पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापुरात डीएम कार्डियालॉजी अभ्यासक्रम; राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रारंभ
हृदयरोग आणि हृदयशस्त्रक्रिया विभागात 7 जागा; 3 विद्यार्थी दाखल : मुंबई, नागपूरनंतर कोल्हापुरात अभ्यासक्रम :
कोल्हापूर प्रतिनिधी
येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 17 विभागांत पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू झाले आहेत. यामध्ये विशेष म्हणजे राज्यात मुंबई आणि नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत डी.एम. कार्डियालॉजी अभ्यासक्रम सुरू आहे. आता त्यात कोल्हापुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची भर पडली आहे. सीपीआर हॉस्पिटलमधील हृदयरोग आणि हृदयरोग शस्त्रक्रिया विभागात 7 जागांसाठी या अभ्यासक्रमाला विद्यार्थी येणार आहेत. त्यापैकी 3 विद्यार्थी प्रवेशित झाले आहेत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव म्हणाले, एम.बी.बी.एस. पदवीनंतर एम.डी. या पदव्युत्तर पदवीनंतर हा अभ्यासक्रम आहे. शेंडा पार्क येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा विस्तार होत आहे. महाविद्यालयात अत्याधुनिक लॅब, लायब्ररी आहे, महाविद्यालयांच्या व्यवस्थापनाखाली सीपीआर हॉस्पिटल आहे. महाविद्यालयातील 11 वैद्यकीय शाखांमध्ये पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू आहेत. यामध्ये बालरोग चिकित्सा, मेडीसीन, अस्थिव्यंग, मानसोपचार, कान, नाक, घसा (ईएनटी), ऑप्टीमॉलॉजी (नेत्ररोग), स्त्रीरोग आणि प्रसुतीशास्त्र, रेडियॉलॉजी, भुलशास्त्र आणि सर्जरी विभागाचा समावेश आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अॅनॉटॉमी, पॅथॉलॉजी, मायक्रोबॉयॉलॉजी, फॉर्मेकॉलॉजी, फिजियोलॉजी, न्याय वैद्यकशास्त्र, बायोकेमिस्ट्री विभागातही पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात या माध्यमातून वैद्यकीय स्टाफ उपलब्ध होत आहे. आता हदयरोग विभागात डी. एम. कार्डियॉलॉजी अभ्यासक्रम सुरू झाल्याने सीपीआर हॉस्पिटलची वाटचाल हायर सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलकडे सुरू आहे, अशी माहिती सीपीआर हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे यांनी दिली.
डी. एम कार्डियॉलॉजी अभ्यासक्रमासाठी शेंडा पार्क येथे 1100 बेडच्या हॉस्पिटलची उभारणी सुरू आहे. हृदयरोग आणि हदृयरोग आणि हृदयरोग शस्त्रक्रिया विभागात पदव्युत्तर पदवीच्या पुढील डी.एम. कार्डियॉलॉजी अभ्यासक्रम सुरू झाला आहे. या अभ्यासक्रमासाठी सहा जागा आहेत. यातील तीन जागांवर विद्यार्थी दाखलही झाल्याची माहिती विभागप्रमुख डॉ. अक्षय बाफना यांनी दिली.
हृदयरोग आणि हृदय शस्त्रक्रिया विभागासाठी 17 कोटी रूपये मंजूर झाले आहे. यामध्ये सध्याच्या इमारतीचे नूतनीकरण, कॅमलॅब, टू इको मशिन्स, अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर यांचा समावेश आहे, अशी माहिती सीपीआर हॉस्पिटलमधून देण्यात आली.