For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दर तीन वर्षांनी घटस्फोट

06:24 AM May 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
दर तीन वर्षांनी घटस्फोट
Advertisement

ही घटना जपान या देशामधील आहे. या देशात एक कायदा असा आहे, की ज्यामुळे विवाहित जोडप्यांना कोणाचे तरी एकाचे आडनाव उपयोगात आणावे लागते. याचा अर्थ असा की पतीचे किंवा पत्नीचे आडनाव दोघांनीही पुढे आयुष्यभर, किंवा जोपर्यंत विवाहबंधन टिकून आहे, तोपर्यंत उपयोगात आणायचे असते. पण काही जोडप्यांना हा नियम जाचक वाटतो. पती आणि पत्नी या दोघांनाही त्यांची मूळची आडनावे विवाहानंतरही उपयोगात आणण्याचे स्वातंत्र्य असावे, असे त्यांचे म्हणणे असते. मात्र, हा सरकारने केलेला कायदा असल्याने त्यांना त्याच्या विरोधात जाऊन काहीही करता येत नाही. या देशातील एका जोडप्याने मात्र, या नियमावर एक प्रभावी आणि व्यवहारी तोडगा काढला आहे.

Advertisement

विवाहानंतर दर तीन वर्षांनी घटस्फोट घ्यायचा आणि नंतर पुन्हा रीतसर विवाह करायचा, अशी त्यांची योजना आहे. घटस्फोटानंतर हे पती-पत्नी एकमेकांपासून वेगळे होतात. त्यानंतर पुन्हा विवाह करतात. पहिल्या विवाहानंतर पतीने पत्नीचे आडनाव स्वीकारले होते. घटस्फोटानंतर पुन्हा विवाह झाल्यानंतर पत्नीने पतीचे आडनाव स्वीकारले आहे. त्यामुळे या दोघांनाही स्वत:ची मूळची आडनावे दर तीन वर्षांनी उपयोगात आणण्याची संधी मिळते. अशा प्रकारे, त्यांनी कायदा पाळत असतानाच स्वत:ची मूळ आडनाव उपयोगात आणण्याचे स्वातंत्र्य मिळविण्याचीही सोय केली आहे. या जोडप्याने कायद्याचे कोठेही उल्लंघन न करता स्वत:ची इच्छा पूर्ण करण्यासाठी योजिलेल्या या उपायाची प्रशंसा अनेक नागरीकांनी केली आहे.

जपान हा जगातील अत्यंत थोड्या देशांपैकी एक आहे, की जेथे विवाहानंतर पती आणि पत्नीला भिन्न भिन्न आडनावे उपयोगात आणण्याची मुभा मिळत नाही. इतर बहुतेक सगळ्या प्रगत देशांमध्ये अशी अनुमती मिळते. त्यामुळे जपानमध्ये या कायद्यासंदर्भात अनेक वर्षांपासून वादविवाद होत आहेत. या कायद्याची आवश्यकताच काय असा प्रश्न अनेक जपानी उपस्थित करतात. तथापि, तेथील सरकार हा कायदा मागे घेण्यास अनुकूल नसल्याने नागरीकांना तो अनिच्छेने पाळावाच लागतो. या दांपत्याने मात्र, यावर जो उपाय शोधला आहे, तो अत्यंत प्रभावी आहे, अशी प्रतिक्रिया अनेक जपानी नागरीकांनी व्यक्त केली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.