For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जोकोविच, गॉफ, मुचोव्हा, सिनर उपांत्य फेरीत

06:55 AM Jul 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
जोकोविच  गॉफ  मुचोव्हा  सिनर उपांत्य फेरीत
Advertisement

विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस : मार्टा कोस्ट्युक, व्हेरेवचीही आगेकूच, ओसाका, पाओलिनी यांचे आव्हान संपुष्टात

Advertisement

वृत्तसंस्था,लंडन

सर्बियाच्या माजी विजेत्या नोव्हॅक जोकोविचने 39 व्या वर्षीही दमदार व तोडीस तोड खेळाचे प्रदर्शन करीत कॅनडाच्या 25 वर्षीय फेलिक्स ऑगर अॅलियासिमेचा पराभव करून विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत स्थान मिळविले. तब्बल पाच तासाहून अधिक काळ ही झुंज रंगली होती. याशिवाय इटलीचा जेनिक सिनर, महिला एकेरीत अमेरिकेच्या कोको गॉफने पहिल्यांदाच या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. कॅरोलिना मुचोव्हा व मार्टा कोस्ट्युक यांनी उपांत्य फेरीत तर अलेक्झांडर व्हेरेव्हनेही विजय मिळवित आगेकूच केली तर जपानच्या नाओमी ओसाका व जस्टिन पाओलिनी यांचे आव्हान संपुष्टात आले.

Advertisement

पाचव्या सेटच्या सुपर टायब्रेकरमध्ये दीर्घ रॅलीच्या 22 व्या शॉटवेळी जोकोविचने अलियासिमेच्या फोरहँड फटक्यावर विजय मिळविला. पाच तास 15 मिनिटे रंगलेली ही झुंज जोकोविचने 7-6 (12-10), 3-6, 6-3, 6-7 (4-7), 7-6 (7-4) अशी जिंकून विक्रमी 25 व्या ग्रँडस्लॅम जेतेपदाकडे आगेकूच केली. विम्बल्डनमध्ये सलग आठव्यांदा उपांत्य फेरीत स्थान मिळविण्याचा विक्रम नोंदवताना त्याने फेडररचा विक्रम मागे टाकला. त्याची उपांत्य लढत इटलीच्या सिनरशी होईल.

सिनरने जॅन लेनार्ड स्ट्रफचा 7-5, 7-6 (7-4), 6-3 असा पराभव करीत शेवटच्या चार खेळाडूंत स्थान मिळविले. गेल्या वर्षी याच फेरीत सिनरने सरळ सेट्समध्ये जोकोविचचा पराभव केला होता. मात्र यावर्षी ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये जोकोविचने उपांत्य फेरीतच सिनरला पाच सेट्समध्ये पराभूत केले होते. पुरुष एकेरीच्या चौथ्या फेरीतील एका सामन्यात दुसऱ्या मानांकित अलेक्झांडर व्हेरेवने जिरी लेहेकाचा 6-4, 7-5, 3-6, 7-6 (8-6) असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्याची पुढील लढत सहाव्या मानांकित टेलर फ्रिट्झविरुद्ध होईल.

गॉफ विजयी, ओसाका पराभूत

महिला एकेरीत कोको गॉफने संघर्षपूर्ण लढतीत जेसिका पेगुलाचा 4-6, 6-3, 6-3 असा पराभव केला. या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्याची तिची ही पहिलीच वेळ आहे. चारही ग्रँडस्लॅमची उपांत्य फेरी गाठणारी मारिया शरापोव्हानंतरची ही पहिलीच सर्वात तरुण खेळाडू आहे. शरापोव्हाने 2007 मधील फ्रेंच ओपनमध्ये हा पराक्रम पूर्ण केला होता. गॉफला याआधी सहा वेळा या स्पर्धेंची चौथी फेरी पार करता आली नव्हती. गॉफची उपांत्य लढत दहाव्या मानांकित झेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना मुचोव्हाशी होईल. मुचोव्हाने जपानच्या नाओमी ओसाकाचे आव्हान चौथ्या फेरीतच 7-6 (7-4), 6-4 असे संपुष्टात आणले. अन्य एका सामन्यात युक्रेनच्या मार्टा कोस्ट्युकने पाओलिनीचा 6-3, 6-2 असा पराभव पहिल्यांदाच या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. प्रेंच ओपनमध्येही तिने उपांत्य फेरी गाठली होती. पण त्यावेळी अँड्रीव्हाने तिला हरविले होते. उपांत्य फेरीत तिचा मुकाबला लिंडा नोस्कोव्हाशी होईल. नोस्कोव्हाने एलिस मर्टेन्सचा 6-3, 7-5 असा पराभव केला.

Advertisement
Tags :

.