For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

डीएमडीकेचे संस्थापक विजयकांत यांचे निधन

07:00 AM Dec 29, 2023 IST | Tarun Bharat Portal
डीएमडीकेचे संस्थापक विजयकांत यांचे निधन
Advertisement

कोरोनाची झाली होती लागण : चेन्नईमधील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

Advertisement

वृत्तसंस्था /चेन्नई

तमिळ चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम अभिनेते आणि तामिळनाडूतील डीएमडीके पक्षाचे संस्थापक विजयकांत यांचे वयाच्या 71 व्या निधन झाले आहे. चेन्नईच्या एमआयओटी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यावर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. विजयकांत यांच्या निधनानंतर रुग्णालयाबाहेर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विजयकांत यांना नियमित तपासणीसाठी मंगळवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु त्यावेळी त्यांची प्रकृती बरी होती. तपासणी झाल्यावर ते घरी देखील परतणार होते. परंतु तेथे न्युमोनियाची लक्षणे दिसून आल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते. यातच ते कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. विजयकांत यांचे पार्थिव चेन्नईतील त्यांच्या निवासस्थानी आणले गेले असून लवकरच ते डीएमडीके कार्यालयात नेण्यात येणार आहे. कॅप्टन या नावाने प्रसिद्ध विजयकांत यांनी 2005 मध्ये देसिया मुरपोकू द्रविड कजगम या पक्षाची स्थापना केली होती. विरुधाचलम आणि ऋषिवंडियम मतदारसंघांचे प्रतिनिधित्व करत दोनवेळा विधानसभा सदस्य म्हणून काम केले होते. विजयकांत यांनी सुमारे 154 चित्रपटांमध्ये काम करून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांनी ‘नरसिंहा’, ‘कॅप्टन प्रभाकरन’, ‘धर्मचक्रम’ यासारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले होते. याचबरोबर ते यशस्वी दिग्दर्शक आणि निर्माते होते. चित्रपटसृष्टीनंतर त्यांनी राजकारणात पाऊल ठेवले होते. 2011-16 दरम्यान ते तामिळनाडू विधानसभेत विरोधी पक्षनेते होते.  परंतु मागील काही काळापासून त्यांच्या आरोग्याबद्दल चिंता व्यक्त केली जात होती.

Advertisement

पंतप्रधान मोदींकडून श्रद्धांजली

विजयकांत यांच्या निधनामुळे अत्यंत दु:खी आहे. तमिळ चित्रपटसृष्टीतील ते दिग्गज कलाकार होते, लाखो लोकांची मने त्यांनी जिंकली होती. एक राजकीय नेता म्हणून ते प्रतिबद्ध होते. तामिळनाडूच्या राजकीय पटलावर स्वत:ची छाप सोडली आहे. त्यांच्या निधनाने एक पोकळी निर्माण झाली असून ती भरून काढणे अवघड ठरणार आहे. विजयकांत हे माझे जवळचे मित्र होते. या दु:खाच्या क्षणी त्यांच्प्; कुटुंबीय आणि चाहत्यांसोबत माझ्या संवेदना आहेत असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. कॅप्टन विजयकांत यांचे निधन हे तामिळनाडू आणि तमिळ लोकांसाठी कधीच भरून न निघणारी हानी आहे. ते आता आमच्यासोबत नसले तरीही त्यांचे नाव आणि वारसा सदैव आमच्या मनात कायम राहणार असल्याचे उद्गार भाजप प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांनी काढले आहेत.

मुख्यमंत्र्यांकडून दु:ख व्यक्त

विजयकांत यांच्या निधनावर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी दु:ख व्यक्त केले आहे. डीएमडीके प्रमुखांच्या मृत्यूचे वृत्त धक्का आणि दु:ख घेऊन आल्याचे स्टॅलिन यांनी म्हटले आहे. स्टॅलिन यांनी विजयकांत यांच्या निवासस्थानी पोहोचत अंत्यदर्शन घेतले आहे.

डीएमडीके संस्थापक तिरु विजयकांत यांच्या निधनामुळे अतीव दु:ख झाले. चित्रपटजगत आणि राजकारणातील त्यांच्या योगदानाने लाखो लोकांच्या मनावर अमिट छाप उमटविली होती. या दु:खाच्या प्रसंगी त्यांच्या कुटुंबीय आणि अनुयायांबद्दल मी संवेदना व्यक्त करतो.

राहुल गांधी, काँग्रेस खासदार

Advertisement
Tags :

.