दिव्याचा विश्वविजेत्या जू वेनजुनला धक्का, कार्लसन फिरौझाकडून चकित
वृत्तसंस्था
ओस्लो : नॉर्वे चेस स्पर्धेतील आपल्या पदार्पणाच्या सामन्यात दिव्या देशमुखने आपली छाप पाडण्यासाठी आपण किती उत्सुक आहोत हे स्पष्ट केले. महिलांची विश्वविजेती बुद्धिबळपटू जू वेनजुनला क्लासिकल सामन्यात बरोबरीत रोखल्यानंतर ‘आर्मागेडन’ फेरीत तिचा पराभव करण्याच्या या प्रवासात नागपूरच्या या 20 वर्षीय खेळाडूने स्पर्धेचे एक अत्यंत मनोरंजक वैशिष्ट्या असलेल्या ‘कन्फेशनल बूथ’मध्ये प्रवेश करणारी पहिली खेळाडू होण्याचा मान मिळवला.
काळ्या मोहऱ्यांसह खेळताना दिव्याने मधल्या टप्प्यातील आत्मविश्वासपूर्ण खेळाच्या व हत्तीच्या आक्रमक चालींच्या जोरावर विश्वविजेत्या प्रतिस्पर्ध्याला प्रत्येक चालीवर तोडीस तोड उत्तर दिले. जू हिने अत्यंत आक्रमक हल्ले चढवले; परंतु दिव्याने अत्यंत शांतपणे बचाव केला आणि अखेरीस एका टप्प्यावर सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. 52 चालींनंतर ‘क्लासिकल’ सामना बरोबरीत सुटला.
विजेती निश्चित करण्यासाठी त्यानंतर ‘आर्मागेडन’ टायब्रेकर खेळवला गेला. या स्वरूपामध्ये पांढऱ्या मोहऱ्यासह खेळणाऱ्या खेळाडूला अधिक वेळ (10 मिनिटे) मिळतो, परंतु त्याला सामना जिंकणे अनिवार्य असते. याउलट काळ्या मोहऱ्या घेऊन खेळणाऱ्या खेळाडूला कमी वेळ (7 मिनिटे) मिळतो, परंतु सामना जिंकण्यासाठी त्याला केवळ बरोबरी साधणे पुरेसे असते. हे स्वरूप खेळाडूंवर तीव्र मानसिक दडपण निर्माण करते. दिव्याने या दडपणाचा अत्यंत खुबीने सामना केला आणि अतिरिक्त गुण मिळवले.
भारताच्या खुल्या गटातील खेळाडूंसाठीही हा दिवस समाधानकारक ठरला. डी. गुकेश आणि आर. प्रज्ञानंद या दोघांनीही आपापल्या आर्मागेडन लढतींमध्ये विजय मिळवला. गुकेश आणि व्हिन्सेंट कीमर यांच्यातील क्लासिकल लढतीत अखेरच्या टप्प्यात बरीच नाट्यामयता पाहायला मिळाली. हा सामना शेवटी सामना बरोबरीत सुटला. गुकेशने हीच गती टायब्रेकरमध्येही कायम राखली आणि आर्मागेडनमध्ये शानदार विजय मिळवत सामना आपल्या नावे केला. प्रज्ञानंदचीही सुऊवात दमदार झाली. पहिल्या फेरीत पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळताना त्याने क्लासिकल लढतीत बरोबरी साधली, त्यानंतर आर्मागेडन टायब्रेकरमध्ये अमेरिकन ग्रँडमास्टर वेस्ली सो याला पूर्णपणे निष्प्रभ करत 1.5 गुण मिळवले.
हंपी पराभूत
महिलांच्या गटात बिबिसारा असाउबायेवा हिने स्पर्धेतील पहिला क्लासिकल विजय नोंदवला. या सामन्यात भारताच्या कोनेरू हम्पीने पांढरे मोहरे घेऊन खेळताना पिछाडीवरून जोरदार पुनरागमन केले होते, मात्र अगदी शेवटच्या क्षणी तिच्याकडून अत्यंत महागात पडणारी चूक घडली. दरम्यान, ‘नॉर्वे चेस वुमन’ स्पर्धेतील आपल्या पहिल्याच सहभागात झू जिनर हिने आर्मागेडन टायब्रेकरमध्ये गतविजेती अॅना मुझीचुक हिचा पराभव केला. स्पर्धेच्या पहिल्या दिवसातील सर्वांत मोठा धक्कादायक निकाल म्हणजे स्थानिक हिरो आणि जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या मॅग्नस कार्लसनने आपला अलिरेझा फिरौजाविऊद्धचा ‘क्लासिकल’ सामना गमावला. ही कामगिरी अधिकच लक्षणीय ठरण्याचे कारण म्हणजे फिरौजा पायाला दुखापत झालेली असतानाही खेळत होता आणि असे असूनही त्याने पाच वेळा विश्वविजेता ठरलेल्या कार्लसनवर आपल्या कारकिर्दीतील पहिलाच ‘क्लासिकल’ विजय नोंदवला.