महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दिवाळीचे (राजकीय) फटाके!

06:57 AM Nov 14, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ऐन दिवाळीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ताप उतरतोय की नाही याची चिंता केली जात असताना अचानक प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना घेऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीला ते गेले. तातडीची भेट घेऊन महाराष्ट्रात परतले. आदल्या दिवशी दिवाळीत आपली भेट होणार नाही असे कार्यकर्त्यांना आवाहन करणारे दादा अचानक मास्क चढवून दिल्लीला पोहोचले. आता तिथे त्यांनी काय चर्चा केली याची माहिती राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या हवाल्यानेच बाहेर पडू लागलेली आहे. याचाच अर्थ आपण केलेली तक्रार लोकांच्यापर्यंत पोहोचावी याची काळजी खुद्द अजितदादांनी घेतलेली दिसते. ही माहिती विचार करायला लावणारी आहे. मुळात आतापर्यंत ज्या तक्रारींचा पाढा वाचला गेला तो माध्यमांसाठी वेगळा आणि शहांच्यासाठी वेगळा असू शकतो. एक महत्वाचा मुद्दा असा आहे की, मराठा आरक्षणाचा जो मूळ मुद्दा आहे, तो केंद्राशी संबंधित आहे. केंद्राची भूमिका, संसदेत कायदा किंवा राष्ट्रपतींचा वटहुकूम यासाठी महत्वाचा आहे. केंद्र त्यासाठी तयार नाही. महाराष्ट्रातील मराठा आंदोलकांच्या दबावापुढे झुकलो तर जाट, गुज्जर, पाटीदार या सर्वांना आरक्षण द्यावे लागेल, असे असताना मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची भर सभेत शपथ घेतली आणि मराठ्यांना आरक्षण देण्याचा शब्द दिला. हा शब्द त्यांनी कोणाला विचारून दिला? हे विचारले जावे किंवा तो कसा पाळला जाणार?त्यात न्यायालय किंवा अन्य अडथळे आले तर लोकसभेला त्याची किंमत कोणाला मोजावी लागणार? हे मुद्दे अजितदादांनी पुढे करून स्वत:ची यातून सोडवणूक तर करून घेतली आहेच. पण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अमित शहा यांच्याकडे तक्रार करून डाव टाकला आहे. चर्चा उठवली आहे ती, आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वागणुकीबद्दल.  शिंदे गटाचे आमदार, मंत्री यांच्या अरेरावीच्या कारभाराबद्दल अजित पवार यांनी शहा यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याचे सांगितले गेले. त्यासाठी त्यांनी अनेक उदाहरणे देखील दिली आहेत. यामध्ये मराठा आरक्षणाबाबत घेतल्या जाणाऱ्या निर्णयांमध्ये तिन्ही पक्षांशी चर्चा करून निर्णय घेतले नसल्याची प्रमुख तक्रार असल्याचे म्हटले आहे. मराठ्यांना सरसकट आरक्षणाचा मुख्यमंत्र्यांकडून दिला गेलेला शब्द आणि त्यामुळे राज्यातील ओबीसीची नाराजी ओढवून घेतल्याची तक्रार ही एक प्रमुख बाब आहे! याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी मंत्री छगन भुजबळ आणि शंभुराज देसाई यांच्यात झालेल्या वादाची दखल घेऊन दोघांनाही सबुरीचा सल्ला शिंदे यांनी दिला होता. त्यातून या कुरबुरी वाढल्याचे सांगितले गेले. प्रत्यक्षात लोकसभा निवडणुकीत भाजपला अडचणीचा ठरणाऱ्या शिवरायांच्या शपथेचे काय? हा दादांचा प्रश्न असावा आणि त्यानिमित्ताने आपल्याला राज्याचे नेतृत्व करण्याची संधी देण्याची त्यांनी मागणी रेटली असावी अशीच शक्यता आहे. सत्ताधारी पक्षात नसलेली