जोकोविच, वोझ्नियाकी, सिनरची विजयी सलामी
वृत्तसंस्था/ मेलबर्न
रविवारपासून येथे सुरू झालेल्या 2024 च्या टेनिस हंगामातील पहिल्या ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत पुरुष विभागात सर्बियाचा टॉप सिडेड नोव्हॅक जोकोविच तसेच इटलीचा यानिक सिनर आणि महिला विभागात कॅरोलिन वोझ्नियाकी यांनी विजयी सलामी दिली.
पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात टॉप सिडेड जोकोविचने क्रोएशियाचा डिनो प्रिझमिक याचा 6-2, 6-7(5-7), 6-3, 6-4 अशा सेट्समध्ये पराभव करत विजयी सलामी दिली. जोकोविचने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीत आतापर्यंत 24 ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे मिळवली असून त्यामध्ये ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेतील 10 जेतेपदांचा समावेश आहे. जोकोविचने 2005 साली या स्पर्धेत पहिल्यांदा आपला सहभाग दर्शविला होता. दरम्यान रविवारच्या सामन्यातील त्याचा प्रतिस्पर्धी क्रोएशियाचा प्रिझमिक याचा जन्म 2005 च्या ऑगस्टमध्ये झाला होता. मात्र, रविवारच्या सामन्यात प्रिझमिकने जोकोविचला विजयासाठी चार सेट्समध्ये झगडावे लागले.
पुरुष एकेरीच्या अन्य एका सामन्यात इटलीच्या यानिक सिनरने विजयी सलामी देताना हॉलंडच्या बोटीक व्हॅन डे झांडस्कल्पचा 6-4, 7-5, 6-3 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. 22 वर्षीय सिनर हा पुरुष टेनिसपटूंच्या मानांकनात सध्या चौथ्या स्थानावर आहे.
महिला एकेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात माजी ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम विजेती कॅरोलिन वोझ्नियाकीने पोलंडच्या मॅग्डा लिनेटचा पराभव करत दुसऱ्या फेरीत स्थान मिळवले. या सामन्यात पोलंडची 20 वी मानांकित लिनेटला दुखापतीमुळे दुसरा सेट अर्धवट सोडावा लागला. वोझ्नियाकीने हा सामना 6-2, 2-0, असा जिंकून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. या लढतीमध्ये वोझ्नियाकीने पहिल्या सेटमध्ये लिनेटची तीनवेळा सर्व्हिस भेदली.