वीपासून करत असलेल्या कामाबद्दलच विजय बोलत आहे. हे त्याच्या पक्षाच्या पहिले संमेलन होते आणि पुढील काळात कितपत प्रतिसाद मिळतो हे पहावे लागणार आहे. द्रमुकचे नेते लोकांच्या मुद्द्यांसाठी लढत तुरुंगात गेले. आमचा पक्ष अनेक निवडणुकांमध्ये पराभूत झाला, परंतु हा पक्ष मजबूत राहिला असा दावा द्रमुक नेते टीकेएस एलंगोवन यांनी केला आहे.
द्रमुकची स्थापना लोकांच्या मुद्द्यांवर लढण्यासाठी झाली होती. तर विजय हा पक्षाची स्थापना केल्यावर त्वरित सत्तेवर येण्याची आकांक्षा बाळगून आहे. द्रमुक नेत्यांप्रमाणे तो तुरुंगात जाऊ लोकांसाठी लढणार नाही. आम्ही लोकांसाठी काम करतो, आम्ही लोकांसाठी आहोत असे वक्तव्य द्रमुक नेत्याने केले आहे.
अण्णाद्रमुकचे प्रवक्ते कोवई सत्यन यांनी विजयला राजकारणातील प्रवेशाबद्दल शुभेच्छा देत त्याला अजून मोठा पल्ला गाठायचा असल्याचे म्हटले आहे. टीव्हीकेची विचारसरणी ही सर्व पक्षांच्या विचारसरणींना मिळून तयार करण्यात आल्याचा दावा सत्यन यांनी केला. वैचारित स्वरुपात भाजप राष्ट्रवादी असून आमची मतपेढी प्रभावित होणार नाही. विजयचा पक्ष केवळ द्रविड पक्षांच्या मतांची विभागणी करू शकतो असे भाजप नेते. एच. राजा यांनी म्हटले आहे.