पुण्यात निवृत्त डॉक्टराच्या घरात राडा; रीलस्टार दिव्या शिंदेसह 10 जणांवर गुन्हा
पुणे : सांस्कृतिक कार्यक्रमाच्या प्रसिद्धीच्या मोबदल्यावरून झालेल्या वादातून 65 वर्षीय निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्याच्या घरात घुसून पाच लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी सोशल मीडिया रीलस्टार दिव्या शिंदे हिच्यासह अण्णा ऊर्फ आप्पा ढमढेरे आणि अन्य 8 ते 10 जणांविरुद्ध काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करून धमकी दिल्याचाही आरोप आहे.
तक्रारदार डॉ. विद्याधर गायकवाड हे पुणे कॅन्टोन्मेंट रुग्णालयाचे माजी मुख्य वैद्यकीय अधिकारी असून निवृत्तीनंतर सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या ‘करुणादीप फाउंडेशन’च्या माध्यमातून बालगंधर्व रंगमंदिरात ‘कला आविष्कार महोत्सव’ आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाच्या प्रसिद्धीचे काम केल्याचा दावा करत दिव्या शिंदे आणि तिच्या सहकाऱ्यांनी डॉ. गायकवाड यांच्याकडे पाच लाख रुपयांची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद आहे. मात्र, त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर संबंधित व्यक्तींनी त्यांच्या निवासस्थानी प्रवेश करून गोंधळ घातल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, आरोपींनी घरातील सामानाची नासधूस केली आणि डॉ. गायकवाड यांना मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी काळेपडाळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींची भूमिका तपासली जात आहे.
दिव्या शिंदे पुन्हा चर्चेत
सोशल मीडिया रील्समुळे प्रसिद्ध झालेली दिव्या शिंदे यापूर्वीही वादग्रस्त घटनांमुळे चर्चेत आली होती. फेब्रुवारी 2026 मध्ये ‘बिग बॉस मराठी’मधून तिची हकालपट्टी झाल्याचे वृत्त समोर आले होते.
दरम्यान, सध्याच्या प्रकरणातील आरोपांची चौकशी सुरू असून पाच लाख रुपयांच्या मागणीचा नेमका प्रकार, घरात प्रवेश करणाऱ्या इतर व्यक्तींची भूमिका आणि घटनेमागील कारणे तपासातून स्पष्ट होणार आहेत.