लॉरेस पुरस्कार वितरणात जोकोविच प्रमुख आकर्षण
वृत्तसंस्था / माद्रीद
जागतिक अॅथलेटिक्स क्रीडाक्षेत्रामध्ये दर्जेदार कामगिरी करणाऱ्या विविध क्रीडा प्रकारातील खेळाडूंना प्रत्येक वर्षी स्पेनची राजधानी माद्रीदमध्ये प्रतिष्ठेचा समजला जाणारा लॉरेस विश्व क्रीडा पुरस्कार दिला जातो. आता 25 व्या लॉरेस क्रीडा पुरस्कारासाठी सर्बियाचा माजी टॉपसिडेड टेनिसपटू नोव्हॅक जोकोविच प्रमुख आकर्षण ठरणार आहे.
माद्रीदमध्ये सलग दुसऱ्या वर्षी लॉरेस विश्व क्रीडा पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे. हा समारंभ 21 एप्रिलला आयोजित केला आहे. जोकोविचने आतापर्यंत आपल्या वैयक्तिक टेनिस कारकिर्दीत विक्रमी 24 ग्रॅन्डस्लॅम अजिंक्यपदे मिळविली आहेत. तसेच त्याने यापूर्वी 5 वेळा लॉरेस विश्व क्रीडा पुरस्कार पटकाविला आहे. गेल्या वर्षी माद्रीदमध्ये जोकोविचचा हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देवून गौरविण्यात आला होता. 21 एप्रिल रोजी होणाऱ्या या पुरस्कार वितरण समारंभाला जोकोविच, जर्मनीचा माजी टेनिसपटू बोरीस बेकर, फुटबॉलपटू कफु, लुईस फिगो, रुड गलिट, जिमॅन्स्ट नादिया, कोमानेसी, ब्रायइ हेबाना, ख्रिस हॉय, स्टीव्ह रेडग्रिव्ह आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह वॉ उपस्थित राहणार आहेत.