For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

DK Shivkumar Journey 'काँग्रेसचा विद्यार्थी नेता ते कर्नाटकचे मुख्यमंत्री' डीके शिवकुमार यांचा प्रवास,

06:14 PM May 28, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
dk shivkumar journey  काँग्रेसचा विद्यार्थी नेता ते कर्नाटकचे मुख्यमंत्री  डीके शिवकुमार यांचा प्रवास
Advertisement

अनेक राजकिय घडामोडींनंतर कर्नाटकमध्ये अखेर नेतृत्व बदल करण्यात आला आहे. गेले काही दिवस मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे पदाचा राजीनामा देणार अशा चर्चा राजकिय वर्तुळात होत्या. अखेर त्यांनी बुधवारी आपला राजीनामा राज्यपालांच्या सचिवांकडे सुपूर्द करुन चर्चांना विराम दिला. साहजिकच त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असणारे डीके शिवकुमार यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडणार हे निश्चित मानले जात आहे.

Advertisement

समर्थकांचा जल्लोष

शिवकुमार यांचा मुख्यंमंत्री पदाचा मार्ग मोकळा होताच बंगळूरुमध्ये डी. के. शिवकुमार यांच्या समर्थकांनी त्यांच्या घराबाहेर मिठाई वाटून आनंद साजरा केला. दरम्यान, कलबुर्गीमध्ये भारतीय युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी श्री शरण बसवेश्वर मंदिरात विशेष पूजा केली आणि डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री झाल्यास प्रियांक खर्गे यांना उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्त करण्याची मागणी केली.

Advertisement

डी. के. शिवकुमार हे काँग्रेस पक्षाचे एक विश्वासू संकटमोचक आणि खंबीर संघटक मानले जातात. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात विद्यार्थी राजकारणातून केली आणि हळूहळू ते कर्नाटक काँग्रेसच्या सर्वात प्रभावशाली नेत्यांपैकी एक बनले. चला पाहूया त्यांचा प्रवास नेमका कसा झाला?

विद्यार्थी राजकारणातून प्रवेश.

डी. के. शिवकुमार यांनी वयाच्या १८ व्या वर्षी काँग्रेस पक्षाची विद्यार्थी संघटना असलेल्या एनएसयूआयमधून राजकारणात प्रवेश केला. त्यांनी १९८१ ते १९८३ या काळात बंगळूर जिल्हा एनएसयूआयचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. या काळात त्यांचे संघटन आणि त्यावरील पकड यांचं कौतुक केलं गेलं. यानंतरच्या काळात ते युवक काँग्रेसमध्ये सामील झाले आणि कर्नाटक युनिटचे सरचिटणीस बनले.

डीके शिवकुमार यांच्या आयुष्यातली महत्वाची निवडणूक झाली ती १९८५ मध्ये. या निवडणूकीत त्यांना काँग्रेसने  जनता दलाचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या विरोधात साथनूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. या निवडणूकीत डीके शिवकुमार यांचा मोठा कस लागणार होता.

ही निवडणूक ते निवडणूक हरले, पण त्यांच्या कडव्या आव्हानामुळे त्यांना राज्य राजकारणात ओळख मिळाली. नंतर मात्र १९८७ मध्ये ते बंगळूर ग्रामीण जिल्हा परिषदेवर निवडून आले आणि १९८९ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर त्यांनी आपला राजकीय प्रभाव सातत्याने वाढवला.

काँग्रेसमधील वाढता प्रभाव

१९९० च्या दशकात काँग्रेस पक्षात डी. के. शिवकुमार यांचे स्थान झपाट्याने उंचावले. एस. बंगारप्पा सरकारला सत्तेवर आणण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आणि नंतर ते मंत्री झाले. त्यावेळी ते राज्यातील सर्वात तरुण मंत्र्यांपैकी एक होते.

डीके शिवकुमार यांच्या आयुष्यातली आणखी एक महत्त्वाची निवडणूक म्हणजे १९९४ कर्नाटक विधानसभा निवडणूक. या निवडूकीत काँग्रेसने त्यांना तिकीट नाकारले, पण त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आणि जिंकले.

यातून त्यांची वैयक्तिक राजकीय ताकद आणि पाठिंबा स्पष्टपणे दिसून आला. १९९९ मध्ये, एस. एम. कृष्णा यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या विजयात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्या निवडणुकीत काँग्रेसने १३९ जागा जिंकल्या होत्या. सरकार स्थापन झाल्यानंतर शिवकुमार यांची सहकार मंत्री म्हणून नियुक्ती झाली.

डी. के शिवकुमार यांच्यावरील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या

डी. के. शिवकुमार यांनी नगरविकास, ऊर्जा आणि इतर महत्त्वाच्या विभागांमध्येही महत्त्वपूर्ण खाती सांभाळली. त्यांनी युवक आणि महिलांशी संबंधित अनेक योजनांवर काम केले. कालांतराने, ते काँग्रेसचे संकटमोचक म्हणून ओळखले जाऊ लागले.

राजकीय संकटांच्या काळात आमदारांना एकजूट ठेवण्यात आणि आघाड्यांसाठी वाटाघाटी करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. १९९९ मध्ये, त्यांनी साथनूर मतदारसंघात एच. डी. कुमारस्वामी यांचा पराभव केला. हा पराभव माजी पंतप्रधान देवेगौडा यांच्या घराण्याविरुद्ध त्यांच्यासाठी एक मोठा राजकीय विजय मानला गेला.

वादग्रस्त ठरलेले डी. के शिवकुमार

डी. के. शिवकुमार यांची राजकीय कारकीर्दही वादांनी घेरलेली आहे. २०१७ मध्ये, आयकर विभागाने त्यांच्याशी संबंधित अनेक मालमत्तांवर छापे टाकले होते. सप्टेंबर २०१९ मध्ये, अंमलबारी संचालनालयाने त्यांना कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली.

तुरुंगातून सुटका झाल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना व्यापक पाठिंबा दिला, ज्यामुळे त्यांची राजकीय प्रतिमा आणखी मजबूत झाली. ११ मार्च २०२० रोजी सोनिया गांधी यांनी त्यांची कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. त्यानंतर त्यांनी राज्यात पक्षाची संघटना मजबूत करण्याच्या कामाला सुरुवात केली.

डी. के शिवकुमार यांचा वाढता प्रभाव

डी. के. शिवकुमार यांनी सिद्धरामय्या यांच्यासोबत २०२३ च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या प्रचाराचे नेतृत्व केले. काँग्रेसने भाजपचा पराभव करून राज्यात सत्ता मिळवली. त्यावेळी डी. के. शिवकुमार हे मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदारही होते.

पण पक्षाने सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री आणि डी. के. शिवकुमार यांना उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्त केले. पक्षातील अनेक नेत्यांचा असा विश्वास आहे की, विद्यार्थी राजकारणातून सुरू झालेला त्यांचा प्रवास आता मुख्यमंत्रीपदाच्या रूपाने एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर पोहोचला आहे.

Advertisement
Tags :

.