भारतीय शेअर बाजाराची तेजीसह दिवाळी
सेन्सेक्स 602 अंकांनी तेजीत, बँकिंग क्षेत्राचा सहारा
वृत्तसंस्था/ मुंबई
सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअर बाजार बँकिंग आणि धातू क्षेत्राच्या कामगिरीच्या जोरावर चांगल्या तेजीसमवेत बंद झाला. सेन्सेक्स 602 अंकांनी वधारत बंद झाला. यायोगे गेल्या आठवड्यामध्ये सुरु असणाऱ्या सलग घसरणीला सोमवारी तेजीने ब्रेक लागला.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 602 अंकांनी वधारत 80005 अंकांवर आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 158 अंकांनी वाढत 24339 अंकांवर बंद झाला. गुंतवणुकदारांच्या खात्यात सोमवारी 6 लाख कोटी रुपये जमा झाले. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा निर्देशांक आणि धातू निर्देशांक सर्वाधिक वधारत बंद झालेले पहायला मिळाले. आयसीआयसीआय बँक, अदानी पोर्टस्, जेएसडब्ल्यू स्टील आणि टाटा स्टिल यांचे समभागसुद्धा दमदार फॉर्मात होते.
मागच्या आठवड्यामध्ये शेअर बाजार घसरणीत राहिला होता. सोमवारी मात्र या घसरणीला विराम मिळाला. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकात चांगली तेजी अनुभवायला मिळाली. दुपारी 12 पर्यंत दोन्ही निर्देशांक जवळपास एक टक्का तेजीत होते. एकावेळी तर सेन्सेक्स 1100 अंकांनी वाढत व्यवहार करत होता. निफ्टीनेदेखील 24450 चा स्तर गाठला होता. मात्र शेवटच्या क्षणी या तेजीमध्ये काहीशी घसरण दिसून आली. बीएसईवर सूचिबद्ध सर्व कंपन्यांचे बाजार भांडवलमूल्य 5.7 लाख कोटी रुपये वाढून 442.66 लाख कोटी रुपयांवर पोहोचले होते.
हे समभाग वधारले
सोमवारच्या सत्रामध्ये आयसीआयसीआय बँकेचा समभाग 3 टक्के वाढत 1293 रुपयांवर आणि अदानी पोर्टस्चे समभाग 2.55 टक्के वाढत 1352 रुपयांवर बंद झाले. दुसरीकडे जेएसडब्ल्यू स्टीलचे समभाग 2.50 टक्के वाढत 967 या भावावर तर टाटा स्टीलचे समभाग 2.42 टक्के वाढत 149 रुपयांवर बंद झाले.