जोकोविच, रायबाकिना, पेगुला उपांत्य फेरीत
स्वायटेक, अॅनिसिमोव्हा स्पर्धेबाहेर, मुसेटीची दुखापतीमुळे माघार
वृत्तसंस्था / मेलबर्न
2026 च्या ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत एलिना रायबाकिना आणि अमेरिकेची जेसिका पेगुला यांनी महिला एकेरीची तर सर्बियाच्या माजी टॉपसिडेड जोकोविचने पुरूष एकेरीची उपांत्य फेरी गाठली. पोलंडच्या स्वायटेकचे तसेच अमेरिकेच्या अॅनिसिमोव्हाचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत समाप्त झाले. इटलीच्या मुसेटीने दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतल्याने जोकोविचने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात 2023 नंतर पहिल्यांदाच या स्पर्धेत उपांत्य फेरी गाठणाऱ्या इलिना रायबाकिनाने पोलंडच्या द्वितीय मानांकीत इगा स्वायटेकचा 7-5, 6-1 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीचा हा सामना 100 मिनिटे चालला होता. या सामन्यात रायबाकिनाने शेवटचे 9 पैकी 6 गेम्स जिंकले. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरपासून रायबाकिनाने 19 पैकी 18 सामने जिंकले आहेत. तर या लढतीत रायबाकिनाने दुसऱ्या सेटमध्ये स्वायटेकला केवळ एक गेम जिंकण्याची संधी दिली होती. आता या स्पर्धेत रायबाकिनाचा उपांत्य फेरीचा सामना अमेरिकेच्या जेसिका पेगुलाशी होईल. रायबाकिनाने या स्पर्धेत 21 व्या मानांकीत इलेसी मर्टन्सचे आव्हान संपुष्टात आणत उपांत्यपूर्व फेरी गाठली होती.
महिला एकेरीच्या दुसऱ्या एका सामन्यात अमेरिकेच्या जेसिका पेगुलाने आपल्याच देशाच्या अमंदा अॅनिसिमोव्हाचा 6-2, 7-6 (7-1) असा पराभव करत शेवटच्या चार खेळाडूंत स्थान मिळविले. या स्पर्धेत पहिल्यांदाच पेगुलाने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली आहे. हा उपांत्यपूर्व फेरीचा सामना 110 मिनिटे चालला होता. पेगुलाने पहिला सेट 6-2 असा आरामात जिंकल्यानंतर अॅनिसिमोव्हाने दुसऱ्या सेटमध्ये कडवी लढत देत पेगुलाला विजयासाठी टायब्रेकरपर्यंत झगडावे लागले. या स्पर्धेत पेगुलाने आपल्याच देशाच्या तीन स्पर्धकांना पराभूत करत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारण्याचा पराक्रम केला आहे. असा पराक्रम करणारी पेगुला ही अमेरिकेची पहिली महिला टेनिसपटू असून यपूर्वी म्हणजे 1993 साली गिगी फर्नांडीसने असा पराक्रम नोंदविला होता.
पुरूष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सर्बियाच्या माजी टॉपसिडेड जोकोविचने इटलीच्या लोरेंझो मुसेटीचा 6-4, 6-3, 3-1 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली आहे. जोकोविचने पहिले दोन सेट्स जिंकल्यानंतर तिसऱ्या सेटमध्ये 3-1 अशी आघाडी मिळविली होती. दरम्यान मुसेटीला स्नायु दुखापतीमुळे सातत्याने वेदना जाणवू लागल्याने त्याने हा सामना अर्धवट सोडला. जोकोविचने आता या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. त्याने आतापर्यंत ही स्पर्धा 10 वेळा जिंकली असून तो आता विक्रमी 25 वी ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकण्यासाठी आतुरलेला आहे. इटलीचा जेनिक सिनर व अमेरिकेचा बेन शेल्टन यांच्यात उपांत्यपूर्व फेरीची लढत होणार असून या लढीतील विजयी खेळाडूबरोबर जोकोविचचा उपांत्य फेरीचा सामना होईल.