दिवाळीचा धूर...
दीपावली हा दिव्यांचा, प्रकाशाचा उत्सव म्हणून ओळखला जातो. दिवाळीच्या या तेजात सारा आसमंत यंदाही उजळून निघाला, हे निश्चित. किंबहुना, तरीही या दिवाळसणात ज्या पद्धतीने फटाक्यांची मुक्तपणे आतषबाजी झाली, ती चिंताजनकच म्हणायला हवी. मनुष्य हा जसा समाजप्रिय तसाच उत्सवप्रियही प्राणी आहे. रंजनाकरिता उत्सव साजरा करण्यामध्ये काहीही गैर नाही. भारतीय सण, उत्सवांमध्ये परंपरा, शास्त्र, रंजन आणि वैज्ञानिकता याचा सुंदर मिलाफ साधण्यात आला आहे. मग उटण्याने अभ्यंगस्नान करण्याची प्रथा असो वा फराळातील वैविध्य असो. त्या त्या हंगामाचा, ऋतुमानाचा विचार करूनच ही रचना करण्यात आली आहे. अर्थात कालानुरूप कोणत्याही सणउत्सवात बदल होत असतो. त्याप्रमाणेच फटाके हादेखील या सणाचा भाग बनला असावा. परंतु, या फटाक्यांच्या दणदणाटात सगळा दिवाळसण हरवून वा झाकोळून जात असेल, तर त्याचा कुठेतरी विचार करणे क्रमप्राप्त ठरते. मागच्या काही वर्षांत फटाके फोडण्याचे प्रमाण वाढले आहे. दिल्ली, मुंबईपासून ते पुणे, ठाण्यापर्यंत देशातील सर्वच शहरांमध्ये फटाक्यांचा आणि पैशाचा निघणारा धूर डोळे चोळायला लावल्याशिवाय राहत नाही. नवी दिल्ली ही देशाची राजधानी. परंतु, जगातील सर्वाधिक प्रदुषित शहरांमध्ये हे महानगर अग्रभागी असते. दिवाळी सण व हिवाळ्यात दिल्लीतील प्रदूषण एवढे वाढते, की विचारता सोय नाही. प्रदूषणामुळे अनेकदा या शहरावर संचारबंदी लागू करण्याचीही वेळ येते, यातच सारे आले. या वर्षी दिल्लीतील प्रदूषणात फटाक्मयांचा वाटा तब्बल 30 ते 40 टक्क्मयांपर्यंत होता. सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्चचे संस्थापक आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड स्टडीजचे प्राध्यापक गुफरान बेग यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाळी सणाच्या काळातील फटाक्मयांच्या धुरामुळे एकूण प्रदूषणात 70 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाल्याचे दिसून आले. खरे तर या वर्षी दिवाळी काहीशी लवकर आली. दिवसा दुपारी ऑक्टोबर हीटसारखी स्थिती व रात्री पावसाळी वातावरण, यामुळे थंडी अशी नव्हतीच. अन्यथा, परिस्थिती आणखी बिकट झाली असती. तथापि, फटाक्मयांवर पूर्णपणे बंदी घातली असती, तर दिल्लीची हवा अधिक स्वच्छ राहिली असती, असेही बेग म्हणतात, ती वस्तुस्थिती होय. खरे तर दिल्लीतील फटाक्यांच्या बंदीचा विषय या खेपेला मोठ्या प्रमाणात चर्चिला गेला. अगदी न्यायालयापर्यंतही हा विषय पोहोचला. परंतु, दिल्लीत फटाक्यांवर बंदी घातली, तर हा नियम देशातील सर्व शहरांना लावावा लागेल, अशी टिप्पणी न्यायालयाकडून करण्यात आली होती. असे असले, तरी दिल्लीतील एकूणच प्रदूषणाचा गंभीर विषय पाहता येथील नागरिकांनी जबाबदारीचे भान ठेवायला हवे होते. ते दुर्दैवाने ठेवले गेले नाही. या पार्श्वभूमीवर पर्यावरण संशोधक