महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दिवाळी संपली, मैदान खाली करण्याची वेळ झाली !

06:31 AM Nov 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मी पस्तीस वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट जवळून बघतोय. अनेक पराभव मी बघितले. कधी मैदानातील आकाशवाणी समालोचन कक्षातून, कधी मैदानातून प्रेक्षक या भूमिकेतून, तर कधी दूरदर्शनवरून. परंतु काल परवा किवीविऊद्ध झालेला कसोटी मालिकेतील पराभव जखमेवर मणभर मीठ चोळणारा. क्रिकेटमधील माझं पहिलं प्रेम म्हणजे कसोटी क्रिकेट. त्याच कसोटी क्रिकेटची भारताच्या लाजिरवाण्या पराभवामुळे अशी चिरफाड होत असेल तर त्यासारखे दुसरे दु:ख ते कुठलं. मी नेहमी म्हणतो की सर्व संघांना तुम्ही हलक्यात घ्या. परंतु किवीना नको. गंमत बघा त्यांचा केन विल्यमसन पूर्ण मालिकेत संघात नव्हता. मुंबईच्या फिरकी खेळपट्टीवर तर त्यांचा हुकूमाचा एक्का सँटनरही नव्हता. एवढं असूनसुद्धा शेवटच्या कसोटीत भारतीय संघ व्हाईटवॉशपासून वाचू शकला नाही हे दुर्दैवच.

Advertisement

फार पूर्वी कसोटी सामन्याचा निकाल लागण्यासाठी पाच दिवसही अपुरे पडायचे. क्रिकेटचा जमाना बदलला आणि आता कसोटी सामने तीन दिवसात समाप्त होऊ लागलेत. पूर्वी खेळपट्टीवर नांगर टाकणारे बरेच खेळाडू आपण कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाकडून बघितले. सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर, चेतन चौहान, यशपाल शर्मा, मोहिंदर अमरनाथ, राहुल द्रविड ही सर्व मंडळी शीर्षस्थानी. परंतु आज-काल जेसीबीने जसे अनधिकृत बांधकाम पाडली जातात त्याप्रमाणे भारतीय फलंदाज पूर्णत: ढेपाळताना बघितले. फार पूर्वी कसोटीमध्ये धावबाद होणं फार दुर्मीळ असायचं. परंतु या मालिकेत पंत, कोहली यासारखे दिग्गज फलंदाज ऐन मोक्याच्या क्षणी धावबाद होतात हे कोडं तमाम भारतीय क्रिकेट रसिकांना निश्चितच न उलगडणारं. आपण कसोटी क्रिकेट खेळतोय हे भारतीय संघ पूर्णत: विसरून गेला. पूर्ण मालिकेत एखादा सामना तीन दिवसात संपला तर आपण समजू शकतो. परंतु तिन्ही सामने अडीच, पावणेतीन दिवसात संपतात, ही गोष्ट  कसोटी क्रिकेटसाठी निश्चितच घातक आहे. काही वर्षांपूर्वी मुंबईत ऑस्ट्रेलियाविऊद्ध अडीच दिवसातील कसोटी क्रिकेटमधील झालेला पराभव आकाशवाणी समालोचन कक्षातून याची देही याची डोळा मी अनुभवला होता. ती जखम अजूनही भरली नाही आहे. आणि आता त्याच जखमेवर भलं मोठं भगदाड पडले. असो.

Advertisement

एक जमाना असा होता की भारतीय खेळपट्टीवर फक्त भारतीय स्पिनर्सची दादागिरी असायची. दुसऱ्या बाजूला भारतीय फलंदाजांचा फिरकीवर वरचष्मा  असायचा. परंतु आज-काल परदेशातील फिरकी गोलंदाजही क्रिकेटच्या भाषेत भारतीय फलंदाजांना मामा बनवू लागले आहेत. किवीविऊद्धची ही मालिका त्याचेच उत्तत उदाहरण. कसोटी क्रिकेट हेच खरं क्रिकेट हे भारतीय खेळाडू विसरलेत का? हाच यक्ष प्रश्न माझ्यासमोर पडला आहे. अर्थात याला जबाबदार कोण? झटपट क्रिकेट, आयपीएल क्रिकेट की देशांतर्गत खेळल्या जाणाऱ्या रणजी क्रिकेटकडे केलेले अक्षम्य दुर्लक्ष. या सर्व गोष्टींचा विचार आता बीसीसीआयने केलाच पाहिजे. दुसरीकडे नवनिर्वाचित प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी कसोटी क्रिकेटकडे गंभीरतेने बघावं एवढीच माफक अपेक्षा. पुढे रात्र वैऱ्याची आहे. आपल्याला ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाशी दोन हात करायचे आहेत. न्यूझीलंडविऊद्धच्या या व्हाईटवॉशवरून ऑलिम्पिकमधील भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनची आठवण झाली. जिथे तो 100 टक्के सुवर्णपदक जिंकणार असे वाटत असताना तो चौथ्या स्थानी फेकला गेला. नेमकं तेच चित्र किवीविऊद्धच्या मालिकेत बघायला मिळालं. 2-0 किंवा 1-0 ने ही मालिका आपण खिशात टाकू असंच चित्र मालिकेआधी होतं. परंतु प्रत्यक्षात काही वेगळेच घडले. पुन्हा एकदा क्रिकेटने रावाचा रंक आणि रंकाचा राव कधीही होऊ शकतो हे दाखवून दिले. जर हे असेच चालू राहिले तर मात्र तुमचा माझा कसोटी क्रिकेटवरील विश्वास उडेल. सरते शेवटी ऐन दिवाळीत भारतीय संघाचा बार फुसका निघाला एवढे मात्र खरं. शेवटी क्रिकेटच्या पंढरीत भारतीय संघाने उरलीसुरली लाजही गमावली हेही तेवढेच खरं.

-विजय बागायतकर

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article