नरकासुर दहनाने दिवाळीपर्व सुरु
पणजी : दिव्यांचा उत्सव दिवाळी उत्सवाला गोव्यात थाटात प्रारंभ झाला. संपूर्ण गोवाभर दिव्यांची सजावट करण्यात आली असून घरादारावर रंगीबेरंगी आकाशकंदीलाने लक्ष वेधून घेतले आहे. पहाटे नरकासुर प्रतिमांचे दहन करून आणि नंतर अभ्यंगस्नान करुन तुळशीवृंदावनासमोर गोविंदा गोविंदा म्हणत कडू कारटे फोडून दिवाळी उत्सवाला सुरुवात झाली. दिवाळीच्या या उत्सवानिमित्त संपूर्ण गोवाभर बुधवारी मध्यरात्रीपर्यंत अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. नरकासुर प्रतिमांच्या स्पर्धाही अनेक ठिकाणी घेण्यात आल्या. पणजी सारख्या शहरांमध्ये नरकासुर प्रतिमा पाहण्याकरिता हजारोंच्या संख्येने लोकांनी एकच गर्दी केली होती. विशेषत: युवा वर्गामध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. लक्ष्मीपूजन उद्या शुक्रवार 1 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
पारंपरिक पोह्यांचा उत्सव
आज दिवाळीचा पहिला दिवस आहे. देवाची पूजा झाल्यानंतर घरातील ओवाळणीचा कार्यक्रम होईल. प्रेमाचे प्रतीक व आनंद आणि उत्साह यांचा सण असल्याने एकमेकांना भेटवस्तू देण्याचे कार्यक्रम सुरू होतील. आज दिवाळीनिमित्त घराघरांमध्ये पारंपरिक पोह्यांचे विविध खाद्यपदार्थ करुन ते अगोदर देवाला नैवेद्य म्हणून अर्पण केले जातील. वाड्यावाड्यावरील लोक एकमेकांच्या घरी जाऊन सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन तसेच या पोह्यांचा आस्वाद घेऊन दिवाळीचा पारंपरिकपणा जपला जातो.
पणत्या, आकाशकंदील
तत्पूर्वी पहाटे नरकारसुर दहन झाल्यानंतर घरोघरी पणत्या पहाटे प्रज्वलित करण्यात आल्या. आकाशकंदील लावण्यात आले. विद्युत दिव्यांच्या माळांची रोषणाईही करण्यात आली. काही ठिकाणी पहाटे मंदिरामध्ये नरकासुर वध या विषयावर कीर्तनही सादर करण्यात आले.
रोज रांगोळीचा आविष्कार
दिवाळीच्या या दिवसांत आता महिलावर्ग रोज घरासमोरील अंगणात विविध प्रकारच्या रांगोळ्या काढण्यात गर्क राहतील. तसेच अनेकांच्या घरात दिवाळीनिमित्त विविध फराळांच्या पदार्थांची रेलचेल राहील. गोव्यातील पारंपरिक दिवाळी उत्सव हा आणखी चार दिवस चालणार आहे. त्यानंतर थेट थोरली दिवाळी म्हणजेच तुलसी विवाह सोहळा होईल. रविवारी भाऊबीज असून त्यानिमित्त बाजारात खरेदी करीता बुधवारी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. दिवाळीचा उत्साह जनतेमध्ये पसरलेला आहे.