स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये 'दिवाळी सेल' उपक्रम उत्साहात
सावंतवाडी । प्रतिनिधी
विद्यार्थ्यांना जीवन कौशल्य अवगत व्हावे व त्यांच्यामधील सर्जनशील वृत्तीचा विकास व्हावा यासाठी स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये 'दिवाळी सेल' हा उपक्रम करण्यात आला. या उपक्रमामध्ये सेलसाठी विविध वस्तू ठेवण्यात आल्या होत्या. त्यामध्ये, विणलेले रुमाल, तोरणे, केसांना लावण्याचे क्लिप, लहान व मोठ्या आकाराचे आकाश कंदील, विद्यार्थ्यांनी स्वतः रंगविलेल्या पणत्या, दिवाळीसाठी लागणारा फराळ, रंगीबेरंगी मेणबत्त्या, सुगंधी उटणे, साबण, रांगोळीचे स्टिकर्स, कापडी व वेगवेगळ्या आकाराच्या पिशव्या या वस्तूंचा समावेश होता. त्याचप्रमाणे गृहपयोगी दैनंदिन लागणाऱ्या वस्तू देखील विक्रीसाठी ठेवण्यात आल्या. जसे, कुळीथ पिठ, चकली भाजणी, नाचणी पिठ, थालीपीठ तयार करण्याचे पिठ, घावणे पिठ, आंबोळी पिठ हे पिठाचे विविध प्रकार होते. तसेच सजावटीसाठी लागणाऱ्या विविध रंगांच्या माळा व विविध आकाराचे रंगीत दगड विक्रीसाठी ठेवण्यात आले. प्रत्येक गृहिणीसाठी लागणाऱ्या आवश्यक वस्तू म्हणजेच, तेल पिशवी, काळे वाटाणे, पोहे, सुकामेवा, कोकम सरबत, कोकम आगळ, फिनाईल या सर्व वस्तूंचा त्यात समावेश होता. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी या वस्तूंची विक्री करण्यासाठी आनंदाने सहभाग घेतला व पालकांनी देखील ग्राहकाची भूमिका पार पाडून विद्यार्थ्यांना उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला. विद्यार्थ्यांमधील उद्योजक व सर्जनशीलता या वृत्तींना उपक्रमाद्वारे प्रेरणा देण्यात आली. विद्यार्थ्यांना खरेदी-विक्रीचा स्व-अनुभव प्राप्त व्हावा व त्यांचे अर्थशास्त्रीय ज्ञान प्रगत व्हावे या दृष्टिकोनातून स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये हा उपक्रम राबवण्यात आला. शाळेतील सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनीच उपक्रमामध्ये उत्साहाने सहभाग घेतला. शाळेचे संस्थापक श्री. रुजुल पाटणकर व मुख्याध्यापिका सौ. दिशा कामत यांनी सर्व विद्यार्थ्यांचे, पालकांचे व शिक्षकांचे भरभरून कौतुक केले आणि सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छाही दिल्या. अशाप्रकारे आजचा हा उपक्रम अतिशय आनंदात साजरा करण्यात आला. स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल प्रमाणे, वाव किड्स रयान प्रीस्कूल सावंतवाडी, बांदा आणि कुडाळ या संस्थेतही हा उपक्रम राबवण्यात आला. अशाप्रकारे वरील उपक्रम विद्यार्थ्यांच्या कृतीशीलतेला वाव देणारा ठरला.