For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जोकोविच, अल्कारेझ, साबालेंका, गॉफ चौथ्या फेरीत

06:48 AM Jan 18, 2025 IST | Tarun Bharat Portal
जोकोविच  अल्कारेझ  साबालेंका  गॉफ चौथ्या फेरीत
Advertisement

मेदवेदेव्ह, मॅकहेक, ओसाका, टॉसन, बोर्जेस पराभूत, ओसाका दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर

Advertisement

वृत्तसंस्था / मेलबोर्न

2025 च्या टेनिस हंगामातील येथे सुरू असलेल्या पहिल्या ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लीम टेनिस स्पर्धेत पुरुष विभागात स्पेनचा अल्कारेझ, सबिर्याचा जोकोविच, जर्मनीचा व्हेरेव्ह, तसेच महिलांच्या विभागात टॉपसिडेड साबालेंका, अमेरिकेची गॉफ यांनी चौथ्या फेरीत प्रवेश मिळविला. मात्र रशियाच्या डॅनिल मेदवेदेव्हचे तसेच जपानच्या नाओमी ओसाकाचे आव्हान तिसऱ्या फेरीत समाप्त झाले.

Advertisement

शुक्रवारी पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीतील सामन्यात आतापर्यंत 24वेळा ग्रँडस्लॅम अजिंक्यपदाचा विक्रम करणाऱ्या सबिर्याच्या जोकोविचने 26 व्या मानांकित मॅकहेकचा 6-1, 6-4, 6-4 अशा सरळ सेटसमध्ये पराभव करत चौथी फेरी गाठली. जोकोविचने आतापर्यंत दहावेळा ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली आहे. चौथ्या फेरीत जोकोविचची लढत लिहेका बरोबर होणार आहे.

तिसऱ्या फेरीतील अन्य एका सामन्यात स्पेनच्या तृतीय मानांकित कार्लोस अल्कारेझने नुनो बोर्जेसचा 6-2, 6-4, 6-7 (3-7), 6-2 त्याच प्रमाणे जर्मनीच्या द्वितीय मानांकित अॅलेक्सझँडेर व्हेरेव्हने जेकॉब फर्नेलीचा 6-3, 6-4, 6-4, अमेरिकेच्या टॉमी पॉलने रॉबर्टो बाएनाचा 7-6 (7-0), 6-2, 6-0 असा पराभव करत चौथी फेरी गाठली. तिसऱ्या फेरीतील अन्य एका सामन्यात अमेरिकेच्या 19 वर्षीय लर्नर टिएनने रशियाच्या अनुभवी डॅनील मेदवेदेव्हला पाच सेटस्मधील लढतीत पराभवचा धक्का दिला. 1990 नंतर या स्पर्धेत पुरुष एकेरीची तिसरी फेरी गाठणारा टिएन हा सर्वात तरुण टेनिसपटू ठरला आहे. 1990 साली अमेरिकेच्या पीट सांप्रासने असा विक्रम केला होता. मेदवेदेव्ह आणि टिएन यांच्यातील सामना जवळपास 5 तास चालला होता. तिसऱ्या फेरीतील अन्य एका सामन्यात अॅलेजेंड्रो फोकीनाने 19 वर्षीय मेनसिकवर 3-6, 4-6, 7-6 (7-5), 6-4, 6-2 अशा पाच सेटसमधील लढतीत मात करत चौथी फेरी गाठली.

साबालेंका, गॉफ विजयी

महिला एकेरीच्या शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या तिसऱ्या फेरीतील सामन्यात विद्यमान विजेती आर्यना साबलेंकाने चौथ्या फेरीत प्रवेश मिळविला. तिने टॉसनचा 7-6 (7-5), 6-4 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. नव्या वर्षाच्या टेनिस हंगामातील साबालेंकाचा हा सलग आठवा तर मेलबोर्न पार्क टेनिस कोर्टवरील तिचा हा 17 वा विजय आहे. अमेरिकेच्या कोको गॉफने तिसऱ्या फेरीतील सामन्यात कॅनडाच्या लैला फर्नांडीसचे आव्हान 6-4, 6-2 अशा सरळ सेटमध्ये संपुष्टात आणले. गॉफने हा सामना 75 मिनिटांत जिंकला.  गॉफचा चौथा फेरीतील सामना अॅन्ड्रीव्हाबराब्sार होणार आहे. अॅन्ड्रीव्हाने तिसऱ्या फेरीतील सामन्यात फ्रेचचा 6-2, 1-6, 6-2 तर बेडोसाने मार्टा कोस्ट्युकचा 6-4, 4-6, 6-3, पॅव्हेलचेंकोव्हाने लॉरा सिगमंडचा 6-1, 6-2 असा पराभव करत चौथ्या फेरीत प्रवेश मिळविला. जपानच्या नाओमी ओसाकाला दुखापतीमुळे तिसऱ्या फेरीतील सामन्या अर्धवट सोडावा लागला.  बेनसिकने ओसाका विरुद्धच्या लढतीतील पहिला सेट 7-6 (7-3) असा जिंकला. त्यानंतरआसाकाने दुखापतीमुळे आपण या सामन्यातून माघार घेत असल्याचे जाहीर केल्याने पंचांनी बेनसिकला विजयी म्हणून घोषित केले. हा सेट 55 मिनिटे चालला होता.

बोपण्णा-झँग मिश्र दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत

मिश्र दुहेरीत भारताचा रोहन बोपण्णा व चीनची शुआई झँग यांनी दुसरी फेरी गाठली. त्यांनी इव्हान डोडिग व क्रिस्टिना म्लाडेनोविक यांचा 6-4, 6-4 असा पराभव केला. पुरुष दुहेरीत बोपण्णाचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले असल्याने त्याची भरपाई तो मिश्र दुहेरीत करण्याचा प्रयत्न करीत आहे. सुमारे सव्वातास ही लढत रंगली होती. बोपण्णा-झँग यांची पुढील लढत अमेरिकेचा टेलर टाऊनसेन्ड व मोनेगास्कची ह्युगो नीस किंवा ऑस्ट्रेलियाच्या मॅडिसन इंग्लिस व जेसन कुबेर यापैकी एका जोडीशी होईल.

Advertisement
Tags :

.