For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जोकोविच-अल्कारेझ अंतिम फेरीत

06:57 AM Jan 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
जोकोविच अल्कारेझ अंतिम फेरीत
Advertisement

ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम : चुरशीच्या लढतीनंतर जॅनिक सिनर, अलेक्झांडर व्हेरेव्ह पराभूत

Advertisement

वृत्तसंस्था/ मेलबर्न, ऑस्ट्रेलिया

स्पेनचा कार्लोस अल्कारेझ व सर्बियाचा नोव्हॅक जोकोविच यांनी ऑस्ट्रेलिया ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीची अंतिम फेरी गाठली तर जर्मनीचा अलेक्झांडर व्हेरेव्ह व इटलीचा जॅनिक सिनर यांचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले. मिश्र दुहेरीत ऑलिव्हिया गॅडेकी व जॉन पीअर्स यांनी जेतेपद पटकावले.

Advertisement

अल्कारेझने दुखापत व पायात येणारे क्रँप्सवर मात करीत अलेक्झांडर व्हेरेव्हवर अतिशय रोमहर्षक ठरलेल्या झुंजीत 6-4, 7-6 (7-5), 6-7 (3-7), 6-7 (4-7), 7-5 असा विजय मिळवित अंतिम फेरी गाठली. 5 तास 27 मिनिटे ही अटीतटीची झुंज रंगली होती. 22 वर्षीय अल्कारेझने पहिल्यांदाच या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली असून करीअर ग्रँडस्लॅम पूर्ण करणारा सर्वात युवा खेळाडू बनण्यासाठी तो प्रयत्नशील आहे. तिसऱ्या सेटमध्ये सामना संपवण्यासाठी त्याला फक्त दोन गुणांची गरज होती. पण व्हेरेव्हने झुंजार खेळ करीत या सेटसह नंतरचा सेटही टायब्रेकरमध्ये जिंकून बरोबरी साधली आणि सामना पाचव्या सेटपर्यंत लांबवला. विशेष म्हणजे आधीच्या पाचही लढतीत अल्कारेझने एकही सेट गमविला नव्हता. निर्णायक सेटमध्येही त्याने पहिला गेम गमविला. आणि दहाव्या गेममध्ये सामन्यासाठी संपवण्यासाठी व्हेरेव्ह सर्व्हिस करेपर्यंत त्याने ब्रेक मिळविला नव्हता. अल्कारेझची जेतेपदाची लढत रविवारी नोव्हॅक जोकोविचशी होईल.

दहा वेळा ही स्पर्धा जिंकणाऱ्या जोकोविचने दुसऱ्या चुरशीच्या उपांत्य लढतीत दोन वेळचा डिफेंडिंग चॅम्पियन व द्वितीय मानांकित जॅनिक सिनरवर पाच सेट्समध्ये मात करून अंतिम फेरी गाठली. चौथ्या मानांकित जोकोविचने ही लढत  3-6, 6-3, 4-6, 6-4, 6-4 अशा सेट्सनी जिंकली. चार तासाच्या वर ही लढत रंगली होती. त्याने आजवर एकेरीची 24 ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे मिळविली असून विक्रमी 25 वे जेतेपद मिळविण्याच्या तो अगदी समीप पोहोचला आहे. 38 वर्षीय जोकोविच ही स्पर्धा जिंकणारा सर्वात वयस्कर खेळाडूचा प्रयत्नही करणार आहे.

गॅडेकी-पीअर्स मिश्र दुहेरीत विजेते

मिश्र दुहेरीमध्ये ऑलिव्हिया गॅडेकी व जॉन पीअर्स यांनी क्रिस्टिना म्लाडेनोविच व मॅन्युअल गिनार्ड यांच्यावर 4-6, 6-3, 10-8 अशी मात करून जेतेपद पटकावले.

Advertisement
Tags :

.