दिव्यांशी दुहेरी सुवर्णाची मानकरी
वृत्तसंस्था, प्रिस्टीना
विश्व टेबलटेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या 15 वर्षीय दिव्यांशी भौमिकने दर्जेदार कामगिरी करत दुहेरी सुवर्णपदकाची मानकरी ठरली. जागतिक महिलांच्या महिला टेबल टेनिसपटूंच्या मानांकनात 211 व्या स्थानावर असलेली दिव्यांशीने या स्पर्धेत मात्र दर्जेदार कामगिरीचे प्रदर्शन घडविले. महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात दिव्यांशीने चीत तैपेईच्या 38 व्या मानांकीत येह यी तियानचा 3-2 (8-11, 11-8, 11-5, 7-11, 11-7) अशा गेम्समध्ये पराभव करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. 15 वर्षीय दिव्यांशीने आता आंतरराष्ट्रीय स्तरावर वरिष्ठ विभागात आपल्या आगमानाची घोषणा केली आहे.
या स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणारी दिव्यांशी ही जगातील दुसरी तरुण वयाची महिला टेबल टेनिसपटू ठरली आहे. या स्पर्धेत तिने महिला दुहेरीचे सुवर्णपदकही घेतले आहे. भारताच्या दिव्यांशी भौमिक आणि सिंड्रेला दास या जोडीने अंतिम सामन्यात जपानच्या साची आओकी आणि कोकोना मुरामात्सु या जोडीचा 3-2 (7-11, 14-12, 12-14, 11-8, 11-7) अशा गेम्समध्ये पराभव केला.