सुनील दहिया यांनी दिवाळीच्या रात्री प्रदूषणाची पातळी आधीच्या दिवसांच्या संध्याकाळच्या तुलनेत सात ते आठ पटीने वाढल्याकडे लक्ष वेधत दिल्ली-एनसीआरसारख्या जास्त प्रदूषित प्रदेशात फटाक्मयांवर बंदी घालणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे. ते चुकीचे ठरू नये. मागच्या अनेक वर्षांपासून दिल्लीच्या प्रदूषणावर सातत्याने चर्चा होत आली आहे. काही उपाययोजनाही होत आहेत. परंतु, त्या तोकड्या पडताना दिसतात. प्रदूषण फटाक्यांचे असो, वाहनांचे असो वा पंजाब, हरियाणातून येणाऱ्या धुराचे असो. त्याची तीव्रता कशी कमी करता येईल, हे पहायला हवे. मात्र, एक, दोन फटाके फोडून असे काय होईल, असा विचार प्रत्येक जण करणार असेल, तर ही समस्या अशीच वाढत जाईल. जे दिल्लीचे तेच इतर शहरांचे. मुंबई, ठाणे, पुण्यापासून ते राज्यातील इतर शहरांमध्येही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फटाक्यांच्या धुराचे लोटच्या लोट पहायला मिळाले. ज्यांच्या घरी ज्येष्ठ नागरिक, लहान मुले वा ऊग्ण आहेत, त्यांना अक्षरश: घराची दारे, खिडक्या बंद करून आतमध्ये बसावे लागले. एरवी पर्यावरणाच्या नावाने गळे काढणाऱ्यांची आपल्याकडे कमी नाही. निसर्ग पर्यटन करायला तर साऱ्यांनाच आवडते. पण, त्याच्या रक्षणाची वेळ येते, तेव्हा काही अपवाद वगळता सगळेच माघार घेतात. फटाक्यांचा मोठा त्रास प्राणी व पक्ष्यांनाही होतो. अनेकदा यात त्यांना जीव गमवावा लागतो. हृदयरोगी, अस्थमा वा दम्याच्या ऊग्णांवरही प्रदूषणाने गुदमरण्याची वेळ येते. पण, हे सारे लक्षात घेतो कोण? फटाक्यांना पर्याय म्हणून पर्यावरणपूरक फटाकेही निघाले आहेत. त्याने तुलनेत कमी प्रदूषण होते, असे म्हणतात. पण, त्यांची किंमत जरा जास्त आहे, त्याबाबत काय होईल का, हे पहायला हवे. फटाके एकाच वेळी ध्वनी व वायू प्रदूषण करतात. अनेकांचा मोठ्या आवाजाचे फटाके वाजवण्याकडे कल असतो. सुतळी बॉम्बसारखे फटाके यामध्ये मोडतात. त्यांचा आवाज व प्रदूषण पाहता त्यांच्यावर बंदीच असायला हवी. पण, सरकार या पातळीवर काहीच करताना दिसत नाही. सरकारने केवळ शोभेचे व कमी आवाजाच्या फटाक्यांनाच परवानगी दिली, तर अशा कानठळ्या बसवणाऱ्या फटाक्यांना फाटा मिळू शकतो. मुख्य म्हणजे हा मानसिकतेचा प्रश्न आहे. सरकारनेच मुळावर घाव घालण्याचे ठरवले, तर फटाक्यांवर नक्कीच निर्बंध घालता येतील. मात्र, रोजगार वगैरे अशी लंगडी कारणे दिली जातात. खरे तर फटाक्यांच्या कारखान्यांमधील दुर्घटनांमध्येही अनेक कामगारांना दरवर्षी आपले प्राण गमवावे लागतात. हे बघता या पातळीवर सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न नक्कीच करता येईल. दिवाळी हा आनंदाचा, मांगल्याचा आणि तेजाचा सण आहे. पण, धुराचे लोट असेच वाढत राहिले, तर हा उत्सव काळवंडल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच आत्तापासूनच काळजी घेतली पाहिजे.