एकवाक्यता, अजित पवार यांच्याकडे असलेल्या अर्थमंत्रीपदाबाबत शिंदे गटाच्या आमदारांचे असणारे आक्षेप, पूर्वीच्या सरकारमधून राष्ट्रवादीचे निमित्त करून बाहेर पडणे या सगळ्याचे पडसाद नव्या सरकारच्या दुसऱ्या दिवाळीत एकमेकांच्या खुर्चीखाली फटाके फोडून उमटवण्याचे नेत्यांनी ठरवलेले दिसते, असे प्रथमदर्शनी वाटते पण ते तेवढेच मर्यादित नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या तक्रारीमध्ये मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणेच त्यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघाशी संबंधितही आहे. मुंब्रा येथील शिवसेना शाखेची केलेली तोडफोड आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांना आक्रमक होण्याची मिळालेली संधी याकडेही लक्ष वेधून अजित पवार यांनी येत्या लोकसभा निवडणुकीच्या आधी अशा पद्धतीचे वातावरण निर्माण होणे हिताचे नाही हे दाखवून दिले आहे. शिंदे गटातील आमदार आपले म्हणणे मान्य करून घेण्यासाठी कोणत्याही थराला जायला तयार असतात याची उदाहरणे देतानाच त्यांच्या मंत्र्यांकडून होत असलेल्या चुकीच्या घोषणा, अघळपघळ बोलणे आणि त्यात वाद ओढवून घेणे असे प्रकार होत आहेत. त्यामुळेच अब्दुल सत्तार यांना गेले काही दिवस अज्ञातवासात जावे लागले आहे. त्यांच्याप्रमाणेच इतरही काही मंत्री वादग्रस्त बनले आहेत ज्यांचा मुद्दा केला गेला तर निवडणूक काळात अडचणी निर्माण होऊ शकतात, या आणि इतर अनेक विषयांवर अजितदादा यांच्याकडून तक्रार केली गेली असण्याची शक्यता आहे. आता भाजप नेतृत्व हे मुळात शिस्तप्रिय म्हणून प्रसिद्ध आहे. तर राष्ट्रवादीत अजितदादा गट हा दुसऱ्या पक्षाला हैराण करण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यांनी शिंदे यांची कुरापत काढली असली तरी अमित शहा या तक्रारींकडे किती गांभीर्याने पहाणार यावरच दादांच्या तक्रारींचे भवितव्य अवलंबून आहे. त्यातही दादा ज्यांना रिपोर्ट करण्यासाठी गेले होते ते देशाचे गृहमंत्री आहेत आणि प्रत्येकाची खडानखडा माहिती बाळगून असतात हे लक्षात ठेवले पाहिजे. सरकारमधील काही मंडळींनी केलेला गोंधळ खरोखर अडचणीत आणणारा आहे यात शंकाच नाही. पण, लोकसभा विधानसभा निवडणूक हे शहा यांचे उद्दिष्ट आहे. ते याकडे कसे पाहतात ते महत्त्वाचेच. मात्र ही तक्रार होत असतानाच शिंदे गटाचे दोन नेते गजानन किर्तीकर आणि रामदास कदम एकमेकाला भिडले आहेत. किर्तीकर शिंदे सेनेत आणि मुलगा ठाकरे सेनेत असल्याकडे लक्ष वेधून रामदास कदम यांनी येत्या निवडणुकीमध्ये त्यांनी प्रामाणिकपणाने काम करावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तर किर्तीकर यांनी कदम हे 1990 सालीच शरद पवार यांच्याशी हातमिळवणी करून होते. त्यांनी पवार यांच्या सोबत एकत्र गाडीतून प्रवास केला होता असा गौप्यस्फोट करून उध्दव ठाकरे यांनी त्यांना राणे यांच्या विरोधात उपयोगात आणून नंतरच्या काळात का दूर ठेवले असेल यावर शिक्कामोर्तब केले आहे. फटाके तर फुटत आहेत आणि त्याला सर्वोच्च न्यायालयाने वेळ काळ ठरवून दिला असला तरी राजकीय फटाके हा वेळ पाळण्याच्या मानसिकतेत नाहीत. सणात सुध्दा त्यामुळेच राजकारण जोमात आहे.

Advertisement

 

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article